'ड्रॅगन'च्या न गोठणाऱ्या महत्त्वाकांक्षा (मर्म) 

Marathi Article_Editorial_Sikkim_Bhutan_Tibet_Chaina
Marathi Article_Editorial_Sikkim_Bhutan_Tibet_Chaina

सिक्कीम-भूतान-तिबेट त्रिसंगमाजवळ डोकलाम पठारावर चीनच्या 1800 सैनिकांनी तळच ठोकला आहे. हाडे गोठवून टाकणाऱ्या थंडीत या भागात वास्तव्य करणे ही अतिशय जिकिरीची बाब आहे; तरीही चिनी विस्तार-वर्चस्ववादी आकांक्षा असल्या थंडीनेही गोठण्याची शक्‍यता नाही, हे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी जूनमध्ये या भागात अचानक रस्ता बांधायला घेऊन चीनने भारतापुढे सुरक्षात्मक आव्हानच निर्माण केले होते. तो डाव यशस्वी होऊ शकला नाही, हे वास्तव "ड्रॅगन'ला चांगलेच झोंबले. या रस्त्यामुळे सामरिक व्यूहरचनेसाठी चीनला जो मोठा फायदा झाला असता, तो भारताच्या दृष्टीने अत्यंत धोक्‍याचा होता. तांत्रिकदृष्ट्या त्या वेळी चीनने भारताच्या प्रदेशावर आक्रमण केले नव्हते, तरीही सामरिक व्यूहरचनेच्या दृष्टीने भारताला दखल घेणे भाग होते. त्यामुळेच भारतानेही तेथे सैन्य तैनात केले आणि चिनी सैन्याच्या रस्ता बांधण्याच्या उपद्‌व्यापाला स्पष्ट आणि ठाम विरोध केला. चीनने बराच कांगावा केला. भारताबरोबर युद्ध सुरू होऊ शकते, अशी वक्तव्ये त्यांच्याकडील मंत्र्यांपासून ते प्रसिद्धी सचिवांपर्यंत अनेकांनी केली. भारतावर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न झाला; पण त्या दबावापुढे न झुकता भारताने परिस्थिती संयमाने हाताळली. चीनच्या दंडेलीपुढे भारत नमते घेत नाही, हा संदेश त्यातून जगाला गेला आणि छोट्या शेजारी देशाबद्दलची बांधिलकी कोणतीही किंमत देऊन पाळतो, हेही जगाला दिसले. भारताचे हे यश चिनी मिजासीला डंख देणारे होते. त्यामुळेच आता "पीपल्स लिबरेशन आर्मी'ची तुकडी इथे कायमस्वरूपी वास्तव्यासाठी आणून ठेवण्याचा डाव चीनने टाकलेला दिसतो. या भागातील आपले कुटिल इरादे चीन चालूच ठेवणार, याचा इशारा लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सप्टेंबरमध्येच दिला होता, तो खरा ठरला. 

अतिशय अरुंद अशा चुम्बी खोऱ्यात व्यूहात्मक अनुकूलतेसाठी चीनचा डोकलाम भागावर डोळा आहे. त्यामुळे आपली सुरक्षा अणि हित सांभाळण्यासाठी भारताला चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवावे लागेलच; त्याचवेळी कोणत्याही चिथावणीला बळी न पडता प्रतिकार करावा लागेल. आशियातील एकमुखी वर्चस्वाला शह देऊ शकेल, अशी शक्ती भारत हीच आहे, याची जाणीव असल्याने चीन अप्रत्यक्षरीत्या दबाव वाढवित नेण्याच्या खेळी करीत राहणार अशीच चिन्हे आहेत.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com