खेड्यांकडे वळवा आरोग्यसेवांचा मोहरा

dilip mhaisekar
dilip mhaisekar

म हाराष्ट्र सर्वाधिक समृद्ध राज्य मानले जाते. एकूण देशांतर्गत उत्पन्नात (जीडीपी) राज्याचा वाटा १५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. तसेच एकूण करापैकी ४० टक्के कर भरणारे राज्य अशी आपली ओळख आहे. तरीही राज्यातील आरोग्य सेवेशी संलग्न मानकांची पातळी तेवढी समाधानकारक नाही. प्रसूतिपूर्व काळजी, बाल लसीकरण, प्रसूतीकाळातील काळजी यांसारख्या निरनिराळ्या आरोग्य सेवांच्या मानकांची स्थिती चिंताजनक आहे. थोडक्‍यात, ग्रामीण आरोग्याच्या सुधारणेला मोठा वाव आहे. मोठा भाग आरोग्यसुविधांपासून वंचित असणे हे विकासालाच मारक ठरते. राज्यात आरोग्यसेवा प्रामुख्याने शहरी भागात एकवटलेल्या आहेत व ग्रामीण भाग पुरेशा आरोग्य सुविधांपासून वंचित आहे. प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव, सोयींची कमतरता हे इतर घटकही याला कारणीभूत आहेत. आरोग्य सेवेत समतोल साधण्यासाठी ग्रामीण आरोग्य अभियानाद्वारे त्या भागात प्रभावी सेवा पुरवणे गरजेचे आहे. या बाबी विचारात घेऊन ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा’ने ग्रामीण आरोग्य सेवेचा दर्जा व स्तर उंचावण्यासाठी, तसेच ग्रामीण जनतेला नियमितपणे किमान मूलभूत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी ‘ग्रामीण आरोग्य बॅंक’ ही योजना सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. आरोग्य बॅंक म्हणजे आरोग्याचे ज्ञान, प्राथमिक उपचार, प्रतिबंध आणि संदर्भ सेवा या चारही सोयी एकत्रित देणारी व्यवस्था.

राष्ट्र सुदृढ व आरोग्यसंपन्न राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुधारण्याकरिता हवे योग्य पोषण, स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी आणि विश्‍वासार्ह आरोग्यसेवा. आजार होऊच नये यासाठी उपाययोजना, आरोग्य सुधारणांसाठी पूरक उपाय आणि आजार झालेच, तर वेळीच योग्य उपचार ही त्रिसूत्री आहे. ही त्रिसूत्री ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्‍यक आहे; पण दुर्दैवाने समाजात आरोग्य म्हणजे गोळ्या, इंजेक्‍शन आणि सलाईन असा गैरसमज आहे. औषधोपचार गरजेचे असतात, पण तेवढेच पुरेसे नाहीत. या संदर्भात जनजागृती करूनच अनेक गैरसमज दूर करता येतील.
ग्रामीण आरोग्य बॅंक स्थापनेमागील उद्देश महत्त्वाच्या आजारांचा लवकर शोध घेणे, योग्य उपचारांकरिता रुग्णालयात पाठविणे, काही महत्त्वाच्या आरोग्य सेवांसाठी प्रतिबंधक सेवा, आरोग्य संवर्धनासाठी नियोजबद्ध प्रयत्न, स्थानिक आरोग्य डाटाबेस - माहिती बॅंक निर्माण करणे आणि आरोग्य बॅंकेमार्फत प्राथमिक आरोग्यसेवा सार्वजनिक क्षेत्रात लोकसहभागी पद्धतीने रुजवणे हे आहेत.

ग्रामीण आरोग्य बॅंक ही लोकसहभागातून चालणारी प्रक्रिया आहे. ग्रामसभा घेऊन त्यात ठरवलेल्या ठिकाणी आरोग्य बॅंकेचे काम चालेल. ठराविक गावात डॉक्‍टर ग्रामपंचायतीने उपलब्ध केलेल्या ठिकाणी रुग्ण तपासतील. तसेच ग्रामपंचायतीच्या सहकार्याने नागरिकांना आरोग्य शिक्षण दिले जाईल. उदा. हिवताप होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, संतुलित आहार म्हणजे काय आदी. आजकाल चुकीच्या जीवनशैलीशी निगडित रोगांचे प्रमाण वाढत आहे, जसे उच्च रक्तदाब, मधुमेह इ. हे जीवनशैलीशी निगडित रोग ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही नियमित व्यायाम, संतुलित आहार व तणावमुक्त जीवनशैली याबद्दल शिक्षण देणे गरजेचे आहे. एकूणच उपचारांबरोबरच आजार होऊच नये यासाठीचे मार्गदर्शनही केले जाईल. आरोग्य बॅंकेच्या माध्यमातून गावांमध्ये केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणामुळे आरोग्याच्या समस्या व त्याची कारणे यावर प्रकाश पडेल आणि या माहितीचा उपयोग प्रभावी उपाययोजना करण्यासाठी होईल.
आजारांवर उपचार, आजार टाळण्यासाठीची उपाययोजना व आजार होऊच नये यासाठीचे शिक्षण या सर्वांवर ग्रामीण आरोग्य बॅंक या संकल्पनेतून लढा दिला जाणे अपेक्षित आहे. जेणेकरून प्रत्येक गावामधील प्रत्येक नागरिक सुदृढ होईल. सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांतील आंतरवासीय प्रशिक्षणार्थी हे या समाजोपयोगी उपक्रमासाठी काम करतील. यात बंधपत्रित डॉक्‍टर व खासगी डॉक्‍टरांचाही समावेश असेल.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका ही तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन, मुख्य तांत्रिक सनियंत्रण आणि माहिती विश्‍लेषण, प्रशिक्षण सुसूत्रीकरण आणि श्रेयांकन, निरनिराळ्या संस्थांशी संपर्क साधणे अशी असेल. या उपक्रमामुळे अप्रशिक्षित व्यावसायिकांकडून जनतेचे होणारे शोषण टळेल. गावातच चांगली प्रतिबंधक सेवा उपलब्ध झाल्यामुळे पुढील नुकसान टळेल. यातून रुग्णालयांवरचा भार कमी होऊ शकेल. त्यामुळे रुग्णालयांची गुणवत्ता सुधारेल. लवकर निदान व उपचारांमुळे आजारातील नुकसान टळेल. या उपक्रमामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला व्यापक आधार मिळेल. आरोग्यविषयक माहितीचा साठा तयार होईल. आरोग्य संवर्धन उपायांमुळे पोषण आणि आयुष्यमान वाढेल, असा विश्‍वास वाटतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com