पहाटपावलं : गागर में सागर

विनय पत्राळे
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

खरे पाहता पुणेच काय पिंपरी, ठाणे, नाशिक, नगर, कोल्हापूर, नागपूर, जळगाव... सर्वत्र लघू भारत आहेच.

अलीकडेच पुण्यात एका अद्‌भुत कार्यक्रमाला उपस्थित होतो. पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. भारतातल्या अठरा प्रांतांतील पुण्यात निवास करणारे लोक तेथे एकत्र आले होते. कुणी राजस्थानी पगडी बांधली होती, तर कुणी दक्षिण भारतीय पांढरे भस्म लावून पांढऱ्या लुंगीत होते. काही महिलांनी आसामी मेखला, तर काहींनी बंगाली पद्धतीची साडी नेसली होती. शीख तर गर्दीतही ओळखू येतात; पण आसामी विद्यार्थी त्यांच्या चेहऱ्याच्या विशिष्ट ठेवणीमुळे लक्षात येत होते. त्या गर्दीत सिंधी लोक होते, नेपाळी होते, गुजराती व्यापारी होते, काश्‍मिरी होते. बिहारी, हरयानवी होते, तर ओडिशा, राजस्थानचेही होते. एका लहानशा हॉलमध्ये इतक्‍या प्रांतांचे लोक एकत्र पाहून "गागर में सागर'सारखी "मिनी इंडिया इन पुणे' अशी अनुभूती येत होती.

कार्यक्रमाचे स्वरूप सामाजिक रक्षाबंधनाचे होते; पण तत्पूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. काश्‍मिरी मुलींनी दक्षिण भारतीय नृत्य केले. मेघालयाच्या विद्यार्थ्यांची एक प्रस्तुती, गुजरातचा गरबा... असे देशाच्या चारही टोकांची वैशिष्ट्ये दर्शविणारे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. विशेष म्हणजे हे सर्व लोक काही पिढ्यांपासून पुण्यात वसणारे, अस्खलित मराठी बोलू शकणारे असे होते. त्यांच्या स्वतःच्या प्रांतीय संस्था त्यांनी स्थापन केलेल्या आहेत आणि त्याच्या अंतर्गत ते सांस्कृतिक कार्यक्रम करत असतात, अशी माहिती मिळाली. "भारत-भारती' संस्थेमुळे संपूर्ण देशापुढे आपला कार्यक्रम करण्याचे समाधान मिळाले, अशी भावना त्यातील कलाकारांनी व्यक्त केली.

पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी द्रोपदीने आपला भरजरी शालू फाडून त्याची पट्टी कृष्णाच्या जखमेवर बांधली, ती पहिली राखी असून, त्याची परतफेड कृष्णाने कुरु सभेत वस्त्रहरण होत असताना भरपूर साड्या पुरवून केल्याचे सांगितले. प्रत्यक्ष बहीण नसलेल्या स्त्रीने रक्षणाची जबाबदारी घेण्याची आपली संस्कृती आहे, याचा त्यांनी उल्लेख केला.
नंतर सभागृहातील सर्व महिलांना राख्या वाटण्यात आल्या व त्यांना दुसऱ्या प्रांतातील कुणाला तरी धर्माचा भाऊ मानून राखी बांधण्यास सांगण्यात आले. नवीन झालेल्या या भाऊ-बहिणींनी एक दुसऱ्यांना सहकुटुंब घरी येण्याचे निमंत्रण दिले. आता यापुढे 26 जानेवारीला भारतमातापूजन कार्यक्रमासाठी भेटू, अशी घोषणा "भारत-भारती'चे संयोजक प्रकाशजी यांनी केली.

गेल्या दहा वर्षांपासून पुण्यात हा अद्‌भुत प्रयोग सुरू आहे. स्वतःची वैशिष्ट्ये जपून पुण्याशी समरस झालेला लघू भारत डोळ्यांसमोर प्रगट झालेला पाहण्याचे भाग्य या कार्यक्रमामुळे लाभले. 26 जानेवारीला याचा नवीन आविष्कार असणार आहे. प्रत्येक प्रांतासाठी एक स्टॉल राहणार असून, त्यावर प्रांतातील महिलांनी बनविलेला त्यांच्या प्रांतातला विशिष्ट खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असेल. एकाच मैदानावरील आनंद मेळाव्यात भारतातील प्रत्येक प्रांताच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. हे सर्व माझे लोक आहेत आणि पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेत सांगितल्याप्रमाणे "सारे भारतीय माझे बांधव आहेत' याची अनुभूती यामुळे येणार आहे.

खरे पाहता पुणेच काय पिंपरी, ठाणे, नाशिक, नगर, कोल्हापूर, नागपूर, जळगाव... सर्वत्र लघू भारत आहेच. सर्वत्र असा प्रयोग व्हायला हवा. देशाला एकत्र बांधणारी ही "कॅप्सुल' आहे. राष्ट्रीय मन तयार करणारी ही प्रयोगशाळा आहे. संकुचित भाषावाद व प्रांतवादाच्या आजारपणावरचे हे औषध आहे.

Web Title: marathi news article pahat pavale by vijay patrale