अंतराचा धडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

मोकळ्या माळावर वावटळलेलं आवर्त यावं आणि मन नकळत त्यात भिरभिरत राहावं, तसे आपण सगळेच परस्परविरोधी भावनांना अनेकदा सामोरे जातो. यांपैकी एक भावना अनुभवलेली नसेल, तर दुसरीचं महत्त्व कळत नाही. अपयशी होतो, त्याला यशाचा जो अर्थ कळतो, तेवढा यशस्वी होणाऱ्याला कळत नाही. अपयश वाट्याला आलेली व्यक्ती यशाकडं वेगवेगळ्या दृष्टींनी पाहते. यशस्वी झालेल्याला अशा दृष्टिकोनांची गरजच वाटत नाही; कारण सोनचाफ्याच्या गंधभरल्या फुलांसारखं यश त्याच्या ओंजळीत असतं. यश म्हणजे विशिष्ट उद्दिष्टांपर्यंत पोचणं. स्पर्धकांपेक्षा किंचित वरचढ ठरणं.

मोकळ्या माळावर वावटळलेलं आवर्त यावं आणि मन नकळत त्यात भिरभिरत राहावं, तसे आपण सगळेच परस्परविरोधी भावनांना अनेकदा सामोरे जातो. यांपैकी एक भावना अनुभवलेली नसेल, तर दुसरीचं महत्त्व कळत नाही. अपयशी होतो, त्याला यशाचा जो अर्थ कळतो, तेवढा यशस्वी होणाऱ्याला कळत नाही. अपयश वाट्याला आलेली व्यक्ती यशाकडं वेगवेगळ्या दृष्टींनी पाहते. यशस्वी झालेल्याला अशा दृष्टिकोनांची गरजच वाटत नाही; कारण सोनचाफ्याच्या गंधभरल्या फुलांसारखं यश त्याच्या ओंजळीत असतं. यश म्हणजे विशिष्ट उद्दिष्टांपर्यंत पोचणं. स्पर्धकांपेक्षा किंचित वरचढ ठरणं. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकांतील अंतर अनेकदा नगण्य असतं; पण तेच मोठा फरक घडवून आणतं. क्रीडास्पर्धांत काही सेकंदांचा विलंब पराभूताला लक्ष योजनं दूर भिरकावून देतो. त्याच्या अंगावर अंधारजड पहाड ढकलून देतो. परीक्षेतील गुणांचा फरक असो; अथवा निवडणुकीतील मतांत पडलेलं अंतर असो, हेच अंतर आशा किंवा निराशा यांची दिशा निश्‍चित करतं. आपली सारी धडपड, धावाधाव हे अंतर कापण्यासाठी, प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी सुरू आहे.

जिंकलेल्याच्या शिरावर नेहमीच जयजयकाराचा मुकुट लखलखत असतो. त्याच्या यशाचं लक्षपेडी तेज सगळीकडं पसरलेलं असतं. जेता अनेकांचा आदर्श होतो. त्याचं अनुकरण करून कित्येकांना यशशिखर गाठायचं असतं. काहीशा अंतरानं हरलेला मात्र एकाकी, दुर्लक्षित असतो. कुणीच त्याला मोजत नाही. यशाची एक धुंदी असते; निदान काही काळापुरती तरी! पुढील कृतींना सिद्ध होण्याऐवजी, कोणीही जेता यशानं काही काळ स्थिरावतो. संथ होतो. पराभूत मात्र एकटेपणानं दडपून जातो. अंधारल्या दिशांनी चक्रावून जातो. नाण्याची दुसरी बाजू म्हणून तो अपयशाकडं पाहील, तर त्याला खूप शिकता येईल. नवी उभारी बांधून पुढील झेप घेण्याची तयारी करता येईल. यशापयशांतील अंतराचा नेमका अर्थ शोधता येईल. यशाकडं जाण्याची प्रकाशवाट त्यातूनच त्याला दिसू लागेल.

अपयश म्हणजे खरा गुरू. विशाल मनाचा. अपराध पोटात घेऊन क्षमा करणारा; पण त्याच वेळी विलक्षण आशावाद पेरणारा आणि उभारी देणारा. हा गुरू पराभूताला समजून घेतो; आणि त्याच्या पातळीवर उतरून शिकवितो. पुन्हा फेरजुळणी करून नव्या संघर्षाला सामोरं जाण्यासाठी सिद्ध करतो. यशापयशांतील अंतराचं तो विश्‍लेषण करतो. त्यात कुठं काय सुधारणा करावी, त्याचं मार्गदर्शन करतो. 

कुणी कधी जिंकतो, कधी हरतो. पूर्वी जिंकलेला पराभूत होतो, पूर्वीचा पराभूत नंतर जिंकतो. काहीशा ‘अंतरा’चे हे हेलकावे म्हणजेच तर माणसाचं आयुष्य; आणि त्याचा चढ-उताराचा रस्ता. यश प्रयत्नांचा परिणाम सांगतं; तर अपयश जगण्याचा अर्थ उलगडतं. अपयश माणसांना ‘अंतराचा धडा’ शिकवितं; आणि तो मात्र यशाकडंच नेतो. अपयशाच्या खाचखळग्यांवरून जाणाऱ्या वाटेच्या टोकाशी यशाचा झगमगाट आतुरतेनं आपली वाट पाहत असतो. अपयशाचे घोट यशाची तहान भागवितात; अपयशाची नव्हे!

Web Title: Malhar Arankalle article