आयपीएलची कॅशलेस लॉटरी (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

यंदाच्या "आयपीएल'साठी झालेल्या लिलावात इंग्लंडच्या खेळाडूंना पसंती मिळाली, तर अफगाणिस्तानी खेळाडूंमुळे "आयपीएल'ची व्याप्ती वाढली. त्याचबरोबर नवोदित भारतीय खेळाडूंना प्राधान्य मिळाल्याने "आयपीएल'चा भर नवोदितांवर असेल हेच सूचित झाले. 

यंदाच्या "आयपीएल'साठी झालेल्या लिलावात इंग्लंडच्या खेळाडूंना पसंती मिळाली, तर अफगाणिस्तानी खेळाडूंमुळे "आयपीएल'ची व्याप्ती वाढली. त्याचबरोबर नवोदित भारतीय खेळाडूंना प्राधान्य मिळाल्याने "आयपीएल'चा भर नवोदितांवर असेल हेच सूचित झाले. 

"आयपीएल' लिलावाच्या निमित्ताने जी कोटीच्या कोटी उड्डाणे समोर आली, तिने क्रिकेट खेळाच्या श्रीमंतीचा पुन्हा एकदा प्रत्यय तर दिलाच; पण त्याचबरोबर खेळाच्या गुणवत्तेचा आणि प्रतिमेचा "बाजारा'त कशा रीतीने कस लागतो, याचेही दर्शन घडले. "बीसीसीआय'च्या प्रशासनात उलथापालथ झाल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाने विनोद राय यांची प्रशासन समिती नियुक्त केल्यानंतर ही उलाढाल "पारदर्शी' झाली असेल, अशी अपेक्षा आहे. मुळात "आयपीएल' हे एक मोठे मायाजाळ आहे. येथे रावांचे रंक झाले, तर कोणाला कोट्यवधींची लॉटरी लागली आहे. इंग्लंडचा बेन स्टोक्‍स यापैकी एक. वर्षभरापूर्वी भारतातच झालेल्या "ट्‌वेन्टी-20' विश्‍वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडचा विजय जवळपास निश्‍चित झालेला असताना स्टोक्‍सच्या अखेरच्या षटकांत चार षटकार मारले गेले होते.

"झिरो' झालेला हाच स्टोक्‍स वर्षभरात 14.50 कोटींचा धनी झाला. त्याच सामन्यात विजेत्या वेस्ट इंडीजकडून सर्वोत्तम ठरलेल्या मार्लन सॅम्युल्सला या वेळी मात्र कोणीही बोली लावली नाही. हीच खरी "आयपीएल'ची गंमत आहे. येथे इतिहासापेक्षा वर्तमानाचीच चलती असते. काही महिन्यांपूर्वी इंग्लंड संघातून खेळताना भारतात बेनने आपल्या अष्टपैलुत्वाचे "स्ट्रोक' दाखवले आणि आतापर्यंतच्या लिलावात परदेशी खेळाडूंमध्ये तो सर्वाधिक भाव खाणारा खेळाडू ठरला. या दहाव्या हंगामासाठी साडेतीनशेहून अधिक क्रिकेटपटू लिलावासाठी उपलब्ध होते; परंतु त्यातून 66 खेळाडूंचीच निवड झाली. यामध्ये 27 परदेशी आणि 39 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. यावरून परदेशी खेळाडूंची मागणी वाढल्याचे लक्षात येते. 

