उडान! (ढिंग टांग)

उडान! (ढिंग टांग)

‘‘सभी यात्रियों का स्वागत है. बाहर का तापमान सदोतीस अंश सेल्सियस है. वैमानिक कॅप्टन प्रफुल्ल पटेल इनकी निगरानी में हम मुंबई से दिल्ली की दूरी करीब दो घंटे में पूरी करेंगे. उडान के समय सभी यात्रियों को भोजन एवं जलपान पेश किया जाएगा. यात्रियों से निवेदन है की वह अपनी कुर्सी की पेटी बांधे रख्खें...’’ नाजूक आवाजातील उद्‌घोषणेने आम्हाला पेंग आली.

विमानातील हवाईसुंदऱ्या कायम अश्‍या सकाळी दात घासायच्या आधी येणाऱ्या आवाजात का बोलतात, हे आम्हाला आजवर न उलगडलेले कोडे आहे. त्या आवाजामुळेच हवाईयात्री सर्व सूचना निमूटपणाने पाळतात, अशी आम्हाला खात्री आहे. आमच्या पहिल्या विमान प्रवासात भलताच प्रसंग ओढवला. हवाईसुंदरीने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी आम्ही तेथल्या तेथे केली. पण त्या सूचना विमान पाण्यावर उतरल्यास अमलात आणायच्या होत्या. पुढील रामायण सांगण्यात हशील नाही. असो.

‘‘तुमची सीट सरळ करा, साहेब!,’’ आमच्या शीटेवरील झाकण रुबाबात बंद करत क्‍याप्टन प्रफुल्ल पटेल ताड ताड चालत कॉकपिटकडे निघाले. बाय द वे विमानात डोकीवर असलेली फडताळे सारखी बंद करून ह्या हवाई लोकांना काय आनंद होतो, हेही आम्हाला आणखी एक न उलगडलेले कोडे आहे. एखादे झाकण राहिले उघडे तर काय बिघडेल? पण नाही. जरा झाकण उघडावे, तर ‘पाठीमागे बंद करा, बंद करा’ असे टुमणे लागते. पुन्हा असो.
विमानात अन्य व्हीआयपी प्रवासी होते, हे सांगणे न लगे. आमच्या रांगेत खिडकीशी साक्षात देवेंद्रनाना फडणवीस बसले होते. मधल्या शीटेवर आम्ही होतो. बाजूची तिसरी शीट रिकामी होती. देवेंद्रनाना खिडकीला नाक लावून विमानतळावरील हालचाली बारकाईने टिपत असतानाच अचानक उधोजीसाहेब आले आणि त्यांनी देवेंद्रनानांकडे चिडून पाहिले. 

‘‘ जय महाराष्ट्र. ही शीट माझी आहे!’’ उधोजीसाहेब.
‘‘हर हर महादेव. मी आधी आलो!!’’ नानासाहेब.
‘‘गच्ची धरीन! मी वाघ आहे!!’‘ उधोजीसाहेब.
‘‘ धरा...गच्ची धरा...कठडा धरा...काहीही धरा! खिडकी मिळणार नाही!,’’ नानासाहेब.
‘‘ बघा हं!,’’ असा जबरी दम देऊन उधोजीसाहेब अखेर तिसऱ्या शीटेवरच (चडफडत) बसले. मधल्यामध्ये आम्ही सॅंडविच!!
क्‍याप्टन प्रफुल्ल पटेल स्वत: रांगांमध्ये हिंडून प्रवाश्‍यांना हवे-नको विचारीत होते. ही त्यांचीच तर ‘उडान’ होती. गणवेषातील त्यांची रुबाबदार, भारदस्त मूर्ती पाहून मनात आले, हा गृहस्थ सिनेमात गेला असता तर आज अमिताभ बच्चन कुठे असते अं? त्यांनी बहुधा (तेव्हाच) कांपोष्ट खत विकण्याचा धंदाच काढला असता. सर्वांशी गोड बोलत त्यांनी हवा लाइट करून टाकली. तेवढ्यात भोजन आले. आम्ही पुढल्या शीटेला चिकटवलेला ट्रे ओढला. 

‘‘व्हेज की नॉनव्हेज?,’’ हवाईसुंदरीने विचारले. ‘सांग तुज काय हवे?’ची चाल अशीच असते नं? ह्या आवाजात आम्हाला कोणी काहीही विचारले तर आम्ही काहीही खाऊ!! आम्ही दोन्हीस मान डोलावली. देवेंद्रनानांनी नॉनव्हेज स्वीकारले होते, तर उधोजीसाहेबांनी व्हेज.
‘‘काय हे उधोजीसाहेब...वाघ घासफूस खातो?,’’ नानासाहेबांनी चिडवले.
‘‘ खामोश...दुसऱ्याच्या ताटात डोळे घालणारा पुढल्या जन्मी घुबड होतो!!,’’ उधोजीसाहेब खवळले.
‘‘ अहो, किती दिवसांनी आपण एकत्र भोजन घेतोय! गेल्या खेपेला मी तुमच्याकडे येऊन कोळंबीची खिचडी आणि...खॉक खॉक...खीक खीक...ख्यॉ...,’’ वाक्‍य पूर्ण होण्याआधी नानासाहेबांना ठसका लागला. त्यांनी हातानेच खूण करून आम्हाला पाणी मागितले. आम्ही चपळाईने पाण्याची चिमुकली बाटली उघडून त्यांच्यासमोर धरली. इतरांनीही तेच केले. खुद्द क्‍याप्टन प्रफुल्लजींनी एक बाटली आणून समोर धरली. बघता बघता नानासाहेबांसमोर पाच-पंचवीस बाटल्या आल्या...
‘‘ हाच तो जलयुक्‍त शिवार घोटाळा!!’’ पाण्याची बाटली निरखत उधोजीसाहेब ओरडले.
...इथे आम्हाला जाग आली. प्रफुल्लजींची ‘उडान’ ही फोटोबायोग्राफी पाहताना अंमळ डोळा लागला होता. चालायचेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com