सरसकट माफीपत्र! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

सर्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंधितांसाठी अथवा टू हूम सो एव्हर इट मे कन्सर्न
सर्व महोदय व महोदया,
मी एक साधासुधा सिंपलसा आम आदमी असून, या महान देशातील भ्रष्टाचार सन्मूळ उखडून काढण्यासाठी मी राजकारणाच्या चिखलात उतरलो, त्यालाही आता चारेक वर्षे उलटून गेली. चार वर्षांत दोन गोष्टींनी मला फार छळले. खोकला आणि भ्रष्टाचार! समोर दिसणारा प्रत्येक मनुष्य भ्रष्टाचारात लिडबिडलेला असून, त्याला ‘दे माय धरणी ठाय’ करावे, अशी उबळ मला येत असे. सांगावयास समाधान वाटते, की अखेर दिल्लीच्या जनतेने मला सत्तारूपी मधाचे चाटण चाटवून माझा खोकला बरा केला आहे.

होय, भ्रष्टाचार हादेखील खोकल्यासारखा कधीही बरा न होणारा रोग आहे, असे माझे मत झाले होते; पण आता ते बदलले आहे. दोष माझ्या दृष्टीतच होता. गेल्या काही वर्षांत मी अनेक लोकांची मने दुखावली आहेत, असे मला नुकतेच ध्यानात आले आहे. ध्यानात आल्यावर माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिले. अरेरे, ह्या सज्जन लोकांना मी नाहक किती बोल लाविले? किती छळिले? किती नाही नाही ते आरोप केले? ह्याचे प्रायश्‍चित्त घेतल्याशिवाय राहायचे नाही, असा निश्‍चय मी आता केला आहे.
दोन दिवसांपूर्वी रात्रभर जागून मी मने दुखावलेल्यांची एक यादी लिहायला बसलो. पहाटेच्या सुमारास रात्र, कागद आणि पेनातील रिफिल असे तिन्ही संपले, तेव्हाच थांबलो.

लहानपणी आम्ही दुपारच्या वामकुक्षीच्या वेळेस एक मनोरंजक खेळ खेळत असू. शेजारपाजाऱ्यांच्या घराची कडी लावून बेल वाजवून पळून जायचे! दार वाजल्यामुळे झोपेतून उठून आलेल्या घरातील माणसाला दार उघडताच येत नसे व तो कोंडीत सापडून आतून दार वाजवू लागे!! ह्या खेळाचे थ्रिल मोठेपणी राजकारणाच्या आखाड्यात अनुभवायला मिळाले. त्याची झिंग चढली. राजकारणात असेच करायचे असते, असे मला वाटू लागले. पण...असो.

ज्यांच्या ज्यांच्यावर मी आरोपांची चिखलफेक केली, तो प्रत्येक माणूस लगबगीने कोर्टात जाऊन माझ्याविरुद्ध अब्रूनुकसानीचे खटले दाखल करू लागला, ह्याचे मला फार आश्‍चर्य वाटत असे. थोडेसे आरोप केले तर माणसाची अब्रू कशी काय धोक्‍यात येते? हे मला कळेना. लोकांनी आजवर कित्येकदा माझ्या अंगावर शाई, चपला, बूट आदी जंगम वस्तू फेकल्या. मी चुकूनही कधी ब्र काढला नाही. पण ह्या दुखऱ्या मनाच्या लोकांनी मला कोर्टात खेचले. हे सगळे खटले लढवत बसले तर पुढील साडेतीनशे वर्षे दिल्लीत राहावे लागेल, हे मला कळून चुकले. शेवटी माफी मागून मोकळे व्हायचे मी ठरवले.

...माझ्या यादीतील नावांपैकी काही लोकांना मी रीतसर माफीचे पत्र पाठवले आहे. तथापि, सगळ्यांना सेपरेट पत्रे पाठवायची ठरवली तर स्टेशनरीचा खर्च प्रचंड वाढेल, हे मध्य प्रदेशचे आदरणीय व सज्जन व कर्तृत्ववान मुख्यमंत्री श्रीमान शिवराजसिंह चौहानजी ह्यांनी लक्षात आणून दिले. त्यांच्या सूचनेनुसारच ‘टू हूम सो एव्हर इट मे कन्सर्न’ अशा मायन्याचे हे कॉमन माफीपत्र लिहिले आहे.
माफी मागतो!
खेद वाटतो!!
चुकले!!!
...असे ठळक टायपात लिहिले आहे. खाली माझी सही व शिक्‍का आहे. आमच्या पक्षाच्या कचेरीत माफीपत्रांचे छापील गठ्‌ठे आहेत. इच्छुकांनी त्याच्या प्रती (लागतील तितक्‍या) घेऊन जाव्यात, ही विनंती. कळावे. पुन्हा क्षमस्व. आपले चुकलेले लेकरू. आम आदमी.
ता. क. : ती. अण्णा, तुम्ही दयाळू आहात! माझे दैवत आहात!! तरीही तुम्ही मजला कोर्टात न खेचल्याने स्वतंत्र माफीपत्र धाडता येणार नाही, ह्याची कृपया नोंद घ्यावी. क्षमस्व. आ. आ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com