भोंदूबाबाला अद्दल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळे तथाकथित ‘बाबा’ आसारामला भले धडा मिळाला असेल; पण त्यापासून खरा बोध घ्यायला हवा तो अशा भोंदूबाबांच्या नादी लागून आपले सर्वस्व गमावणाऱ्या भाविकांनी.

बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळे तथाकथित ‘बाबा’ आसारामला भले धडा मिळाला असेल; पण त्यापासून खरा बोध घ्यायला हवा तो अशा भोंदूबाबांच्या नादी लागून आपले सर्वस्व गमावणाऱ्या भाविकांनी.

त थाकथित ‘बाबा’ आसाराम याला एका अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कारप्रकरणी जोधपूर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे आता तरी देशभरातील स्वयंघोषित भोंदू गुरू, महाराज, बाबा, बापू यांना चाप लागायला हरकत नसावी. आसारामने केलेला गुन्हा हा अत्यंत निर्घृण आणि भीषण होता. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभे राहून भावी जीवनाची सुखस्वप्ने बघणाऱ्या सोळा वर्षांच्या एका मुलीला आसारामने फूस लावून आणखीही काही आमिषे दाखवली आणि मोहात पाडून तिच्यावर अमानुष बलात्कार केला. मात्र, आसाराम, तसेच त्याचे देशभरातील आणि विशेषत: गुजरात, राजस्थान, हरियाना परिसरातील तथाकथित भक्‍तगण यांचा आसाराम निर्दोष आहे, असाच दावा होता. त्यांनी आसारामची निर्दोष सुटका व्हावी म्हणून जोधपूर परिसरात जपजाप्य आणि मंत्रचाळेही सुरू केले होते आणि गावागावांतील आसारामच्या आश्रमांत भक्‍तगण देव पाण्यात घालून बसले होते. मात्र, सुदैवाने या भुक्‍कड प्रतिक्रियांचा न्यायाधीशांवर कोणताही परिणाम झाला नाही आणि त्यांनी आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावून जन्माची अद्दल घडवली. आपल्या देशात असे भोंदूबाबा गावोगाव कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवत असतात आणि जीवनातील कठोर वास्तवाला तोंड देताना अपयशी ठरलेले असंख्य बायाबापडे आपली मान ठेवण्यासाठी कोणाचा ना कोणाचा खांदा शोधत असतात. अशाच भोळ्या-भाबड्या भाविकांना मोहात पाडून लुबाडण्याचे काम मग आसाराम असो की बाबा रामरहीम असो की रामपाल असो की नित्यानंद असो, असे भोंदूबाबा करत असतात. हे बाबा आपल्या भक्‍तगणांना नादी लावून, त्यांची संपत्ती तर लुबाडतातच; शिवाय महिलांचे लैंगिक शोषणही करतात. आसारामनेही तेच केले आणि आता आपल्या या जन्मातील पापांचा धडा त्यास याच जन्मी मिळाला आहे.

अर्थात, राजकारण्यांचा पाठिंबा असलेल्या या गावोगावच्या भोंदूबाबांचे रूपांतर पंचतारांकित बाबांमध्ये होत नाही, हे रामरहीमच्या उदाहरणावरून स्पष्ट झाले होते आणि आसारामवरही गुजरातेतील अनेक बड्या राजकारण्यांचा वरदहस्त होता, ही बाब नाकारून चालणार नाही. हे असे भोंदूबाबा आपल्या ‘प्रवचना’तून अप्रत्यक्षरीत्या सामाजिक, तसेच धार्मिक ध्रुवीकरणच घडवून आणत असतात आणि ते राजकारण्यांना हवेहवेसे असते. राजकारण्यांच्या कृपाप्रसादामुळेच अवघ्या चार दशकांत आसाराम दहा हजार कोटींचे साम्राज्य उभारू शकला आणि त्यातूनच त्याने दहशतही निर्माण केली होती. अनेक बडे उद्योगपतीही त्याच्या नादी लागले होते. राजकारणी, तसेच हे उद्योगपती यांच्या पाठबळामुळेच १९७०च्या दशकात गुजरातेत साबरमतीच्या तीरावर छोटेखानी झोपडी उभारून, आपल्या करामती दाखवायला सुरवात केलेल्या आसारामचे आज देशभरातच नव्हे, तर जगभरात ४०० आश्रम आहेत! २०१३ मध्ये बलात्काराच्या आरोपावरून गुजरातेतील मोटेरा येथील आश्रमातून त्याला अटक केल्यानंतर घातलेल्या छाप्यात पोलिसांच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार गावोगाव त्याने हडपलेल्या जमिनी आणि अन्य ‘ऐहिक’ सुखसोयींसाठी उभारलेल्या पंचतारांकित आश्रमांतील सुविधा यांचे मूल्य दहा हजार कोटी रुपयांच्या आसपास जाते. आसारामच्या ‘वेबसाइट’वरील एका माहितीपटानुसार १९४१ मध्ये आसुमल नावाचा हा युवक सिंध प्रांतात जन्म घेता झाला. फाळणीनंतर त्याचे कुटुंब अहमदाबादेत आले आणि तरुणपणी काही छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्यानंतर तो अचानक आध्यात्मिक शोधाच्या नावाखाली हिमालयात निघून गेला. तेथे त्यास कोणी लीलाशाह ‘बापू’ नावाचे गुरू भेटले. नंतर तो ‘आसाराम’ हे नवे नाव घेऊन काही वर्षांनी गुजरातेत परतला आणि त्याने साबरमतीच्या तीरावर ‘तपसाधना’ सुरू केली. मात्र, या तपसाधनेने त्यास त्यागाची शिकवण मिळण्याऐवजी भोगाचीच शिकवण दिली, असे त्याच्या नावावर नोंदल्या गेलेल्या अनेक गुन्ह्यांवरून स्पष्ट होते. आसारामला पाच वर्षांपूर्वीच्या या गुन्ह्याबद्दल जन्मठेपेची सजा झाली असली, तरी त्याच्यावर आणखीही काही गुन्हे दाखल असून, त्यातील बहुतांश हे महिलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे आहेत. निकाल जाहीर होताच, आसारामला रडू कोसळले; पण ते नक्राश्रू आहेत, हे त्याच्या भक्‍तगणांनी लक्षात घ्यायला हवे. आज आसारामला भले धडा मिळाला असेल; पण त्यापासून बोध घ्यायला हवा तो अशा भोंदूबाबांच्या नादी लागून आपले सर्वस्व गमावून बसणाऱ्या भोळ्याभाबड्या भाविकांनी. त्यांनी असा काही धडा घेतला तरच जोधपूर न्यायालयाचा हा निकाल खऱ्या अर्थाने सार्थकी ठरला, असे म्हणता येईल.

Web Title: editorial asaram bapu get life imprisonment