प्रत्येक "आयपीएल' लिलावासाठी एखाद्या देशाची "लाट' असते. या वेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी पसंती मिळाली. खरे तर इंग्लिश कौंटी स्पर्धेचे महत्त्व कमी करणाऱ्या "आयपीएल'कडे इंग्लिश खेळाडूंनी पाठ फिरवली आहे. "आयपीएल'मधून मिळणारी काही रक्कम त्यांना त्यांच्या इंग्लिश क्‍लबला द्यावी लागणार असली, तरी त्यांची पसंती "आयपीएल'चे महत्त्व वाढवते. यंदा अफगाणिस्तानच्या खेळाडूंनीही लिलावातून स्थान मिळवल्यामुळे "आयपीएल'ची व्याप्ती वाढली; पण इशांत, इरफान यांच्यासह चेतेश्‍वर पुजारा, आर. पी. सिंग, यांच्यासारख्या खेळाडूंकडे दुर्लक्ष करताना शशांक सिंग, आकाश दीप नाथ, महंमद सिराज, नवदीप सैनी अशा नवख्या खेळाडूंना स्थान मिळाले. यातून "आयपीएल'चा भर नवोदितांवर असेल हे सूचित करण्यात आले. "आयपीएल' लिलाव ही एक अभ्यास करण्यासारखी मोठी प्रोसेस आहे. येथील आकडेमोड कदाचित अर्थसंकल्पापेक्षाही किचकट असू शकेल. खेळाडूंवर खर्च करण्यासाठी आपल्याकडे असलेली शिल्लक रक्कम, लिलावासाठी उपलब्ध असलेले खेळाडू, त्यांची मूलभूत रक्कम आणि समतोल साधण्यासाठी योग्य खेळाडूला किती लाखांमध्ये बोली लावायची, हा खेळ मैदानावरील सामन्यापेक्षा चुरशीचा असतो. म्हणूनच लिलावाच्या टेबलावर संघमालकांबरोबर तज्ज्ञ बसलेले असतात. येथेही कधी कधी "गेम' केला जातोच. एखादा संघमालक एका विशिष्ट खेळाडूसाठी आग्रही असल्याचे जाणवताच तो खेळाडू मिळविण्यासाठी इतर संघमालकांकडून "त्या' खेळाडूचा भाव वाढवला जात असतो. अशा शह-काटशहाच्या खेळामुळे "आयपीएल'चा लिलावही तेवढाच "टीआरपी' वाढवणारा असतो. 

जुन्या-नव्यांच्या खेळाला प्राधान्य देताना रायझिंग पुणे सुपरजायंट्‌स संघाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाला पूर्णविराम दिला. "आयपीएल' लिलावाच्या आदल्या दिवशी घडलेल्या या घडामोडींमुळे धोनीसमर्थकांनाच नव्हे, तर तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींना धक्का बसला. धोनी कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यावर असला, तरी त्याने देशासाठी आणि त्याच्या अगोदरच्या चेन्नई संघासाठी जे यश मिळवले ते कोणालाही मिळवता आलेले नाही. धोनीने भारतीय एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची धुरा खाली ठेवल्यानंतर कदाचित पुणे संघाच्या मालकांनीही नव्या कर्णधाराचा विचार करण्यास सुरवात केली असावी. पण आर. अश्‍विन, अजिंक्‍य रहाणे असे खेळाडू संघात असताना ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथची निवड करून त्यांनी दुसरा धक्का दिला. मुळात गेल्या दोन मोसमात स्मिथ दुखापतीमुळे "आयपीएल' अर्धवट सोडून गेला होता. आता दोन दिवसांनंतर विराट सेनेविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत चार हात केल्यानंतर लगेचच एप्रिल-मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात "आयपीएल' खेळायची आहे.

त्यानंतर काही दिवसांतच इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकासाठी तयार व्हायचे आहे. स्मिथ हा ताण किती पेलू शकेल हा प्रश्‍नच आहे. केवळ स्मिथसाठीच नव्हे, तर सर्वच खेळाडूंसमोर हे आव्हान असेल. म्हणूनच ऑस्ट्रेलियाचा तेजतर्रार गोलंदाज मिशेल मार्शने अगोदरच "आयपीएल'ला बायबाय केले आहे. 2008मध्ये "आयपीएल' सुरू झाल्यावर त्या वेळी सर्व खेळाडूंचा लिलाव झाला होता. संघमालकांबरोबरचा करार या वर्षी संपेल आणि पुढल्या वर्षी नव्याने, कदाचित काही खेळाडू कायम ठेवून सर्व खेळाडूंचा नव्याने लिलाव होईल. त्यातच चेन्नई आणि राजस्थान यांच्यावरची बंदी उठली आणि त्यांचे पुनरुज्जीवन झाले तर पुढचा लिलाव अभूतपूर्व असेल. 

Web Title: editorial on ipl auction