घसा - एक खवखव! (ढिंग टांग)

- ब्रिटिश नंदी
मंगळवार, 31 जानेवारी 2017

प्रेम, युद्ध आणि राजकारण ह्या तिन्ही क्षेत्रांत मुशाफिरी करणाऱ्या माणसाचे काहीही बसावे; पण (ऐनवेळी) घसा बसू नये. घसा बसला, की त्याचे नशीब बसते. घसा बसलेल्या प्रेमवीराचा व्हालेंटाइन डे गुळण्या करण्यात वाया जातो. पोलिटिकल माणसाचा घसा बसणे म्हंजे तर ऐन रणभूमीवर बंदुकीत गोळ्या नसल्याचा साक्षात्कार होणे! कल्पना करा : समोर शत्रू उभा आहे. तुम्ही त्यास गोळी घातली नाही, तर तो तुम्हास घालणार. अशा परिस्थितीत तुमच्या बंदुकीत एकही गोळी नाही, असे लक्षात आल्यावर काय होणार? एक तर ‘टाइम प्लीज’ असे ओरडावे लागणार किंवा त्याची गोळी हुकवण्याची चपळाई दाखवावी लागणार!! पण हे दरवेळी जमण्यासारखे नाही.

ऐनवेळी घसा बसला, की पायदेखील ज्याम होतात. तात्पर्य युद्धात बंदूक आणि राजकारणात घसा ह्यांचे कार्य एकच असते. म्हणूनच तेलपाणी करून त्यास सदैव सज्ज ठेवावे लागते. तूर्त आपण ‘राजकारणातील घसा’ ह्याकडे जरा सम्यक दृष्टीने पाहू.

त्याचे असे आहे, की घसा बसला की राजकारण बसते. प्रसंगी घरी बसावे लागते. राजकारण बसले की लागलीच घसाही बसतो, हे वेगळेच. एकप्रकारचे हे दुष्टचक्र असून त्यास उपाय नाही. इतर इंद्रियांचे तसे नाही. उदाहरणार्थ, कान बसले तरी चालतात. उलट ऐनवेळी कानात काडी घालून ‘मला ऐकूच आले नाही’ असे शहाजोगपणे म्हणताही येते. राजकारणात तशी उदाहरणे आहेत.

दात नावाचा आणखी एक अवयव घशात जाऊ नये, म्हणूनही घसा बसू नये!! कां की घसा बसला, की दात घशात जाण्याची शक्‍यता अधिक... नव्हे, अशा प्रसंगी (कधी कधी) ते पडतातसुद्धा. एखाद्याचे दात घशात घालणे, हा वाक्‍यप्रयोग त्यावरूनच आला आहे. 

राजकारणात डोळे ‘बसले’ तरी चालतात. राजकारणात दृष्टीचा नाहीतरी फारसा उपयोग नसतोच, किंबहुना ऱ्हस्वदृष्टीचा दोष असेल, तर राजकारणात ते पथ्यावरच पडते, असा आजवरचा अनुभव आहे. म्हणूनच अनेक राजकारणी आपल्याला गॉगल परिधान केलेले आढळतील... मेंदूचेही तसेच, म्हंजे दुय्यमच. त्याचाही म्हणावा तसा वापर राजकारणात करण्याचे काही कारण पडत नाही.

...पण घशाचे तसे नाही. तो बारा महिने चोवीस तास ठणठणीत, निरोगी आणि गोळीबंद असलाच पाहिजे. 

एकदा एका पुढाऱ्याचा घसा बसला. (मागे!! आत्ता नाही!!) त्याने ‘गरम पाणी मिळेल का?’ असे बसलेल्या आवाजात आपल्या पत्नीस विचारले. तिने ‘रम पाणी’ असे ऐकल्याने ती फणकारून माहेरी निघून गेली. (पण दोन तासांत परत आली!!) येताना तिने सोबत द्राक्षासव आणले. अलीकडे त्या पुढाऱ्याचा घसा उभा आहे. बसत नाही. असो. 

बाकी काही म्हणा, बसलेल्या घश्‍याने (उभ्याने) भाषणे करणे महाकर्मकठीण असते. ध्वनिक्षेपकातून उमटणाऱ्या वाक्‍यातील कुठला शब्द बसलेला घसा गिळेल, हे सांगता येत नाही. चिरक्‍या आवाजात ‘मी मर्द आहे’ असे सांगणे एकवेळ खपून जाते. कारण, मी मर्द आहे हे एक स्टेटमेंट आहे, आश्‍वासन नव्हे. 

बसक्‍या घशाने आश्‍वासने देण्यात काहीही अर्थ नसतो. शिवाय, बसक्‍या आवाजात ‘वाघाच्या जबड्यात घालुनी हात, मोजितो दात’ असे म्हणणे अगदीच ‘हे’ वाटते. मागे एकदा एका पुढाऱ्याने (मागे! आत्ता नाही!!) बसलेल्या आवाजात विरोधकांवर तिखट ताशेरे ओढले. परिणामी, त्याचा घसा आणखी बसला आणि लोक हसले!! आपण हातवारे करून संतापून काही बोलत आहो आणि लोकांना ते विनोदी वाटते आहे, ही भावना खरेच क्‍लेशकारक असते. बोलणाऱ्याची माती खपत्ये, घसा बसलेल्याचे सोने पडून राहाते. ही ‘गले में खिच खिच’ दूर करण्याचा मार्ग एकच- शेंदूर!!
आपला घसा बसलेला असेल, तर विरोधकाला शेंदूर खायला घालावा!! हे ज्याला जमले, त्याला राजकारण जमले! काय कळले?
- जय महाराष्ट्र.

Web Title: editorial dhing tang