प्रसन्न सूर

music
music
फिरण्याच्या रस्त्यावरल्या झाडांच्या दाटीत प्राजक्ताचं झाड जणू काही लपूनच बसलेलं असतं. त्याचं अस्तित्व एरवी लक्षातही येत नाही; पण सध्या चित्र वेगळं आहे. प्राजक्त आता काहीसा धीट झाला असावा. गर्दीतही ओळख ठळक करावी, असं प्राजक्ताकडं काही विशेष नसतं. ना रूप, ना रंग. कशाही पसरलेल्या फांद्या. त्यांचा पसाराही बेतासबात; मात्र प्राजक्त आता बेबंद झाला असावा. एरवीच्या संयमाचं ओझं त्यानं उतरवून ठेवलेलं असावं.

रोजच्या रस्त्यावरून जाताना मृदुल गंधाचे काही शब्द कानावर पडले. ती कुजबूज ऐकून पावलांची गती मंदावली. फुलांचे थेंब झाले किंवा थेंबांची फुलं झाली, तर ती कशी दिसतील, त्याचं चित्र प्राजक्ताच्या एका झाडाखाली उमटलं होतं. फुलांचे ओले गंध सभोवर टपटपले होते. फुलांचा रंग फार आकर्षक नाही; किंवा अगदी शुभ्रही नाही. पांढऱ्या रंगातून किंचित पिवळसर छटा वाहत असल्यासारखा. बाळाच्या भिरभिरत्या नजरेसारख्या सर्व पाकळ्या पूर्ण उमललेल्या. त्यांना जोडणारी बोटाच्या पेराएवढी नळी. भगव्या रंगाची. फुलाची एकूण प्रकृती नाजूकपणाकडं झुकणारी. हातांचा स्पर्श होण्याआधीच फुलाचा थेंब फिसकटून जाईल की काय, असं वाटणारी. अलगदपणानं फूल उचलून घेतानाही, तो स्पर्शभार सहन न होणारी. प्राजक्त चिमटीत घेताना हातांचंही जणू फूलच व्हावं लागतं. फुलानं फूल टिपून घ्यावं, तसा प्राजक्त हळुवार टिपावा लागतो. तो ओंजळीत गोळा करीत गेलो, तरी शरीराची उष्णताही त्याला सहन होत नाही. म्हणून ही फुलं एखाद्या मऊसूत कापडावरच गोळा करावी लागतात. खूप फुलं जमा झाली, म्हणजे पांढऱ्या कापडावर केसरिया रंगाच्या रेषांच्या चांदण्या काढल्यासारखं वाटतं. पाकळ्यांचे हात या चांदण्या उंच फेकून पुन्हा झेलून घेताहेत, असाही भास होत राहतो. चांदण्यांची ही झेलाझेली पाहताना झाडावर आकाशाचा तुकडा उतरून आल्याचा भास होतो.

केशरी दांड्याच्या नळीतून फुलांच्या गळ्यात मधाचे थेंब उतरत असणार; आणि तिथून ते ओघळताना त्यांचे लडिवाळ सूर होत असणार, असं मनात येत राही. त्याशिवाय का प्राजक्‍तफुलांचे गळे इतके गोड असतील? आधी असं कधीच वाटलं नव्हतं; पण त्या झाडाजवळ असताना पानांआड स्वरांचे वळसे झंकारू लागल्यावर याची खात्री झाली. फांद्यांच्या हिरव्या वाटांतून सुरांचं वारं फिरत होतं. गंधाचे लुसलुशीत आलाप सुरांना खुलवीत होते. झाडावर स्वरांच्या मेघांची दाटी झाल्यासारखं वाटू लागलं; आणि थोड्या वेळानं प्राजक्ताच्या गंधफुलांचे थेंब ओघळू लागले. पानांआडून एकेक फूल अलगद सुटत होतं. थेंब जमिनीवर पडल्यावर वेगवेगळ्या दिशांना तुषार फेकीत जातो; तसंच ही फुलंही गंधांचे कोवळे स्वरतुषार आजूबाजूला उधळीत होती. सुरांनी भरलेला ढग आणि त्यातून टपटपणारी सुरांची रिमझिम. सगळ्याच फुलांना ओघळण्याची, झाडावरून खाली उतरण्याची खूप घाई झाली होती. पाहता पाहता प्राजक्त रिता झाला; आणि तळाशी पडलेला सडा हळूहळू हिरमुसला होऊ लागला. फुलांचा गंध वाऱ्याचं बोट पकडून पुन्हा पानांच्या मुठींत जाऊन बसू लागला.

उन्हं तापू लागल्यावर मैफलीचे सूर थांबले. उद्याच्या नव्या पहाट-मैफलीसाठी वाद्यांची जुळवाजुळव सुरू झाल्याचं झाडाजवळ असतानाच जाणवत राहिलं. प्राजक्तफुलांसारखे आपल्यालाही रोज नव्यानं प्रसन्न सूर लावता येतील?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com