महापुरुषांच्या खांद्यावर ...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

यात्रा-जत्रांतले, घोळक्‍यातले जादूचे खेळ दाखवायचे, तर लहान मुलांना खांद्यावर घ्यावे लागते. आपल्या खांद्यावरून ही मुले तो खेळ आपल्यापेक्षाही अधिक चांगल्या तऱ्हेने पाहत असतात. हे एक प्रतीक/रूपक समजून आपण महापुरुषांकडे आपल्या सर्वांचे वडील म्हणून पाहू शकतो. मग वर म्हटल्याप्रमाणे लहान मुलांनी वडिलांच्या पायावर लोळण घेतली, तर जे वडिलांना दिसते, ते त्यांना दिसणार नाही. अर्थात, त्यांचे लहानपण हीच त्यांची मर्यादा होय. म्हणून वडिलांच्या खांद्यावर बसून त्यांनी अनुभवलेले, शिवाय त्यांच्यापेक्षाही पुढचे-लांबचे त्यांना अधिक स्पष्ट आणि चांगले दिसते. त्यामुळे त्यांचे ज्ञान अधिक समृद्ध होते.

यात्रा-जत्रांतले, घोळक्‍यातले जादूचे खेळ दाखवायचे, तर लहान मुलांना खांद्यावर घ्यावे लागते. आपल्या खांद्यावरून ही मुले तो खेळ आपल्यापेक्षाही अधिक चांगल्या तऱ्हेने पाहत असतात. हे एक प्रतीक/रूपक समजून आपण महापुरुषांकडे आपल्या सर्वांचे वडील म्हणून पाहू शकतो. मग वर म्हटल्याप्रमाणे लहान मुलांनी वडिलांच्या पायावर लोळण घेतली, तर जे वडिलांना दिसते, ते त्यांना दिसणार नाही. अर्थात, त्यांचे लहानपण हीच त्यांची मर्यादा होय. म्हणून वडिलांच्या खांद्यावर बसून त्यांनी अनुभवलेले, शिवाय त्यांच्यापेक्षाही पुढचे-लांबचे त्यांना अधिक स्पष्ट आणि चांगले दिसते. त्यामुळे त्यांचे ज्ञान अधिक समृद्ध होते. त्याचप्रमाणे महापुरुषांच्या खांद्यावर म्हणजे त्यांच्या ‘विचारांवर स्वार होणे’ असे म्हणता येईल. त्यांचे विचार समजून घेणे, अभ्यासणे, त्यानंतर नवीन ज्ञानाच्या-काळाच्या, संदर्भाच्या आणि स्वतःच्या बुद्धीच्या प्रकाशात त्यांची मांडणी करणे. असे केले तर आपण काळाची गरज पूर्ण करू शकू. महापुरुषांनी रात्रीचा दिवस करून, समर्पित जीवन जगून आपले विचार मांडलेले आणि कार्य केलेले असते. त्यामुळे कदाचित आणि आजच्या व्यग्र जीवनपद्धतीमुळे त्यांच्याइतके आपण करू शकणार नाही; पण म्हणूनच त्यांचा एक एक पैलू घेऊन, मात्र त्यांच्यासारखेच कष्ट घेऊन, समर्पित जीवन जगू शकलो, तर आपल्यालाही त्यांच्या त्या पैलूपुरते का होईना त्यांच्यापुढे एक पाऊल टाकता येईल. असे करण्याने त्यांचा अवमान होत नाही. ‘बाप से बेटा सवाई’ असे म्हणतात, त्याचे कारण मुलगा बापापेक्षा अधिक मोठा झाला तर बापाला आनंदच असतो. महापुरुषांनाही त्यांना ओलांडून पुढे जाणारा, मोठा होणारा समाजच अपेक्षित असतो. त्यासाठीच तर त्यांनी आपली हयात वेचलेली असते.

महापुरुषांचे ‘देवत्व’ या सहजविचाराला आडवे येते. त्यांनी मांडले, सांगितले, केले ते इतरांना तुम्हाला मला कोणालाच करता येणार नाही. कारण त्या व्यक्ती महान होत्या. त्यांच्यात दैवी सामर्थ्य होते. आपल्यात ते नाही, आपण फक्त त्यांच्यामागे चालायचे. त्यांनी सर्व विषय आणि समस्यांना हात घातला होता. आपल्याला ते शक्‍य नाही. त्यांची चिकित्साही करायची नाही. त्यासाठी आपल्याला त्यांच्यापेक्षा मोठे किंवा त्यांच्याएवढे व्हावे लागेल. पण तसे आपण होणारच नाही. मग आपण काय करायचे? त्यांचा अनुनय आणि त्यातून अनुयायी म्हणून वावरायचे! ओशो म्हणतात तसे एकदा महापुरुषांना देवत्व बहाल केले, की आपले काम सोपे होते. आपण कसेही वागायला मोकळे होतो. खरे तर, महापुरुष माणसे असतात नि आपणही. हे ओळखले, की महापुरुषांनी दिलेले संचित आणि केलेले कार्य पुढे नेणे, प्रसंगी त्यात भर टाकणे हे आपले कर्तव्य आहे, हे स्पष्ट होईल.

Web Title: Great men's shoulders ...

टॅग्स