अतिउजव्यांच्या घोडदौडीला फ्रान्समध्ये लगाम 

अनिकेत भावठाणकर 
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

फ्रान्स अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वाढती बेरोजगारी आणि दहशतवादाचा प्रश्‍न हे प्रमुख मुद्दे असूनही पहिल्या फेरीत मतदारांचा कल उदारमतवादी विचाराच्या उमेदवाराकडे तुलनेने अधिक असल्याचे स्पष्ट झाले. 

फ्रान्स अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वाढती बेरोजगारी आणि दहशतवादाचा प्रश्‍न हे प्रमुख मुद्दे असूनही पहिल्या फेरीत मतदारांचा कल उदारमतवादी विचाराच्या उमेदवाराकडे तुलनेने अधिक असल्याचे स्पष्ट झाले. 

फ्रान्स राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या 23 एप्रिलच्या पहिल्या फेरीत उदारमतवादी विचारांचे इमान्युएल मॅक्रॉन (24% मते) आणि अतिउजव्या विचारांच्या समर्थक मरीन ल पेन (21.3 % मते) यांची सरशी झाली असून, त्यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. ल पेन यांना थोडा बहुत राजकीय अनुभव आहे; तर मॅक्रॉन हे राजकीयदृष्ट्या नवखे आहेत. थोडक्‍यात, प्रस्थापित व्यवस्थेविरोधी कौल देण्याची "नवी परंपरा' अमेरिकेनंतर फ्रेंच नागरिकांनी देखील पाळली आहे. सुरक्षा परिषदेतील कायम सदस्यत्व असलेली फ्रान्स ही जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्थादेखील आहे. तसेच, "ब्रेक्‍झिट'नंतर युरोपियन महासंघाला (ईयू) उभारी देण्यासाठी फ्रान्सचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याशिवाय, गेल्या काही वर्षांत फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये भरीव वाढ झाली आहे. "ब्रेक्‍झिट' आणि ट्रम्प यांच्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयानंतर पाश्‍चिमात्य जगात; विशेषतः पश्‍चिम युरोपात अतिउजव्या विचारांचे वारे वाहू लागल्याचे चित्र निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर युरोप किंबहुना जागतिक राजकारण कोणत्या वळणावर आहे, हे उमजण्यासाठी फ्रान्समधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे पाहावे लागले. फ्रान्सच्या संविधानाच्या सातव्या कलमानुसार पाच वर्षांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होते. अध्यक्ष होण्यासाठी एकूण मतदानाच्या 50 टक्के मते मिळणे आवश्‍यक आहे. पहिल्या फेरीत कोणत्याही उमेदवाराला आवश्‍यक मते न मिळाल्यास मतांची सर्वाधिक टक्केवारी मिळवलेल्या पहिल्या दोन उमेदवारांमध्ये दुसऱ्या फेरीची लढत होते. पंधरवड्याच्या अंतराने निवडणुकीच्या दोन्ही फेरी पार पडतात. यंदा दुसरी फेरी सात मेला होणार आहे. 1965 पासून प्रत्यक्ष मतदानाने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची सुरवात झाल्यापासून कोणत्याही उमेदवाराने पहिल्या फेरीत निवडणूक जिंकलेली नाही. या वेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे 1965 नंतर प्रथमच "समाजवादी' (डावे) आणि "रिपब्लिकन' (उजवे) हे दोन प्रस्थापित पक्ष निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत रिंगणात नाहीत. फ्रान्सच्या प्रभावाखालील ओव्हरसीज प्रदेशातील नागरिकदेखील निवडणुकीत मतदान करू शकतात. एकूण 4.7 कोटी नोंदणीकृत फ्रेंच मतदारांपैकी ओव्हरसीज प्रदेशात दहा लाख मतदार राहतात. फ्रान्सचे ओव्हरसीज प्रदेश युरोपबाहेर म्हणजे प्रशांत महासागरातदेखील आहेत. तसेच अमेरिका आणि कॅनडातील फ्रेंचबहुल भागात देखील नोंदणीकृत फ्रेंच मतदार आहेत. 

