अंतरीचा दीप

अंतरीचा दीप

पौष महिन्यातील सरत्या थंडीची एक संध्याकाळ होती. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सभागृहात ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संतांच्या जन्मदिनानिमित्त कविसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. व्यासपीठावर माझ्यासह एक कवी, कवयित्री आणि निवेदक बैठकीच्या गाद्यांवर मांडी घालून बसले होते. व्यासपीठाच्या मागील पांढऱ्याशुभ्र सुती पडद्यावर इंदिराबाईंचं एक चित्र जलरंगात रंगवलेलं होतं. चित्रात बाईंचा डाव्या बाजूला थोडा कललेला चेहरा, विरळ पांढरे केस, पसरटशा कपाळावर दोन्ही भुवयांच्या मधे लाल रंगाचे डाळीएवढे कुंकू...बाईंचा चेहरा कवितेच्या शोधात बुडालेला होता.

सभागृह श्रोत्यांनी गच्च भरले होते. श्रोत्यांचा आपसात बोलण्याचा स्वर त्या भरल्या अवकाशात उमटत होता. काही क्षणांतच कार्यक्रम सुरू होण्याविषयीची सूचना निवेदकानं उपस्थित श्रोत्यांपर्यंत पोचवली.
आम्ही सारे कवी कविता वाचनाच्या भावस्थितीत होतो. शेजारी बसलेल्या कवयित्री कवितांची वही उघडीत, खुणेच्या पानांवरली कविता मनातल्या मनात वाचीत. पुन्हा वही मिटून ठेवीत. वाचनाआधीची त्यांच्या चेहऱ्यावरली अस्वस्थता लपत नव्हती. एवढ्यात सभागृहातले दिवे गेले आणि त्या कवयित्री आपल्या मृदू स्वरात मला म्हणाल्या, ""मला किनई अंधाराची भीती वाटते. कधी येणार दिवे कुणास ठाऊक!'' मी त्यांच्या त्या शब्दांसह अंधाराला पाहू लागलो...

माझ्या मनात आलं, माणसांच्या जगात असा दिवा आहे काय, जो या सृष्टीतला अंधार उजळून टाकील? माणसानं ज्या दिव्यांची निर्मिती केली, ते सारेच दिवे आज नाही तर उद्या, त्या अनादी-अनंत अंधारात विझून जाणार आहेत. हे दिवे अवश्‍य पेटतील अन्‌ पुन्हा विझतीलही. मग हा अंधार असाच वस्तुमात्र व्यापून राहील. माणसांचं या भौतिक जगावेगळं अंतर्यामीचं एक अदृश्‍य जगही आहे. या जगात अंधार घनदाट झाला की सर्वदूर उजेड पसरतो. इथला अंधार तात्कालिक आणि उजेड शाश्‍वत असतो. एक आश्‍चर्य वाटण्याजोगी गोष्ट म्हणजे इथून अंधाराचं जग दूर अंतरावर असतं आणि उजेड खूप जवळ असतो. म्हणजेच अंधार बाहेर आणि उजेड आत दाटून असतो.

आपण अकारण अंधाराची भीती बाळगत असतो. खरंतर आपण अंतरीच्या उजेडातच बाहेरचं जग पाहू शकतो. हा अंतरीचा दीप चेतवणं आपल्याला का साधत नाही? आपणच निर्माण केलेल्या दिव्यांच्या सहवासात आपण सदान्‌कदा राहतो. या कृत्रिम दिव्यांवेगळा आणि सृष्टीतील सूर्य-चंद्रासारखा उजेड आपल्या आतही असतो आणि तोच चिरंतन असतो, हे भावसत्य आपण अजाणतेपणाने काळजाआड न करता उमजून घेऊया. काळजातला हा चिरंतन उजेड आपल्या साऱ्या भयांना संपवील. मनावरील काजळी दूर सारील. या लख्ख उजेडात आपली जन्मभराची वाटचाल सुखेनैव होत राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com