पराजय नावाचा इतिहास! (अग्रलेख)

football
football

गॅरी लिनेकर नावाच्या विख्यात माजी इंग्रज फुटबॉलपटूने काही वर्षांपूर्वी फुटबॉलची व्याख्या सहजपणे केली होती : ‘फुटबॉल हा एक सोप्पा खेळ आहे. बावीस खेळाडूंचे दोन संघ एका चेंडूपाठीमागे ९० मिनिटे पळ पळ पळतात..आणि सरतेशेवटी जर्मनीचा संघ जिंकतो!’ जर्मनीचा फुटबॉलच्या विश्‍वातील वादातीत वर्चस्व अधोरेखित करणारे लिनेकरचे उद्‌गार आता इतिहासजमा झाले आहेत. बुधवारी रशियातील फिफा विश्‍वकरंडक स्पर्धेच्या गटसाखळीतच गतविजेत्या जर्मनीला कोरियाच्या नवख्या संघाने दोन गोलची धूळ चारली. बलाढ्य जर्मन संघाला तीन आठवडे आधीच रशियातून गाशा गुंडाळावा लागला. युरोप आणि जगभरातील बहुतेक देशांमधल्या दैनिकांत दुसऱ्या दिवशी ‘जर्मनीचा पाडाव’, ‘विश्‍वाचा अंत’, ‘युगान्त’ असे मथळे झळकले. ‘ट्विटर’वर तर दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने खाल्लेल्या माराची चर्चा व्हावी, तसे प्रतिक्रियांचे लोंढे वाहू लागले आणि अजुनी वाहत आहेत. एकंदरीत हा पराभव जर्मनीच्याच नव्हे, तर जगाच्याच पचनी पडलेला दिसत नाही. असे का घडले? ह्याला अनेक कारणे आहेत. त्यातले प्रमुख कारण म्हणजे आजवरचा जर्मन इतिहास आणि लौकिक.

गेल्या ८० वर्षांत प्रथमच जर्मनीचा संघ विश्‍वकरंडकातून साखळी टप्प्यातच बाद झाला. १९३८ मध्ये जर्मन संघ असा लवकर स्पर्धेबाहेर गेला होता. तेव्हा अर्थात दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमत होते. जगभर हिटलरच्या नावाची भलीबुरी चर्चा होती. स्वित्झर्लंडच्या संघाकडून २-४ अशी हार खाऊन जर्मनी घरी परतला होता. यंदा ‘जनरल विंटर’चा विरोध नसतानादेखील रशियात जर्मनी गाडला गेला, असा इतिहास उगाळला गेला. गेली काही दशके जर्मनीचे खेळाडू फुटबॉलविश्‍व व्यापून आहेत. गतविजेता संघ म्हणून थेट अंतिम स्पर्धेत आलेल्या जर्मन खेळाडूंमध्ये आलेला एक प्रकारचा स्थैर्यभाव त्यांना अंतिमत: घातकी ठरला. अन्य छोट्या-बड्या संघांनी जर्मन संघाच्या बळकट आणि कमकुवत बाजूंचा अचूक अभ्यास करूनच मैदानात पाऊल ठेवले होते. खुद्द जर्मन खेळाडूंनी मात्र ही संधी दवडली होती. त्यात संघामध्ये अहंकाराची आणि दुफळीची भावना वाढीस लागली होती, अशी कबुली जर्मनीचा मिडफिल्डर क्रूस ह्यानेच पराभवानंतर दिली. ऐनवेळी आपण निस्तरून नेऊ, अशा समजुतीत राहिलेल्या ह्या बलाढ्य संघातल्या अतिरथी-महारथींना रणमैदानात ऐनवेळी कर्णासारखे निष्प्रभ ठरणे नशिबी आले. कोरियाविरुद्धची लढत हा तर जर्मनीच्या पतनाचा सर्वांत नीचतम बिंदू मानावा लागेल. नियोजित ९० मिनिटांच्या खेळानंतरच्या जादा वेळेत जर्मनीचा गोलकीपर मॅन्युएल न्यूर ह्याला गोलपोस्ट सोडून मधली फळी सांभाळण्याचा उत्साह नडला. कोरियाच्या सॉन ह्यून-किमने चक्‍क रिकाम्या गोलजाळ्यात चेंडू धडकावून दुसरा गोल नोंदवत जगज्जेत्या जर्मनीचा नक्षा संपूर्ण उतरवला. जर्मनीचे प्रशिक्षक जोकिम लो ह्यांनी आपल्या संघाच्या पराभवाचे वर्णन ‘धक्‍कादायक’ ह्या एका शब्दांत करून सारी जबाबदारी स्वत:वर घेतली. लो ह्यांनी गेल्याच महिन्यात प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ २०२२ पर्यंत वाढवून घेतला होता, हे विशेष. आता जर्मनीच्या संघाला संपूर्ण कायापालटाच्या प्रक्रियेतून जाण्यावाचून पर्याय नाही; अन्यथा २०२०मध्ये होणाऱ्या युरोकप स्पर्धेत ह्या संघाचा टिकाव लागणे अशक्‍य आहे, अशी टीका सर्वत्र होऊ लागली आहे. रशियात सुरू असलेल्या फिफा विश्‍वकरंडकात इतिहासातील काही राजकीय घटनांचे पडसादही उमटताना दिसताहेत. सर्बियाविरुद्धच्या लढतीत स्वित्झर्लंडच्या संघातील झाका आणि शाकिरी ह्या कोसोवोसमर्थक खेळाडूंनी गोल झाल्यावर अल्बानियन दुहेरी गरुडाची खूण हाताने करून प्रेक्षकांना चिथावले होते. राजकीय कुरापत काढल्याबद्दल त्यांना दहा हजार डॉलरचा दंड ठोठावला गेला, तर जर्मनीच्या पाडावानंतर समाजमाध्यमात पुतिन ह्यांच्या छायाचित्रासह ‘रशियात जर्मनी जिंकत नाही!’ असे वचन जगभर व्हायरल झाले. तेही बरेच बोलके आहे. ‘बीबीसी’वर विश्‍लेषण करणाऱ्या इंग्लंडच्या गॅरी लिनेकर ह्यांनी आता आपल्या फुटबॉलच्या व्याख्येत बदल केला आहे : ‘दोन संघ ९० मिनिटे खेळतात, पण सरतेशेवटी जर्मनी जिंकतेच असे नाही’ असा काळानुरूप बदल त्यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com