व्यायाम ! (ढिंग टांग)

व्यायाम ! (ढिंग टांग)

तसे पाहू गेल्यास आमच्यासारखे हरहमेशा चिंतनात बुडालेले आध्यात्मिक लोक प्राय: बैठ्या प्रकृतीचेच असतात. विश्‍वाची चिंता करणे हे तितकेसे सोपे नसते. पण आम्ही त्यात महारथ हासिल केली. त्यासाठी कष्ट उपसले. बालपणी आम्ही ह्या कामासाठी फडताळात जाऊन बसत असू. परंतु फडताळात झुरळांनी उच्छाद मांडल्याने ती जागा आम्हाला सोडावी लागली. हल्ली आम्ही ह्या कामी थोर दानशूर नागरिक प्रो. शेट्टी ह्यांच्या ‘लव्हली नाइट्‌स’ ह्या समाज मंदिरात रोज सायंकाळी सातनंतर जात असतो. पण ते एक असो.

काही दिवसांपूर्वी कुण्या विराट कोहली नामक तरुणाने आम्हाला निष्कारण डिवचलें. जिमखान्यात घाम गाळत ‘हुय्या-हुप्पा’ करणाऱ्या नरपुंगवांबद्दल आमच्या मनात कमालीचा आदर आहे. पण केवळ शारीरिक ताकद दाखवून वंचिताला असे हिणवणे योग्य नाही, असे आम्हाला वाटले.

...छाती फुटेस्तवर भसाभसा जोर काढून ‘‘आता तू काढून दाखव’’ असे सांगणाऱ्या माणसाशी आम्ही खरे तर बोलायलादेखील जात नाही. दंडाची बेटकुळी फुगवून ‘आता बोल’ असे विचारणाऱ्या माणसास आम्ही फार्तर ‘डराव डराव’ असे बेडकाचे आवाज तेवढे काढून दाखवू. ‘असेल हिंमत, ये सामोरा’ असा शड्डू ठोकणाऱ्या माणसास तर आम्ही (लांबूनच) नमस्कार करून दुसरा रस्ता घेणे पसंत करू. ‘देह ही मोलाची गोष्ट आहे. त्यास वृथा कष्टवू नये’, हे आमचे जीवनविषयक सूत्र आहे.

आमच्या आळीतील पू. बाबा बर्वे ह्यांनी त्यांच्या सदुसष्टाव्या वाढदिवशी सलग सदुसष्ट सूर्यनमस्कार घातले. दुसऱ्या दिवशी म्हातारा अंग आखडून इस्पितळाच्या खाटेवर पडला होता. त्यांच्या खाटेशी उभे राहून आम्ही त्यांस ‘‘बाबा, उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका घ्या कशाला?’’ असा चिंतनशील सवाल केला, तेव्हा पू. बाबा बर्वे ह्यांच्याकडे विव्हळण्यापलीकडे काही उत्तर नव्हते. तेही एक असो.
...योगासनांनी प्रकृती चंट राहाते, हे आम्ही ऐकून होतो. चटईवर अंग टाकून जमेल तितकेच हात-पाय हलवण्याचा हा प्रकार आम्हाला त्यातल्या त्यात बरा वाटला. शवासन ह्या सुप्रसिद्ध आसनात आम्ही अल्पावधीत प्रावीण्य मिळविलेदेखील... पण त्यापुढे आमची प्रगती होऊ शकली नाही. मयूरासनात दोन्ही हातांवर आडवा देह तोलण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन आम्ही पुढील दोन दांतांस गमावून बसलो. तेव्हापासून आम्ही योगासनांचेही नाव टाकले.

अंगाझटीला येणाऱ्या व्यायामखोरांशी आम्हा वैचारिकांचे तितकेसे जमत नाही, हेच खरे. मुळात रानवट सांडाप्रमाणे देह आणि प्रकृती जमा करून माणसाने नेमके साधावयाचे काय असते? हे आमच्या बुद्धिप्रामाण्यवादी मनाला कधी समजले नाही. तथापि, म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये, ह्या विचाराने आम्ही कुण्या विराट कोहली नामक नवविवाहित व्यायामखोराचे आव्हान स्वीकारले. आमच्या मस्तकी खून चढला. बाहू फुर्फुरुं लागले...

व्यायाम हा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा, हे आम्हाला ठाऊक होते. आम्ही तांतडीने आमचे गुरू व मार्गदर्शक व दैवत जे की श्रीश्री नमोजी ह्यांस गाठले. राजधानी दिल्लीतील लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासाच्या हिर्वळीवर त्यांनी आम्हाला व्यायामाची निरनिराळी प्रात्यक्षिके करून दाखवली. जळ-स्थळ-काष्ठ-पाषाणाच्या पाच बाय दहाच्या तुकड्यांवर त्यांनी लीलया चालून दाखवले.
‘‘पंचतत्त्वांच्या स्पर्शाने मला ऊर्जा मिळते... सांभळ्यो के?’’ ते म्हणाले. आम्ही ‘हो’ म्हणालो. वास्तविक ही ऊर्जा आम्हाला ढोकळा खाऊनही मिळते, असे आम्ही सांगणार होतो. परंतु तेवढ्यात एका पाषाणावर अचानक ते उताणे पडले !! वर आकाश, खाली पाषाण !!
‘‘तमे पण वर्जिश करजो... सांभळ्यो के?’’ पाषाणावरून उतरत नमोजी म्हणाले. आम्ही ‘हो’ म्हणालो.
....महागाईच्या पाषाणाखाली चिरडलेल्या अवस्थेत कसाबसा श्‍वास घेत जगत राहाण्याइतका थोर व्यायाम नाही, असे आम्ही त्यांना सांगणार होतो. पण राहून गेले !! चालायचेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com