शेंगदाणे (पहाटपावलं) 

editorial
editorial

परवा शनिवार पेठेत गेलो. पंत, अण्णा, बापू आणि मी... गप्पा सुरू झाल्या. मनमोकळ्या गप्पा झाल्या आणि हास्याचा शिडकावा झाला की जगणे सहज वाटू लागते. चहाच्या धुक्‍याबरोबर किस्से देवाणघेवाण झाले की नवा हुरूप येतो. समाजातल्या सहज हास्य निर्माण करणाऱ्या गोष्टी, चुटकुले कधीकधी तत्त्वज्ञान सांगून जातात. अण्णांनी असाच एक चुटकुला सांगितला. 

एक माणूस पानाच्या दुकानात गेला... थोडा भोळा आणि थोडा बावळट दिसणाऱ्या या माणसाने पानवाल्याला "आहो... शेंगदाणे आहेत काय!'' म्हणून विचारले. विचित्र प्रश्‍न ऐकून पानवाल्याने त्रासिक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिले व म्हणाला, "अहो! हे पानाचं दुकानं आहे... इथे शेंगदाणे मिळत नाहीत.'' 

दुसऱ्या दिवशी पुन्हा तो त्याच दुकानावर गेला. ग्राहक उभे होते. दुकानदार पानपट्ट्यांना कात-चुन्याचे पाणी लावण्यात मग्न होता. तेवढा वेळ लोक राजकारणावर गप्पा हाणत होते. कुणी बाजूला मान खाली करून लाल पिचकारी टाकत होता. सर्वांच्या देखत त्याने पुन्हा वेड्यासारखा तोच प्रश्‍न विचारला... "काहो... तुमच्याकडे शेंगदाणे मिळतील काय'' दुकानदार चिडला व ओरडला, ""काल सांगितलं ना तुला... पुन्हा कशाला आलास कळत नाही काय... किराणाच्या दुकानात जा... इकडे येऊ नकोस...'' तो सटकला. 
पुन्हा तिसऱ्या दिवशी त्याला दुरून येताना दुकानदाराने पाहिले "हा कसा चिकटला... निरर्थक प्रश्‍न विचारतो... सतरा वेळा सांगून समजत नाही... वेळ घालवतो... आज बरोबर दम द्यायला पाहिजे' असे विचार त्याच्या मनात घोळू लागले. कदाचित पान खायला आला असेल... पाहू तरी... असे वाटून दुकानदाराने त्याच्याकडे प्रश्‍नार्थक पाहिले... तो बावरलेल्या नजरेने बघत पुन्हा म्हणाला, "काहो! शेंगदाणे मिळतील का...'' चिडलेल्या दुकानदाराला तिडीक उठली... त्यानं रीतसर धमकी दिली... ""चालता हो! पुन्हा दिसलास तर चाकूच घुसवीन तुझ्या पोटात.'' 

लगेच त्याने काढता पाय घेतला. पण चौथ्या दिवशी पुन्हा उगवला. काहीतरी खरेदी करायचे आहे, असा चेहरा करून त्याने विचारले, ""काहो! चाकू आहे का तुमच्याकडे'' काही न उमजून दुकानदार म्हणाला ""नाही बॉं'' लगेच त्याने पुन्हा तीच माळ ओढली ""हा! तर मग शेंगदाणे मिळतील का... 

अण्णांचा किस्सा संपला. हसून हलके झालो... घरी आलो... रात्री अंथरुणावर पडल्यावर डोक्‍यात विचार चमकला... त्या वेळी आपण त्या बावळटासारखे वागणाऱ्या मनुष्याला हसलो... पण आपणसुद्धा कधी कधी अशाच निरर्थक गोष्टी कवटाळून बसलो असतो ना... घटना घडून जाते... परिस्थिती बदलते... आजच्या भाषेत बोलायचे तर तो प्रसंग "आउटडेट' अथवा संदर्भहीन होऊन जातो; पण त्याची चिकट तार संपता संपत नाहीत. "सोड ना ते आता... किती पाणी वाहून गेलं मुळा-मुठेतून त्या घटनेनंतर... इतर लोकांना आता त्यात काही रस नाही... तूच आपला शेंगदाणे-शेंगदाणे करतोस...' 
आपल्या सभोवातच्या लोकांशी झालेल्या अप्रिय घटनांच्या संदर्भात आपण असा विचार केला तर... 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com