मरीन ल पेन या रॅंट या अतिउजव्या विचारप्रणालीच्या पक्षाकडून निवडणूक रिंगणात होत्या. 2002 मध्ये ल पेन यांचे वडील जीन मरी ल पेन यांचा जॅक्‍स शिराक यांच्याविरोधात दुसऱ्या फेरीत दारुण पराभव झाला होता. 2012च्या निवडणुकीत मरीन ल पेन पहिल्या फेरीत तिसऱ्या क्रमांकावर आल्या होत्या. थोडक्‍यात, त्यांच्या अतिउजव्या, लोकानुनयी राष्ट्रवादी विचारांना यापूर्वी फ्रेंच नागरिकांनी फारसा थारा दिला नव्हता. यंदा मात्र ल पेन यांची जागतिक स्तरावर "फ्रेंच ट्रम्प' अशी ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी दहशतवादाच्या घटनांमुळे इस्लाम आणि पश्‍चिम आशियातील विस्थापितांना विरोध केला आहे. तसेच "ब्रेक्‍झिट'च्या धर्तीवर ल पेन यांनी "फ्रेक्‍झिट'चा पुरस्कार केला आहे. "ब्रेक्‍झिट' तसेच ट्रम्प यांच्या विजयानंतर ल पेन यांच्या परिघावरील विचारप्रणालीने फ्रान्सच्या मुख्य धारेवर देखील मोठ्या प्रमाणावर मोहिनी घातल्याचे दिसते. 

दुसरीकडे पहिल्या फेरीत सर्वाधिक मते मिळवणारे 39 वर्षीय मॅक्रॉन यांना कोणताही राजकीय अनुभव नाही. त्यांनी 2016 मध्ये "En Marche!' (पुढे चला) या चळवळरूपी पक्षाची स्थापना केली. फ्रान्सच्या अर्थमंत्रिपदाचा अनुभव असलेले मॅक्रॉन त्यांच्या कामगार सुधारणांसाठी प्रसिद्ध आहेत. फ्रान्समधील वाढती बेरोजगारी आणि दहशतवादाच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी फ्रान्सची संपूर्ण व्यवस्था बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. रोजगारासाठी डिजिटल क्रांतीची भूमिका घेतानाच त्यांनी पारंपरिक लोककल्याणकारी व्यवस्थेला प्रश्नांकित केले आहे. मॅक्रॉन यांनी मात्र ईयूचा पुरस्कार केला आहे आणि जागतिकीकरणाच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. ईयूच्या अस्तित्वासाठी जर्मनीला फ्रान्सची गरज असल्याने मॅक्रॉन यांच्या विजयाबद्दल जर्मन चान्सेलर अंजेला मर्केल यांच्या पक्षाने आनंद व्यक्त केला आहे. बारकाईने पाहिले तर ल पेन यांना उत्तर आणि उत्तर पूर्व फ्रान्समधील औद्योगिक पट्ट्यातील कामगार वर्गाने मतदान केले आहे तर मॅक्रॉन यांना पश्‍चिमेतील अभिजनवादी, उच्चशिक्षित आणि फ्रान्सच्या जागतिक प्रतिमेविषयी जागरूक अससेल्या वर्गाने मतदान केले आहे. पहिल्या फेरीनंतर ल पेन यांना दूर ठेवण्यासाठी प्रस्थापित पक्षांनी मॅक्रॉन यांच्या बाजूने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विविध सर्वेक्षणात मॅक्रॉन यांनाच राष्ट्राध्यक्षपदासाठी सकारात्मक कौल दिला आहे. 

ऑस्ट्रिया आणि नेदरलॅंड्‌समध्ये गेल्या काही महिन्यात अतिउजव्या विचारांचे उमेदवार पराभूत झाले आहेत. मॅक्रॉन यांची ल पेन यांच्यावरील आघाडी अतिउजव्या विचारांची पीछेहाट दर्शवत आहे. त्यामुळेच, पहिल्या फेरीनंतर ल पेन यांनी रॅंटच्या अध्यक्षपदावरून पायउतार होऊन मॅक्रॉन यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या पंधरवड्यात ल पेन यांचा प्रचार अधिक विखारी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. येत्या एक मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिनी फ्रान्समधील कामगारांना एकत्रित करून शक्तिप्रदर्शन करण्याचा ल पेन यांचा मानस आहे. गेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तीन वेळा पहिल्या फेरीत दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराने अंतिमत: निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे, फ्रेंच निवडणुकीचा "पिक्‍चर अभी बाकी है' असे 
म्हणावे लागेल. 

अनिकेत भावठाणकर 
(आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक)