एक पाऊल

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 24 मे 2018

नेहमीच्या परिचयाचा असलेला घरातला पुस्तकांचा कप्पा आवरणं, हे एखादा नवा शोध लागण्याइतकं विस्मयकारक असू शकतं, याचा विलक्षण अनुभव परवा आला. संदर्भासाठी संग्रहातलं एक पुस्तक हवं होतं. त्याचा आकार, मुखपृष्ठ, रंगसंगती हे सारं अगदी ओळखीचं होतं; पण पुस्तक नेमकं कुठं असेल, ते काही लक्षात येत नव्हतं. स्वतःकडं आकर्षून घेणाऱ्या अनेक वाटा पुस्तकांच्या कपाटात असतात. एखादं पुस्तक शोधायला जावं, तर दुसरंच हातांत येतं; आणि मग तेच गुंतवून ठेवतं. पानांमागून पानं उलटत आपण त्याच वळणांच्या रस्त्यांत फसतो.

नेहमीच्या परिचयाचा असलेला घरातला पुस्तकांचा कप्पा आवरणं, हे एखादा नवा शोध लागण्याइतकं विस्मयकारक असू शकतं, याचा विलक्षण अनुभव परवा आला. संदर्भासाठी संग्रहातलं एक पुस्तक हवं होतं. त्याचा आकार, मुखपृष्ठ, रंगसंगती हे सारं अगदी ओळखीचं होतं; पण पुस्तक नेमकं कुठं असेल, ते काही लक्षात येत नव्हतं. स्वतःकडं आकर्षून घेणाऱ्या अनेक वाटा पुस्तकांच्या कपाटात असतात. एखादं पुस्तक शोधायला जावं, तर दुसरंच हातांत येतं; आणि मग तेच गुंतवून ठेवतं. पानांमागून पानं उलटत आपण त्याच वळणांच्या रस्त्यांत फसतो. तिथं पूर्वीपेक्षा वेगळंच काही सापडणं, आधी वाचलेल्या गोष्टींचा नवा अर्थ उमगणं, ताज्या वाचनाला पूरक ठरू शकतील असे संदर्भ नव्यानं मिळणं असं काही काही या आवराआवरीत घडत राहतं. संग्रहात हवीतच म्हणून खरेदी केलेली पुस्तकं, सुहृदांनी कुठल्या तरी निमित्तानं भेटीदाखल दिलेली पुस्तकं, लेखकांच्या स्वाक्षरीची मोहोर उमटलेली भाग्यशाली पुस्तकं, रद्दीत टाकण्यासाठी काढून ठेवलेल्या गठ्ठ्यांत मिळणारी पुस्तकं असं मोठं दालनच या उद्योगातून समोर खुलं होतं. पुस्तकांच्या कपाटात शिरणं म्हणजे ‘खुल जा सिम सिम’च्या जगाचा अनुभव घेण्यासारखंच असतं. पुस्तकांचे विषय, त्यांची नावं, लेखकांचा दबदबा, त्यांच्या अभ्यासाचा आवाका यांचा कॅलिडोस्कोप फिरू लागला, की साहित्याची वेगवेगळी नक्षीदार दालनं खुली होत जातात; आणि त्यांतली कोणती नक्षी दृष्टीत पकडून ठेवावी, ते कळेनासं होतं.

