जगण्यासाठी खरंच किती पैसा हवा?

- डॉ. सपना शर्मा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

उच्च मध्यमवर्गीयांमध्ये सध्या एक वेगळाच प्रकार पाहायला मिळतोय. कितीही पैसा कमावला, तरी आपल्याकडे कमीच पैसा आहे, अशा भीतीत आणि भावनेत ते जगताहेत. सगळ्या सुख-सोयी आहेत आणि त्या ठेवायला घरही आहे. छोटी का होईना, पण गाडीही आहे. बॅंकेत पैसा आहे आणि दर महिन्याला दोन पगार त्यात जमाही होत आहेत; पण इतक्‍या पैशांमध्ये कसं भागेल, ही भीती कायमच वास्तव्याला आहे. भरपूर कमावणाऱ्या व्यक्तीही नेहमीच कुठल्यातरी तणावाखाली असल्यासारख्या दिसतात. सणावाराला, आप्तेष्टांच्या (अगदी आपल्या मुलांच्या आणि पालकांच्या) दुखण्याखुपण्याला बिनपगारी सुटी घ्यावी लागली, तर त्यांना फारच जिवावर येतं. एक सुटी गेली म्हणून हळहळतात.

उच्च मध्यमवर्गीयांमध्ये सध्या एक वेगळाच प्रकार पाहायला मिळतोय. कितीही पैसा कमावला, तरी आपल्याकडे कमीच पैसा आहे, अशा भीतीत आणि भावनेत ते जगताहेत. सगळ्या सुख-सोयी आहेत आणि त्या ठेवायला घरही आहे. छोटी का होईना, पण गाडीही आहे. बॅंकेत पैसा आहे आणि दर महिन्याला दोन पगार त्यात जमाही होत आहेत; पण इतक्‍या पैशांमध्ये कसं भागेल, ही भीती कायमच वास्तव्याला आहे. भरपूर कमावणाऱ्या व्यक्तीही नेहमीच कुठल्यातरी तणावाखाली असल्यासारख्या दिसतात. सणावाराला, आप्तेष्टांच्या (अगदी आपल्या मुलांच्या आणि पालकांच्या) दुखण्याखुपण्याला बिनपगारी सुटी घ्यावी लागली, तर त्यांना फारच जिवावर येतं. एक सुटी गेली म्हणून हळहळतात. मुलं मोठी होत असताना त्यांना बघायला घरात कुणी नसेल, तर दोघांपैकी एकानं काही काळ नोकरी सोडून मुलांचं संगोपन करायला ते तयार नसतात. नोकरी जाईल, प्रमोशन जाईल, घरात पैसे कमी येतील, अशी भीती ते सतत व्यक्त करतात. पण, जगण्यासाठी खरंच किती पैसा हवा? अलीकडेच एका पालकाने त्याच्या मुलाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागासाठी पाच लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले आणि लगोलग ‘आजकाल कित्ती खर्च असतो म्हणून मला सारखं काम करावं लागतं,’ हेही ते बोलून गेले. नंतर तीच ट्रिप एक लाख रुपयांत व्यवस्थितरीत्या प्लॅन करून मी त्यांना दाखवली. माझे हॉटेल आणि एअरलाइन बऱ्यापैकी होते, फक्त सगळ्यांत महागडे नव्हते!

गरिबांची मुलंही शिकतात आणि त्यातलीच काही आयुष्यात मोठी प्रगती करतात. तसेच, महागड्या शाळेत शिकणारी सर्वच मुलं खूप प्रगती करीत नाहीत. मग आपण कुठलं आयुष्य आपल्या कुटुंबाला देऊ इच्छितो?

आनंदाने जगणं महत्त्वाचं, की सगळीकडं मोठी गाडी, मोठी शाळा, मोठं घर याचसाठी हप्ते फेडत राहणं? आणि ते करत असतानाही आपण आनंदात असलो तर त्यातही काही वाईट नाही. माझा प्रश्न त्या लोकांसाठी आहे, जे कुठल्या तरी काल्पनिक भविष्यासाठी नको त्या गोष्टींमध्ये पैसा गुंतवून ठेवतात आणि त्याच्या परतफेडीत आजचं जगणंच विसरून जातात.  

गरिबी ही पैशांची असते काय? श्रीमंतीचं माझं माप- मला आवडणाऱ्या काही गोष्टी म्हणजे दर आठवड्याला मुलांसोबत मल्टिप्लेक्‍समध्ये सिनेमा पाहणं आणि विकत घेऊन पुस्तकं वाचणं. सर्वांचे खर्च व्यवस्थित करून आणि आवश्‍यक तेवढी शिल्लक ठेवूनही मला माझे छंद जोपासताना दोनदा विचार करावा लागत नाही, याचा अर्थ मी बऱ्यापैकी श्रीमंत आहे. मी स्वतःच्या श्रीमंतीचं जे मूल्यमापन करेन, तितकीच मी श्रीमंत असणार, असा माझा विश्वास आहे. त्याचं पैशांशी किंवा संपत्तीशी काहीच घेणं नाही. कारण आनंद आणि समाधान हे केवळ एक वैयक्तिक मत आहे. 
तुम्ही श्रीमंत आहात की गरीब?

Web Title: editorial artical dr. sapna sharma