सर्जनाचा आविष्कार

सर्जनाचा आविष्कार

थंडीच्या बोटांची नखं सध्या चांगलीच टोकदार झाली आहेत नाही? आजूबाजूनं कधी येतात ते कळत नाही; पण अंगभर बोचकारे मात्र बोलत राहतात. तापमापकातल्या पाऱ्याचा अवखळपणा हवामान खातं पकडून ठेवतं; आणि आपण थंडीच्या बेरजा-वजाबाक्‍या अनुभवत राहतो. स्वेटर्स, स्कार्फ, शाली कपाटांतनं बाहेर निघतात. नेपाळी विक्रेतेही नेमके थंडीतच दिसू लागतात. घासाघीस न करता प्रेमळ शब्दांनी व्यवहार जमवितात. तिथला नेपाळी ऊबदारपणा लपेटून घेऊन माणसं थंडीच्या गर्दीतनं अंग सावरीत आपापल्या रस्त्यानं निघून जातात.

प्राण्यांच्या-पक्ष्यांच्या जगात त्यांचे नेपाळी भाईबंद येत नाहीत. थंडीचा मुकाबला करण्यासाठी त्यांचे मार्ग तेच शोधतात. चौफेर बघा. झाडंही कशी आक्रसून गेल्यासारखी, हातापायांच्या घड्या घालून गप्प उभी असल्यासारखी दिसताहेत. एरवी सावलीचं अर्घ्य देणाऱ्या झाडांच्या ओंजळी थंडीनं जणू मिटून गेल्यासारख्या झाल्या आहेत. मुळांनी ओढून घेतलेले पाण्याचे रेषाकार तंतूही जणू झाडांच्या खोडांतच गोठून बसले आहेत. अन्नपाण्याचा त्याग करून ब्रह्माच्या शोधासाठी कठोर व्रत आचरणाऱ्या एखाद्या यतीसारखं झाडांच्या पानांनीही कषायवस्त्र लपेटून घेतलं आहे. अखंड सूर्यसाधनेनं या पानांचं तापसतेज आता अधिकाधिक उजळत जाईल. झाडांशी जोडले गेलेले पानांचे हिरवे पाश एक-एक करीत हळूहळू सुटत-तुटत जातील. त्यांच्या जाळीदार कुडी वाऱ्याच्या झुळकांवर स्वार होतील; आणि त्याच झाडांच्या तळाशी त्यांचं मोक्षधाम शोधत राहतील.

पहिली कोवळी पालवी हसताना झाडांच्या राज्यात सर्जनाचा केवढा देखणा सोहळा रंगतो! मैफलीआधी वाद्यांची सुरावट जुळविली जात असताना, मृदुलस्वरांच्या निसटत्या जागांचे स्पर्श जाणवावेत; आणि स्वरमोही कर्णेंद्रियं तृप्त व्हावीत; तसंच काहीसं झाडाला जाणवू लागतं. झाडांवर बहरलेलं हे लोभस बाल्य बाळसं धरतं, रांगू लागतं, खोड्या करतं, लपाछपीच्या खेळात रंगून जातं. अलगद उमललेल्या कळीशी एके दिवशी त्याची गट्टी जमते. पानांच्या सळसळत्या कंठांतून स्वरकोवळी भावगीतं ऐकू येतात. झाडांवर फुलांचे नक्षीरंग खुलतात. झाडांभोवती पक्ष्यांच्या थव्यांच्या येरझारा वाढत जातात. पाडाला आलेली फळं ते फस्त करतात. ऋतू पालटतो. झाडांवरल्या गाण्यांचे सूर हरवून जातात. पानंही एकाकी होतात; आणि एके दिवशी गळून जातात.

पानगळीचं उभं वारं सुटलं, तरी झाडं जणू स्थितप्रज्ञच राहतात. पानगळीच्या विचारानं खंत करीत नाहीत. त्यांच्या डोळ्यांचे काठ ओलावत नाहीत. ती गलबलत नाहीत. सैरभैर होत नाहीत. कोमेजणं हा जसा निसर्ग आहे, तसंच फिरून उमलणं हाही त्याचाच सर्जनाविष्कार आहे. पानगळीच्या काळातही झाडांच्या मनांत नव्या पालवीच्या इंद्रधनूची सप्तरंगी कमान हसत असते. या रंगांतून झाडावर पुन्हा सौंदर्याचा पुष्पमंडित पिसारा फुलणार असतो. या सृष्टिचक्रावर झाडांची श्रद्धा असते. छोट्या-छोट्या प्रसंगांनी कोमेजणारी माणसं नव्या आशेनं पुन्हा बहरण्याची ही जिद्द झाडांकडून नक्कीच शिकू शकतील!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com