अपेक्षित पुस्तक मिळेपर्यंतच्या माझ्या शोध-मोहिमेत छापील कागदांचं वेगळंच जग उलगडत गेलं. जुन्या पुस्तकांच्या पिवळसरपणाकडं झुकू लागलेल्या पानांतून, नाजूकपणानं हाताळायला हवीत अशा अवस्थेला आलेल्या पुस्तकांतून, नव्या कोऱ्या पानांच्या मुठींत अजून टिकून असणाऱ्या; आणि शालेय वयाची आठवण करून देणाऱ्या विशिष्ट गंधातून आठवणींचं भलं मोठं शिवार समोर पसरत गेलं. अशी एकेक आकर्षणं ओलांडून हव्या असलेल्या पुस्तकापर्यंत; आणि त्यातल्या संदर्भापर्यंत पोचायला बराच वेळ लागला, तरी तिथपर्यंतचा प्रवास सुखद आणि नवी दृष्टी देणारा होता. हे पुस्तक असं काही दडी मारून बसलेलं होतं, की त्याच्यापर्यंत जाण्यासाठी सारं कपाटच रिकामं करावं लागलं. आता सगळी पुस्तकं पुन्हा कपाटात ठेवायला हवी होती. मग पुस्तकांची विषयांनुसार विभागणी केली. आकारांनुसार ती एकत्र केली. ते गठ्ठे कपाटात ठेवू लागलो. सगळं आटोपल्यावर कपाट बंद करताना त्याची दारं पहिल्यासारखी नीट लागेनात. नीट शोध घेतल्यावर लक्षात आलं, की नेहमीपेक्षा वेगळ्या आकाराच्या एका पुस्तकानं हा गोंधळ केलेला होता. दाराला अडणारं ते पुस्तक थोडं मागं सरकवलं; पण त्यामुळं दुसरीकडल्या एका छोट्या पुस्तकानं मान पुढं काढली. मग त्या रांगेतलं दुसरं छोटं पुस्तक पुढं ओढून ठीकठाक केलं; आणि कपाटाची दारं व्यवस्थित बंद झाली.

काहींनी थोडं पुढं येणं; आणि काहींनी थोडं मागं जाणं अशा कृतींतून गुंतागुंतीचे अनेक प्रश्न सुटू शकतात, हे वास्तव यातून सामोरं आलं. दैनंदिन व्यवहारांत कधी पुढाकार घ्यायचा; आणि कधी माघार घ्यायची या सूत्रामुळं आपलं जगणं केवळ सुसह्यच नव्हे; तर अर्थपूर्णही होऊ शकतं. पुढाकार म्हणजे आक्रमण आणि माघार म्हणजे पराभव अशा कल्पना आपल्या मनात घट्ट झालेल्या असतात. त्यांतली दुसरी माघारीची कल्पना तर आपण विचारातही स्वीकारीत नाही. त्याचा संबंध आपण मानपानाशी जोडलेला असतो. वास्तविक, हे सारे केवळ आपल्या मनाचे खेळ असतात. वाहतूक कोंडीत अडकलेले एकमेकांना दोष देतात, उपदेश करतात, व्यवस्थेवर टीका करतात. इतकं करूनही, जोपर्यंत त्यांपैकी कुणीच काही करीत नाही, तोपर्यंत कोंडी दूर होत नाही. कोंडीतली वाहनं पुढं-मागं केली, की कोंडी सुटण्याचे मार्ग खुले होऊ लागतात. दोऱ्याचा गुंता सोडवितानाही त्याला बसलेल्या गाठी-निरगाठी सैल कराव्या लागतात. व्यावहारिक जीवनातही आपण वेगवेगळ्या गुंतागुंतींचा सामना करीत असतो. कधी काहींशी कटुता येते, मतभेदांची वादळं होतात, संतापाचे वणवे पेटतात; आणि संघर्षांची युद्धं होत राहतात. माणसं परस्परांना दुरावतात. इथं कुणी एखादं पाऊल पुढं टाकलं किंवा मागं घेतलं, तर संघर्ष संपविता येऊ शकतो. हा समजूतदारपणा कुणी दाखवायचा, ते वेळीच ओळखायला हवं. अशा गोष्टींना सकारात्मक प्रतिसाद म्हणून आपल्या पावलांत पुढं अथवा मागं जाण्याचा समजूतदारपणा आणून तर पाहू. ते जमलं, तर गैरसमजांचे, संघर्षांचे ढग विरळ व्हायला मग किती वेळ लागणार?

Web Title: editorial malhar arankalle wirte article phahatpaul