डिनर पे चर्चा! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

स्थळ : १०, जॅनपॅथ, न्यू डेल्ही.
वेळ : रात्री साडेदहानंतरची.
प्रसंग : दोन घास पोटात गेल्यानंतरचा.
पात्रे : ऑलरेडी विंगेत गेलेली !
महामॅडम : (सुहास्य वदने...) हुश्‍श ! छान झाला बेत...नाही?
मनमोहनजी : (अघळपघळपणे) हं !
मल्लिकार्जुनजी खर्गे : (आपण बोलावे की न बोलावे, ह्या कायम संभ्रमात) कितना क्‍खाना क्‍खाया... कितना क्‍खाया... अरे बाप रे !! मैं तो दस गुलाबजाम क्‍खाया !! अच्चा नै ना इतना खाने को... बोला तो तब्येत को भोत बेकार रात का क्‍खाना...जी !! (इथे सगळे दचकतात. कारण एक प्रचंड ढेकर आसमंतात घुमते...)
बेटा : (उत्साहाने) मम्मा, हे आपलं अल्युम्नाय होतं ना? आमच्या शाळेतल्या मुलांचंही मध्यंतरी असंच संमेलन झालं ! माजी विद्यार्थी स्नेहमेळावा!! मजा आली होती...
महामॅडम : (घाईघाईने विषय बदलत) अहमदभाई, आपला ग्रुप फोटो काढला होता ना? कुठाय तो?
अहमदभाई : (अदबीने फोटोची कॉपी पेश करत) हा घ्या, मैडमजी !! लग्गेच प्रिंट करून आणला !!
मनमोहनजी : (अघळपघळपणे) हं !
महामॅडम : (फोटोकडे अभिमानाने पाहात) हा फोटो इतिहासात अमर होईल !
बेटा : (सहजपणाने) ऑबव्हियसली! फोटोत मी आहे ना !!
महामॅडम : (दुर्लक्ष करत) जुन्या मित्रांना असं अधूनमधून भेटलं की बरं वाटतं! फारा दिवसांनी आपण सारे एकत्र भेटलो... जवळ जवळ चार वर्षांनी ! हो ना?
मनमोहनजी : (दिलखुलासपणे) हं !
बेटा : (हसतमुखाने) चार वर्षं कशी गेली कळलंही नाही ! धम्माल !! (इथं सारे उपस्थित उसासा सोडतात.) मी तसं लागलीच ट्‌विट करून टाकणार होतो, पण-
महामॅडम : (पुन्हा विषय बदलत) ...जेवण अंमळ जडच होतं ! हो ना हो मनमोहनजी?
मनमोहनजी : (तृप्तपणे) हं !
मल्लिकार्जुनजी खर्गे : (पोटावरून हात फिरवत) वो आलू का पराट्टा भारी हो गया... मैं तीन क्‍खाया नाऽऽ...(इथे अहमदभाई मल्लिकार्जुनजींचा खांदा दाबतात...)
बेटा : (फोटोत डोकं घालत) हे मध्ये उभे असलेले अंकल कोण आहेत?
महामॅडम : (घाबरून) बरं झालं, डिनरचा बेत झाल्यानंतर विचारलंस ! तिथंच विचारलं असतंस तर पंचाईत झाली असती !..ते तृणमूलचे नेते होते ! त्यांचे चौतीस खासदार आहेत !
बेटा : (निरखून पाहात) लालूअंकल नाही आले? हा त्यांचा मुलगा ना?
अहमदभाई : (उदासपणे) नाही... ते डॉ. अब्दुल्लांचे पुत्र आहेत !! हे इथे दिसतात ना-
महामॅडम : (मध्येच नाराजीने नाक मुरडत) फोटोग्राफरला एवढंही कळलं नाही की मला मधोमध ठेवून फोटो घ्यावा ! इथं मध्ये कोण उभंय? नीट फोटो काढायला काय झालं होतं? कोणी काढला फोटो?
मल्लिकार्जुनजी : (संतापलेल्या नेहमीच्या आवाजात) वो सुरजेवालाइच होएंगे ! उन्होनही ये फोटो ट्‌विटर पे डाल दिया !!
बेटा : (गंभीरपणे) मोबाइलवर फोटो काढणं कठीण असतं हं !
मल्लिकार्जुनजी : (स्वत:च्याच नादात)...एक हात से कचोडी खा के दुसरे हात में मोबाइल पकडके फोटो निकलना भोत तकलीप का काम होता !!
अहमदभाई : (चातुर्याने विषय बदलत)...अपने डिनरसे वो ‘कमल’वाले डर गये होंगे !! एक दिल्ली का पराठा दस ढोकलों को भारी पडेगा अब !! क्‍या पॉल्टिक्‍स है !!
महामॅडम : (सावधपणे) छे, पॉलिटिक्‍स कसलं? साधं जेवण तर होतं ! हो ना हो मनमोहनजी?
मनमोहनजी : (ठामपणाने) हं !
महामॅडम : (एक भिवई उडवत)...मला वाटतं, पॉलिटिक्‍स हा आपल्या डिनरचा हेतूच नव्हता ! सगळ्या जुन्या मित्रांनी पुन्हा एकत्र येऊन लोकशाहीविरोधी तत्त्वांचा पाडाव करावा, यासाठी हे डिनर होतं ! मी म्हटलं कितीही जेवा, पण एकदाचं...एकदाचं...
बेटा : (उजळ चेहऱ्यानं) मला पीएम होऊ द्या ! हो ना, मनमोहन अंकल?
मनमोहनजी : (तडफेने) हं !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com