मानवी प्रतिष्ठा आणि शांततेचा पुरस्कर्ता

मानवी प्रतिष्ठा आणि शांततेचा पुरस्कर्ता

"...स्पष्ट भूमिका घेतल्या पाहिजेत. तटस्थ राहिल्याने जुलूम करणाऱ्यांचा फायदा होतो. मानवी प्रतिष्ठा जेव्हा धोक्‍यात येते, तेव्हा राष्ट्राराष्ट्रांमधल्या सीमारेषा व मानापमान अर्थहीन होतात. एखाद्या विशिष्ट वंशाचा, धर्माचा किंवा विशिष्ट राजकीय मतांचा असल्याने एखाद्याचा छळ होत असेल तर तेवढ्यापुरता तरी तो जागतिक मुद्दा बनायला हवा.‘‘ 
शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार स्वीकारताना ईली वाईझेल यांनी केलेल्या भाषणातील हा अंश.
वर्णवर्चस्वाच्या कल्पनेने पछाडलेल्या नाझी राज्यकर्त्यांनी घडवून आणलेल्या नरसंहारात सर्वस्व गमावलेला सोळा वर्षांचा रूमानियन ज्यू मुलगा पुढे सातत्याने जगभरातल्या हिंसा, वंशविद्वेष आणि दडपशाहीविरुद्ध आवाज उठवत राहिला आणि 1986 मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराचाही मानकरी ठरला. कार्यकर्ता, लेखक, पत्रकार, प्राध्यापक आणि नोबेलविजेता असा हा थक्क करणारा वाईझेल यांचा प्रवास. त्यांच्या निधनामुळे एक पर्व संपुष्टात आले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नाझी फौजांनी 1944च्या मार्च महिन्यात हंगेरीचा घास घेतला. युरोपात पसरलेल्या असंख्य ज्यू कुटुंबीयांच्या वाट्याला आलेले नष्टचर्य एलिझर, ईलीच्या कुटुंबाच्याही वाट्याला आले. गावात मान असणाऱ्या या सुसंस्कृत कुटुंबाची रवानगी झाली ऑश्‍विझच्या छळछावणीत. तेथून बुशेनवाल्डमधली छळछावणी. ईलीच्या तिथल्या अस्तित्वाला ओळख होती, कैदी क्रमांकाची -ए 7713.
या नरक यातनांतून ईलीची 1945च्या एप्रिलमध्ये सुटका झाली, तेव्हा या अफाट जगात ईली एकटेच होते. त्यांनी फ्रान्समध्ये आश्रय घेतला. साहित्य, तर्कशास्त्र आणि मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला. वडिलांकडून मिळालेल्या मानवतेच्या विचारांचा वारसा, कळत्या वयात अनुभवलेलं युद्ध, तत्त्वज्ञानाचा अभ्यासक मार्टिन बुबेर, अस्तित्ववादाचा पुरस्कर्ता जॉं पॉल सार्त्र यांच्या भाषणांतून मिळालेला विचार आणि काफ्का, दोस्तोव्हस्की यांच्यासारख्या लेखकांनी ईलीतला कार्यकर्ता घडवला. 

 
विशीच्या उंबरठ्यावर ईली यांनी फ्रेंच आणि यिडीश वृत्तपत्रांसाठी लिहायला सुरवात केली. भूमिगत चळवळीतही काम केले. छळछावणीतल्या अनुभवांवर लिहिले. फ्रेंच भाषेतल्या या पुस्तकाचे प्रथम इंग्रजीत आणि नंतर तीस भाषांमध्ये भाषांतर झाले.
इस्रायलमधल्या एका दैनिकाचा प्रतिनिधी म्हणून ईली 1955 मध्ये अमेरिकेत गेले. छळछावण्यांतील कहाण्यांवर त्यानी 40 पुस्तके लिहिली. न्यूयॉर्क विद्यापीठाने 1972मध्ये त्यांना मानव्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून आमंत्रित केले. त्यानंतर त्यांनी बोस्टन आणि येल विद्यापीठांमध्येही अध्यापन केले. पत्नी मरियनसह त्यांनी "ईली वाईझेल फाउंडेशन फॉर ह्युमॅनिटी‘ ही संस्था साकारली. ईली वॉशिंग्टनमधल्या यूएस होलोकॉस्ट मेमोरियल म्युझियमच्या कार्यकारिणीचे प्रमुखही होते. इराणच्या अण्वस्त्रांना, हमासकडून युद्धात होणाऱ्या मुलांच्या वापराला विरोध करण्याच्या भूमिकेची दखल जगाने घेतली. विचारांशी बांधिलकी जपताना, ज्यूंच्या हत्याकांडातील हंगेरीच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर त्यांनी हंगेरीने दिलेला ग्रेट क्रॉस सन्मानही परत केला. अलीकडे सीरिया आणि युरोपातल्या हत्याकांडांबद्दल एका मुलाखतीत बोलताना त्यांनी ""आपण खरंच काही शिकलो आहोत का?‘‘ असा प्रश्‍न विचारला होता. या प्रश्‍नाला जगाला केव्हातरी उत्तर शोधावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com