पारंपरिक वाचनाच्या महतीवर मोहोर

प्रदीपकुमार माने
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

मानवी जीवनात वाचनाची महत्त्वाची भूमिका असते. वाचन ही फक्त मनोरंजन करणारी गोष्ट नसून, तिचा मेंदूवर आणि साहजिकच व्यक्तिमत्त्वावर वैशिष्ट्यपूर्ण परिणाम होतो, असं संशोधकांना आढळून आलंय. 
 

मानवी जीवनात वाचनाची महत्त्वाची भूमिका असते. वाचन ही फक्त मनोरंजन करणारी गोष्ट नसून, तिचा मेंदूवर आणि साहजिकच व्यक्तिमत्त्वावर वैशिष्ट्यपूर्ण परिणाम होतो, असं संशोधकांना आढळून आलंय. 
 

जॉर्ज मार्टिन या अमेरिकन कादंबरीकारानं एका ठिकाणी म्हटलंय, ‘‘सतत वाचन करणारा माणूस मरण्याआधी हजार वेळा जीवन जगतो. न वाचणारा फक्त एकच जीवन जगून मरतो.’’ वाचन करणं मानवी जीवनाला किती समृद्ध करत असतं याचं अत्यंत समर्पक वर्णन मार्टिनच्या या वक्तव्यातून मिळतं. वाचनामुळं आपणाला माहितीचा खजिना तर प्राप्त होतोच; पण काहीवेळा ते इतकं महत्त्वपूर्ण ठरतं, की कधी कधी आपला एखाद्या गोष्टीकडं पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. काही जणांच्या जीवनात तर वाचन इतकं महत्त्वपूर्ण ठरतं, की एखादं पुस्तक वाचल्यानंतर त्याचं जीवनच बदलून जातं. पुस्तक वाचल्यावर असं काही होऊ शकतं काय? खरोखरच वाचन मानवी जीवनात इतकी महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतं? हे प्रश्‍न आपणाला पडतात. आपणाला आश्‍चर्य वाटेल, पण या प्रश्‍नांची उत्तरं आज फक्त वाचक आणि लेखकच देत नाहीत तर संशोधकही देऊ लागलेत. वाचनाचा मानवी मेंदू आणि व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम हा विज्ञानजगतातील अभ्यासाचा विषय बनला आहे.      

महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अभ्यास खूप वेगवेगळ्या पद्धतीनं होत आहे. ‘नेचर,’ ‘सायन्स’ या प्रतिष्ठित नियतकालिकांतही या विषयावरील संशोधन प्रसिद्ध होत आहे. मेंदूशास्त्र आणि विज्ञानातील विविध पत्रिकांमध्ये या विषयांवरील विविध पैलूंनी होणाऱ्या अभ्यासांचे निष्कर्ष प्रसिद्ध होत आहेत. वाचन मानवी मेंदूवर कसा परिणाम करतं, त्यामुळं मानवी व्यक्तिमत्त्वात काय बदल होतात? कुठल्या पद्धतीचं वाचन जास्त परिणामकारक ठरतं?

ललित का ललितेतर, पुस्तक हातात घेऊन वाचलेलं, की संगणकावर किंवा मोबाईलवर वाचलेलं? लहान मुलांना घडविण्यात वाचन किती महत्त्वपूर्ण आहे? या विविध विषयांवर जगभरातील संशोधक अभ्यास करीत आहेत, अन्‌ यातून मिळणारे निष्कर्षही महत्त्वपूर्ण आहेत. मानवप्राणी कोणतीही गोष्ट करीत असतो, तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये आवश्‍यक असे बदल होत असतात. असे असले तरी प्रत्येक गोष्टीचा मानवी मेंदूवर सारखाच परिणाम होत नाही. काही गोष्टी मेंदूवर जास्त परिणाम करतात, तर काही गोष्टी त्या तुलनेत विशेष परिणाम करत नाहीत. विशेष गोष्ट म्हणजे या संशोधकांना आढळून येतंय, की वाचन ही फक्त मनोरंजनच करणारी गोष्ट नसून, तिचा मेंदूवर आणि साहजिकच व्यक्तिमत्त्वावर वैशिष्ट्यपूर्ण असा परिणाम होत असतो. ॲटलांटामधील एमरी विद्यापीठातील संशोधक ग्रेगरी बर्नस यांनी या विषयावर महत्त्वपूर्ण संशोधन केलंय. त्यांनी केलेलं संशोधन असं सांगतं, की कथाकादंबऱ्यांचं वाचन आपल्या मेंदूवर परिणाम तर करतंच, पण ते आपली संवेदनशीलता वाढवून आपलं व्यक्तिमत्त्व घडवायला कारणीभूत ठरतं. ग्रेगरी बर्नसनी आपले सहकारी ब्रेन, पिट्युला आणि पाय यांच्या साह्याने एक प्रयोग केला. या प्रयोगात त्यांनी रॉबर्ट हॅरिस या लेखकाची ‘Pompeii’ ही कादंबरी २१ जणांना वाचायला दिली. नऊ दिवसांच्या कालावधीत या कादंबरीतला काही भाग वाचायला दिला. कादंबरी वाचण्यापूर्वी आणि वाचनानंतर प्रत्येकवेळी त्यांनी त्यांच्या मेंदूत झालेले बदल ‘एमआरआय’च्या साह्यानं नोंदविले. या प्रयोगाच्या शेवटी त्यांना दिसून आलं, की या कादंबरीनं या वाचकांचं फक्त मनोरंजनच केलं नव्हतं, तर त्यांच्या मेंदूत अल्पकालासाठी आणि दीर्घकालासाठीही बदल केले होते.

