शूर सागरकन्येला आंतरराष्ट्रीय सलाम

शूर सागरकन्येला आंतरराष्ट्रीय सलाम

केरळमधील कोडूनगल्लूरच्या राधिका मेनन पंचवीस वर्षांपूर्वी, १९९१ मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या झाल्या ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’त शिकाऊ रेडिओ ऑफिसर म्हणून रुजू झाल्या. तेव्हा ते पद मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. समुद्रात किंवा महासागरात संपर्कयंत्रणा खूप महत्त्वाची असते व तिचे सुकाणू राधिका मेनन यांच्या हाती आले होते. नंतर साधारणपणे पाच वर्षांपूर्वी ‘सुवर्ण स्वराज्य’ जहाजाच्या त्या कॅप्टन बनल्या. तेव्हाही ‘इंडियन मर्चंट नेव्ही’तल्या त्या पहिल्या महिला कप्तान ठरल्या अन्‌ आता हे असं पहिलंवहिलं बनण्याचं वैशिष्ट्य ‘इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशन’ अर्थात आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या शौर्य पुरस्कारापर्यंत येऊन पोचलंय. लंडनला होणाऱ्या संघटनेच्या अधिवेशनात त्यांना हा पुरस्कार दिला जाईल. परवा ही बातमी आली अन्‌ मेनन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. महिलांनी पादाक्रांत करण्याच्या कदाचित या अपवादात्मक क्षेत्रावरही कॅप्टन राधिका मेनन यांच्या रूपानं ठसा उमटवला गेला. 

गेल्या वर्षीच्या जूनमधली गोष्ट. मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या सात मच्छीमारांची ‘दुर्गाम्मा’ बोट बंगालच्या उपसागरात रौद्र वादळात सापडली. लाटांच्या तडाख्यात तिची होलपट झाली. इंजिन बंद पडलं. नांगर निखळून पडला. सात मच्छीमारांची उपासमार सुरू झाली. पंधरा वर्षांचा पेरला महेश ते पन्नाशी गाठलेला नरसिंह मूर्ती अशा विविध वयोगटातील गरीब मच्छीमारांच्या अन्नपाण्याचा साठा वादळाने गिळंकृत केला होता. मासे साठवण्यासाठी नेलेल्या बर्फाच्या आधारे ते कसेबसे जिवंत होते. ओरिसाच्या किनाऱ्यावरील गोपालपूरपासून अडीच किलोमीटर अंतरावर ‘सुवर्ण स्वराज्य’वरील अधिकाऱ्यांच्या नजरेस सागरी लाटांवर जीवन-मरणाचे हेलकावे खाणारी ‘दुर्गाम्मा’ दिसली. कॅप्टन राधिका मेननच्या नेतृत्वाखाली मर्चंट नेव्हीच्या शिपायांनी शौर्याचे अद्‌भुत उदाहरण जगासमोर ठेवताना त्या सात मच्छीमारांची सुटका केली. सुटकेची सगळी आशा नातेवाइकांनी सोडून दिली असताना ते सातही जण कुटुंबात परतले, ते कॅप्टन राधिकांनी दाखविलेल्या असामान्य शौर्यामुळे. त्याचा आता ‘ॲवॉर्ड फॉर एक्‍सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी’ पुरस्काराने जागतिक स्तरावर सन्मान होतोय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com