पानगळीची शिकवण

पानगळीची शिकवण

बैठकीच्या खोलीतील कोळ्यांची जाळी काढत होतो. तशी ती गेल्याच आठवड्यात साफ केली होती, पण पुन्हा ती सकाळच्या उन्हेरी किरणांमध्ये चमचमताना दिसत होती. टीव्हीच्या आगंमागं, पुस्तकाच्या कपाटालगत रेशमी तंतूसारखी ती कोळ्यांची जाळी पसरली होती. माझं एकदम लक्ष गेलं ते खिडकीत ठेवलेल्या मनिप्लॅंटच्या कुंडीकडं. खिडकीच्या गजांचा, बांधलेल्या दोरीचा आधार घेत तो भरारत होता. त्याची ती कोवळी हिरवी पानं उजेडाच्या पार्श्‍वभूमीवर विलक्षण सुंदर दिसत होती. त्याचं वळणदार असणं, पानांचा रेखाटल्यासारखा आकार, लुसलुशीत हिरवा रंग आणि मधूनच वाकून पाहणारी चार-दोन पिवळीरंजन पानं, पाहतच राहावं असं हे दृश्‍य होतं. जाळी साफ करायची सोडून मी ते दृश्‍य पाहत राहिलो.

आपल्या दररोजच्या जगण्यातल्या अशा कितीतरी दृश्‍यांकडं आपण संवेदनशीलतेनं पाहू शकतो. त्यामागची विकसनाची एक नैसर्गिक व्यवस्था स्वस्थपणे न्याहाळू शकतो. अशीच व्यवस्था आपल्या आतही आहे, याची सार्थ जाणीव आपल्या दृष्टीला होऊ लागते; पण आपलं चित्त सदान्‌कदा टिकाऊपणाच्या पाठीस लागलेलं असतं. त्याचा अर्थ आपणास कुठं ठाऊक असतो? सुखाची अखेर कधीच होऊ नये, ते आपणास सतत लाभावं आणि त्याच्या विरोधातील स्थिती लवकरात लवकर संपून जावी, असंच आपणास वाटत असतं.

 आपला लौकिक अखंड असावा, आपल्या मुलांनी आपल्या मालमत्तेचा ओघ आटू देऊ नये, हीच आपली इच्छा असते. एवढंच नाही तर परस्परांमधल्या नातेसंबंधातसुद्धा आपल्याला शाश्‍वताची जाणीव हवी असते. कुठलंही नातं स्थितिशील थोडंच असतं? ते घटना-प्रसंगांनुसार पुढे पुढे जात असतं. नात्यामध्ये त्याचं स्वतःचं एक प्रवाहीपण असतं. नदीत पडलेल्या झाडाच्या प्रतिबिंबासारखं प्रहरागणिक ते बदलत असतं. ते स्वस्थपणानं जाणून घ्यावं लागतं. नात्यातील अशी स्वीकारशीलताच आपल्या आयुष्याला पिकल्या फळाचा रंग, गंध नि स्वाद देते. आपल्यातील ही उमज भवतालच्या सृष्टीकडं पाहण्याचं डोळसपण आपल्याला देते. आता ही जाणती दृष्टीच आपल्याला सांगते, की ‘झाडावरून गळून पडणाऱ्या पानासारखी इथली प्रत्येक गोष्ट नियत काळाची आहे. इथं काहीच सतत राहणारं नाही. बदल आणि अखेर अटळ आहेत.’

पानझडीतलं एखादं पानांवेगळं झाड आपण जेव्हा अशा संवदेनशील नवदृष्टीनं पाहतो तेव्हा निळ्याभोर आकाशाच्या पार्श्‍वभूमीवरली त्याची सुंदरता आपल्या दिठीला चेतना देते.
त्या झाडाच्या सर्व शाखा कशा कुणा प्रतिभावंत चित्रकारानं रेखाटल्यासारख्या दिसतात! त्या झाडाच्या पानांवेगळं असण्यात एक कविता असते, एक गाणं असतं. ते पानांवेगळं झाड आतली ओल सांभाळत वसंताची वाट पाहत असतं. वसंत आला की त्या झाडाला पानांची कविता स्फुरते. ती पानंही ऋतू बदलला की गळून पडतात अन्‌ भूमीची होतात - पुन्हा नव्यानं जन्म घेण्यासाठी.
जीवनाची वाटचाल अशीच असते, हे गळून पडणाऱ्या एखाद्या पानाकडूनही आपण सहज शिकू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com