पुन्हा शिट्टी दुमदुमली (अग्रलेख)

shane watson
shane watson

‘आयपीएल’मुळे भारतासाठी अनेक तरुण खेळाडू प्रकाशझोतात आणले. त्यांच्या कामगिरीचेही प्रत्यंतर आले. आता त्यांना योग्य वेळी संधी उपलब्ध कशी होईल, हे पाहणे आवश्‍यक आहे.

कोणत्याही सांघिक खेळात प्रत्येक खेळाडूची गुणवत्ता कमी-अधिक प्रमाणात असते, तरीही एखादा संघ सर्वोत्तम कामगिरी करतो, तो त्यामागे प्रामुख्याने नायकाने केलेली संघउभारणी, प्रत्येकाला ‘मॅच विनर’ होण्यासाठी दिलेली संधी आणि पराकोटीचा आत्मविश्‍वास असतो. त्यामुळेच ‘चॅम्पियन संघ’ घडतो. असे संघ उभारण्यात ‘माही’र असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या ‘आयपीएल’चे विजेतेपद पटकावले, याचे खरे तर आश्‍चर्य वाटायला नको. त्याने संघच नव्हे, तर विस्कटलेले घर पुन्हा वसवले. घरातील प्रमुख व्यक्ती पुन्हा एकत्र तर केल्याच, शिवाय त्यांच्यासोबत इतरांना नको असलेल्यांनाही आपल्या घरात स्थान दिले आणि याच घराचा बघता बघता विजेतेपदाचा बंगला बांधला. दोन विश्‍वकरंडक, चॅम्पियन्स करंडक, कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान आणि आता तिसरे ‘आयपीएल’ विजेतेपद, क्रिकेट विश्‍वात ही श्रीमंती केवळ आणि केवळ महेंद्रसिंह धोनीकडेच आहे. ‘आयपीएल’ सुरू झाले तेव्हापासून त्याचा चेन्नई संघ बलवान होताच.  सुरेश रैना, द्वेन ब्रावो, फाफ डुप्लेसी, रवींद्र जडेजा हे त्याचे ‘सख्खे नातलग’ होते. पण, दोन वर्षांपूर्वी चेन्नई संघावर निलंबनाची कारवाई झाली, तेव्हा या नातलगांनी दुसरीकडे आसरा घेतला; पण निलंबन संपताच धोनीने पुन्हा नव्या घराची वीट रचली आणि प्रथम या नातलगांना घरात आणले. त्यानंतर मुंबई इंडियन्सने नाकारलेले अंबाती रायुडू, हरभजनसिंग, तर विराट कोहलीच्या बंगळुरुने दूर केलेल्या शेन वॉटसनलाही स्थान दिले. या सर्वांना आत्मविश्‍वास दिला आणि त्यातूनच सर्वांपेक्षा भारी संघ तयार केला. दोन वर्षांनंतर परतताना ज्या वानखेडे स्टेडियमवर गतविजेत्या मुंबईला हरवून पहिला सामना जिंकला, तेथेच दीड महिन्यानंतर विजेतेपदाचाही सामना चेन्नईने जिंकला, यालाच म्हणतात सातत्य आणि आत्मविश्‍वास ! बरोबर ११ वर्षांपूर्वी पहिल्या ‘आयपीएल’मध्ये सर्वोत्तम ठरलेल्या शेन वॉटसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही ‘गुडबाय’ केलेला आहे. तोच वॉटसन गतवर्षी कोहलीकडे असताना अपयशी ठरला होता; पण आता धोनीच्या संघातून खेळताना एकहाती अंतिम सामना जिंकून देत होता. धोनीच्या या कौशल्यामुळेच, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विराट कर्णधार असला, तरी तो अडचणीच्या वेळी धोनीचा सल्ला घेताना दिसतो. ही ‘आयपीएल’ धोनीसाठी आणि त्याच्या चेन्नईसाठी नवी ओळख देणारी होती. कारण संघाचा माजी ‘सीईओ’ आणि संघाची मालकी असलेल्या ‘इंडिया सिमेंट’चे मालक, तसेच ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई मयप्पन त्याच्या सट्टेबाजीमुळे या संघाची बदनामी झाली होती आणि गेल्या दोन वर्षांत वेगळ्या संघांतून खेळताना धोनीला आता तुझा उतरतीचा काळ सुरू झाला आहे, अशा प्रकारे ट्विटरवरून दिलेली टोचणी निश्‍चितच सलत होती. या सर्व प्रकारांना आणि विरोधकांना धोनी आणि चेन्नई यांनी दिलेले हे चोख प्रत्युत्तर आहे.   
एकीकडे धोनी आणि त्याच्या चेन्नई संघाची नवी सुरवात होत असताना गौतम गंभीर आणि युवराजसिंग अशा ‘टीम इंडिया’च्या आणि धोनीच्याच सहकाऱ्यांचा मात्र सूर्यास्त होत असल्याचे या ‘आयपीएल’मधून दिसून आले. मुळात भारतात प्रतिकूल परिस्थितीत खेळणे सोपे नसते. परदेशी खेळाडूंना तर मोठी आव्हाने पार करावी लागतात. पण, सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक विकेट घेणारा अनुक्रमे केन विल्यमसन आणि अँड्य्रू टाय ठरतो, तसेच फिरकीच्या खेळपट्ट्यावर अफगाणिस्तानचा, पण हैदराबाद संघातून खेळणारा रशीद खान सर्वांचे लक्ष वेधतो, हे भारतातील बदललेल्या क्रिकेट संस्कृतीचे उदाहरण आहे. याच रशीद खानचा सामना पंधरा दिवसांत बंगळूरमध्ये सुरू होणाऱ्या कसोटीत ‘टीम इंडिया’ला करायचा आहे. एकूणच काय तर ‘आयपीएल’मुळे भारतात खेळण्याची एक अदृश्‍य भीती परदेशी खेळाडूंमध्ये राहिलेली नाही. आता भारताला या स्पर्धेतून काय मिळाले, असा विचार करता रिषभ पंत, ईशान किशन, नितीश राणा, दीपक चहर असे काही नवे चेहरे पुढे आले. धोनीचा वारसदार म्हणून पंतकडे पाहिले जात होते; परंतु संधी देऊनही त्याने आमची निराशा केली. म्हणूनच पुढील विश्‍वकरंडकसाठी धोनीच हा प्रमुख यष्टिरक्षक असेल, असे निवड समितीचे अध्यक्ष प्रसाद यांनी जाहीर मत मांडले होते. या ‘आयपीएल’मध्ये जसे धोनीने स्वतःला पुन्हा सिद्ध केले, तसेच काम पंतनेही केले. १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक जिंकलेल्या संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ, शुबमान गिल, शिवम मावी या कोवळ्या खेळाडूंनीही आपली गुणवत्ता सादर केली. या आयपीएलने भारतासाठी अनेक तरुण खेळाडू प्रकाशझोतात आणले. आता त्यांना योग्य वेळी संधी मिळायला हवी, तरच ही ‘आयपीएल’ सुफल संपूर्ण होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com