रणनीती आणि कूटनीती!

प्रकाश अकोलकर
शुक्रवार, 17 मार्च 2017

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुस्लिम आणि दलितही भाजपबरोबर असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, मतदानाचा तपशीलवार अभ्यास केला असताना वेगळे वास्तव समोर येते.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुस्लिम आणि दलितही भाजपबरोबर असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, मतदानाचा तपशीलवार अभ्यास केला असताना वेगळे वास्तव समोर येते.

जातिपातींचा बुजबुजाट आणि हिंदू-मुस्लिम तेढ याबद्दल प्रसिद्ध असलेल्या उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाचे डिंडिम २०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत वाजत राहतील. गेल्या विधानसभा निवडणुकीत ४०३ पैकी अवघ्या ४७ जागा जिंकणाऱ्या भाजपने यंदा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली ३१२ जागा जिंकून तुफानी मुसंडी मारली आणि देशाच्या राजकारणालाच नवं नेपथ्य बहाल केलं. १९८० नंतर प्रथमच या महाकाय राज्यात तीनशेहून अधिक जागा जिंकण्याचा विक्रम या पक्षाने केला आणि त्यामुळेच ४० टक्‍के ओबीसी, २१ टक्‍के दलित आणि १९ टक्‍के मुस्लिम अशी जात-धर्मानुसार विभागणी झालेल्या या राज्यात सर्वांना सोबत घेऊन हा विजय भाजपने संपादन केला आहे, अशी चर्चा सुरू झाली. मुस्लिमबहुल पट्ट्यातही भाजपला मोठं यश मिळालं आणि हा आता सर्वसमावेशक पक्ष बनला आहे, असंही चित्र रंगवलं जात आहे. ‘देवबंद’सारख्या मुस्लिमांच्या एका बलदंड ठाण्यातही भाजपच विजयी झाल्याने आणि मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचा पुरता बोजवारा उडाल्याने मुस्लिम आणि दलितही भाजपबरोबर गेल्याचं भाजपची नेतेमंडळी तारस्वरानं सांगू लागली आहेत. मात्र, मतदानाचा तपशीलवार अभ्यास केला असता वेगळं वास्तव समोर येतं.

भाजपने या निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवार उभा न करण्याचा धाडसी निर्णय बराच आधी घेतला होता आणि प्रत्यक्षात पहिल्या मुस्लिमबहुल पट्ट्यातील मतदानाचे तीन चरण पार पडेपर्यंत भाजपचा प्रचारही विकासाच्याच मुद्द्यावर होता. मात्र, या पट्ट्यातही  दणदणीत यश मिळेल, याची बहुदा दस्तुरखुद्द मोदी यांनाही कल्पना नसावी. अन्यथा, मतदानाच्या तिसऱ्या फेरीत लखनऊसह अन्यत्र मतदान सुरू असताना, ते ‘समशान आणि कबरस्तान’ तसंच ‘रमझान आणि दिवाली’ अशी धार्मिक विभागणी करतेच ना! त्यांनी हा ध्रुवीकरणाचा डाव टाकण्याआधीच केवळ हिंदू उमेदवार उभे करणं, हाही ध्रुवीकरणाचाच एक प्रकार होता. या पहिल्या तीन टप्प्यांत राज्याचा धावता दौरा करताना प्रकर्षाने जाणवले, मुस्लिमांच्या मतांची सप व बसप यांच्यात विभागणी करण्यासाठी भाजपने चालवलेले अकटोविकट प्रयत्न. मुस्लिम मतपेढी विभागली गेली नाही तर विजय अशक्‍य आहे, हे भाजपच्या बड्या नेत्यांना कळून चुकलं होतं आणि फरिदाबाद येथे अमित शहा यांचं भाषण ऐकताना त्या रणनीतीची पुरती कल्पना आली होती. 

या रणनीती व कूटनीतीला कसं यश आलं ते बघण्यासारखं आहे. उत्तर प्रदेशातील मुस्लिमबहुल ५९ मतदारसंघांत झालेला मतदानाचा अभ्यास करता असं दिसून येतं, की तेथे ‘सप’ला २९ टक्‍के मतं मिळाली, तर ‘बसप’ला १८! ही बेरीज ४७ टक्‍के होते. या विभागणीमुळे ३९ टक्‍के मतं घेणाऱ्या भाजपने मग तिथं ३९ जागा जिंकत दणदणीत आघाडी घेतली, तर ‘सप’च्या वाट्याला आलेल्या जागा होत्या १७. मायावतींना या पट्ट्यात एकही जागा जिंकता आली नाही. इतका मोठा आघात मतविभाजनाने झाला होता.