मेंदूमधील सुप्रामार्जिनल गायरी आणि राईट पोस्टीरिअर टेम्परल गायरी या भागात प्रकर्षानं बदल दिसून आले. हे बदल संवेदनशीलता, सहानुभूती, दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहणे या गोष्टीशी संबंधित आहेत. याचा अर्थ कादंबरी वाचन हा मानवी मेंदूसाठी खूप चांगला वैचारिक आणि भावनिक व्यायाम असतो अन्‌ त्यामुळं वाचकाची दृष्टी व्यापक बनून दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहायला शिकते.

ओटले केथ आणि पीटरसन यांनी केलेला प्रयोग असाच आहे. या प्रयोगामध्ये त्यांनी १६६ लोकांना ‘द लेडी वुइथ लिटील डॉग’ या चेकॉव्हच्या लघुकथेचे आणि त्यावर आधारित एका ललितेतर रिपोर्टचं वाचन करायला दिलं. हा रिपोर्टसुद्धा लघुकथेइतकाच मनोरंजक होता. या वाचनानंतर त्यांनी कुठल्या गोष्टीचा त्यांच्यावर जास्त परिणाम झालाय याचा अभ्यास केला. त्यांना आढळलं, की कथेच्या रूपात असणारी गोष्ट वाचकांवर जास्त परिणामकारक होती. साहजिकच आहे कुठल्याही महान साहित्यिकांचं वैशिष्ट्य हेच असतं, की जेव्हा तो लिहितो, तेव्हा त्याचं लिखाण वाचकाला जास्त गुंगवून ठेवतं, भावनिक करतं आणि तितकंच विचार करायला भाग पाडतं. अशा इतर प्रयोगांतून संशोधकांनी सिद्ध केलंय, की कथा-कादंबऱ्यांचं लिखाण हे ललितेतर लिखाणापेक्षा काही बाबतीत जास्त परिणामकारक ठरतं.

या संशोधनाबरोबर वाचनावरील इतर बाबतीत होणारं संशोधन खूप वेगळं असं आहे. नॉर्वेमधील स्टॅव्हेंजर विद्यापीठातील संशोधिका ॲने मॅनगेन यांना असं आढळलं की प्रत्यक्ष पुस्तकरूपातील वाचन आणि त्याच पुस्तकाचं ‘ई- कॉपी’चं वाचन यांच्यातील तुलनेचा अभ्यास केला. यातून त्यांना आढळलं, की प्रत्यक्ष पुस्तकाचं वाचन हे संगणकावर किंवा मोबाईलवर वाचलेल्या पुस्तकापेक्षा खूपच प्रभावी ठरतं. याप्रमाणे इंटरनेटवरील वाचन, सोशल मीडियावरील वाचन याही विषयांवर संशोधक अभ्यास करत आहेत. या संशोधनातून आढळतेय, की तंत्रज्ञान फक्त व्यावहारिक जीवनच नव्हे, तर वाचनशैलीही बदलतंय. पण पारंपरिक पद्धतीने वाचन करायची शैली तुलनेमध्ये आधुनिक ई- रीडिंगपेक्षा खूपच प्रभावी आहे. लहान मुलांचं वाचनही संशोधकांना एक महत्त्वपूर्ण विषय वाटतोय. त्यातील निष्कर्षही खूप विलक्षण आहेत. परीकथा किंवा काल्पनिक गोष्टीचं वाचन हे लहानग्यांच्या दृष्टीने त्यांच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे हे सिद्ध होतंय. या वेळी आईन्स्टाईनचं एक वाक्‍य आठवतं, ‘‘कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्त्वाची आहे.’’ साहजिकच आहे. ज्ञानाचा जन्मही तिच्यातूनच होत असतो.