खलबत! (ढिंग टांग)

खलबत! (ढिंग टांग)

स्थळ : मातोश्री महालातील तळघरातील खलबतखाना, वांद्रेगड.
वेळ : अर्थात खलबतीची!    प्रसंग : निर्वाणीचा.
पात्रे : राजाधिराज उधोजीमहाराज,त्यांचे अष्टप्रधान मंडळ!

उधोजीराजे गंभीर चेहऱ्यानं येरझारा घालत आहेत. पलित्यांच्या प्रकाशात खलबतखान्यातील अंधार अधिकच गडद झाला आहे. अष्टप्रधान मंडळाचे मेंबर एकेक करून मुजरा करतात आणि आपापल्या शिटा घाईघाईने पकडतात. अब आगे...

सरखेल एकनाथाजी शिंदे : उशीर झाल्याबद्दल माफी महाराज! ठाण्याहून येताना ट्राफिक फार लागला!!
हिकमतबहाद्दर दिवाकराजी : (सल्ला-कम-टोमणा) तिथं बसू नका! दाढी पलित्याला लागंल! (ते ऐकून दौलतबंकी रामदासभाई गपचूप आपली शीट बदलतात...) 

उधोजीराजे : (गर्रकन मान वळवत) ...माझ्या सवंगड्यांनो, रात्र वैऱ्याची आहे! दिवस चांदण्या दिसो लागल्या! महाराष्ट्राच्या दौलतीचे भविष्य आज तुमच्या हातात आहे, उद्या नसेल!!  कमळाबाईच्या कारभारानं वीट आणला!! आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे दिसते! तुम्हांस काय वाटते? बोला!! खुशाल बोला!! दिलात असेल ते बोला, नसेल तेही बोला!! (पुटपुटत) पटपट बोला इतकंच!!

सरखेल एकनाथाजी शिंदे : (दाढी कुर्वाळत) काय बोलायचं ऱ्हायलंय? फैसला करून टाका...हेच!!
पंतप्रतिनिधी सुभाषाजी देसाई : (रुमालाने घाम टिपत पोक्‍तपणाने)...नाही म्हंजे...फैसला करा, पण विचारपूर्वक करा, येवढंच माझं म्हणणं! करायला गेलो एक, आणि झाले दुसरेच, असा प्रकार पुन्हा नको!...काय?
उधोजीराजे : रास्त बोलिलात, पंत! रास्त बोलिलात!! 
सरनोबत संजयाजी : (उतावीळपणाने) अहो, कसलं रास्त? काढा तलवार आणि टाका उडवून मान! हाय काय नि नाय काय!!
हिकमतबहाद्दर दिवाकराजी : (कानात काडी घालत) काय पोरखेळ वाटला का? सत्तेतले वाटेकरी आपण! भरल्या पानावरून उठायला कारणही तसंच हवं ना?

सरनोबत संजयाजी : (उद्वेगानं) आणखी काय कारण हवं आहे? त्या कमळाबाईच्या गोटातून गेल्या सहा महिन्यांत कुणी इथं फिरकलेलंसुद्धा नाही!! नकोच आपल्याला ती सोयरीक!! मी सांगतो महाराज, तोडा गाठ!!
दौलतबंकी रामदासभाई : (विरोध करत) व्वा रे वा!! तुम्ही मंत्री नाहीआत म्हणून तसं म्हणताय! कमळाबाईशी गाठ तोडा असं सांगता आणि स्वत:च्या पुस्तकाच्या प्रकाशनाला त्या कमळाबाईच्या दिल्लीवाल्या साहेबालाच बोलावता! ‘पुस्तकाला जेटली, एरवी युती तुटली’ असं चालतंय व्हय?
सरनोबत संजयाजी : (कळवळून) सोडा त्या ओसाडगावच्या पाटीलकीचा नाद, भाई! कशापायी जीव जाळताय त्या फुकाच्या गोष्टीसाठी?
पंतप्रतिनिधी सुभाषाजी : (घाम टिपत) तुमचंही बरोबरच आहे, पण...
हिकमतबहाद्दर दिवाकराजी : (सात्विक संतापानं) काय बरोबर आहे? काहीही बरोबर नाही!!

पंतप्रतिनिधी सुभाषाजी : (पडेल आवाजात) अहो, तुमचंही बरोबरच आहे, म्हणतोय ना मी!!
उधोजीराजे : (निर्णायक आवाजात) बस, बस, बस!! ठरलं, ठरलं, ठरलं!! आमचा शब्द ही काळ्या फत्तरावरली रेघ!!..ऐका, त्या कोण कुठल्या कमळेनं अवघ्या मऱ्हाटी रयतेचा सूड मांडला! अवघ्या रहाटीचा खेळखंडोबा केला, भीक नको, पण कुत्रा आवर अशी आवस्था आणली!! आणि अजुनी तुम्ही तो पहा माझा शेतकरी बांधव कसा घायकुतीला आला आहे...(सगळे एका दिशेने पाहतात) त्या पहा, आमच्या आयाबहिणींच्या चेहऱ्यावर मरणकळा आली आहे. (सगळे दुसऱ्या दिशेला बघतात.) तो पहा, सामान्य मराठी माणूस पेट्रोल पंपावर रांगेत उभा आहे...(सगळ्या नजरा तिसरीकडे)..कुठवर चालणार हे असं? (सगळे खाली मान घालतात) आता येकच उपाय!!
सरनोबत संजयाजी : राजियांचे बोल, म्हंजे देवावरचे फूल!! हर हर हर महादेव! महाराज, उपसा तलवार, आणि होऊन जाऊ द्या सुलतानढवा!!
उधोजीराजे : (सपकन तलवार उपसत) ह्यावर आता येकच उपाय- आणखी थोडी वाट पाहू!! काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com