मुझफ्फरनगर, शामली, सहारणपूर, बरेली, बिजनोर, मीरत, तसंच मोरादाबाद हा सारा मुस्लिमबहुल पट्टा त्यामुळेच भगव्या रंगात रंगून गेल्याचं चित्रही निकालांचे आकडे दाखवू लागले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मुझफ्फरनगर इथं झालेल्या जातीय दंगलींमुळे झोतात आलेल्या मीरपूर मतदारसंघात काय झालं ते बघितलं, की या मतविभाजनाचा कसा फटका कोणास बसला, ते लगेचच लक्षात येतं. तिथं ‘सप’चा उमेदवार अवघ्या १९३ मतांनी पराभूत झाला! त्या पक्षाने ६८,८४२ मतं घेतली होती, तर भाजपचा उमेदवार ६९,०३५ मतं घेऊन जिंकून येत असताना ‘बसप’च्या उमेदवाराने ३९,६८९ मतं घेतली होती!

सरढाणामध्येही तेच. तिथं हिंदू-मुस्लिम दंगलीतील आरोपी आणि भाजपचा ‘पोस्टर बॉय’ सोमित सोम ९७,९२१ मतं घेऊन विजयी होत असताना, ‘सप’ला मिळालेली मतं होती ७६,२९६, तर ‘बसप’चा आकडा होता ५७,२३९! सव्वा लाखाहून अधिक मुस्लिम मतदार असलेल्या आणि ५० टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झालेल्या देवबंद या मुस्लिम ठाण्यातही याचीच पुनरावृत्ती झाली. तिथं भाजप उमेदवाराला एक लाख दोन हजार मतं मिळाली, तर ‘सप’ आणि ‘बसप’ यांना अनुक्रमे ५५ हजार आणि ७२ हजार! तरीही उत्तर प्रदेशातील मुस्लिम भाजपबरोबर आल्याचे गोडवे गाऊ जायले लागले आहेत आणि तमाम ‘भक्‍तमंडळी’ ‘जी जी रे जी जी!’ म्हणत त्यांना साथ देत आहेत. या दोन पक्षांबरोबरच भाजपला यश मिळवून देण्याचं काम असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘एमआयएम’ या पक्षानेही केलं. तांब्यापितळेच्या नजाकतदार कलाकृतींबद्दल प्रसिद्ध असलेल्या मोरादाबाद ग्रामीण पट्ट्यातील कांथ मतदारसंघात भाजप उमेदवार अवघ्या सव्वादोन हजारांच्या मताधिक्‍याने विजयी होत असताना, तिथं ‘सप’ला ७३ हजार, ‘बसप’ला ४३ हजार आणि ‘एमआयएम’ला चक्‍क २२ हजार मतं मिळाली होती!

जे मुस्लिम मतांचं झालं, तेच मग दलितांच्या मतांचंही. उत्तर प्रदेशातील ८५ राखीव मतदारसंघांत भाजपला ४० टक्‍के मतं मिळाली खरी; पण त्याचवेळी या मतदारसंघांत ‘सप’नं १९, तर ‘बसप’नं २४ टक्‍के मतं हासिल केली होती. ही बेरीज होते ४३ टक्‍के! या निवडणुकीत दलित मतांसाठी भाजपने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती आणि २१ टक्‍के दलितांपैकी मायावतींचे कट्टर समर्थक असलेले ११ टक्‍के जाटव सोडून अन्य दलितांवर लक्ष केंद्र केलं होतं. तरीही, मतदानाचे हे आकडे पाहता अवघा दलित तो एकचि झाला आणि भाजपपाठी आला, असं म्हणता येणं कठीण आहे.

राज्यात १९ टक्‍के लोकसंख्या असलेल्या एका मोठ्या (मुस्लिम) समूहाला खड्यासारखं दूर ठेवून, भाजपने ही निवडणूक लढवली आणि आपल्या कूटनीतीच्या जोरावर जिंकलीही! ‘सब का साथ...’ असं तारस्वराने सांगणाऱ्या पक्षाला हे खचितच शोभणारं नाहीच; शिवाय देशाच्या सर्वधर्मसमभावाच्या संस्कृतीला हरताळ फासणारंही आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांचा हाच खरा बोध आहे!

Web Title: editorial artical prakash akolkar