पूर्वेला रोज नवं...

Malhar-Arankalle
Malhar-Arankalle

आत्ता, अगदी या क्षणी पूर्वेला पाहा तर खरं. नुकत्याच उमललेल्या फुलांचा कोवळा गंध हळूहळू दाट होत घमघमून जावा, तसा उगवतीचा सर्जनोत्सव वाढत्या वेळेनुसार गडद होत चालला आहे. पूर्वेला गुलालमुठी उधळल्या जात आहेत. बाळाची पावलं हवेत नाचताना, गुलाबी रंगाच्या एकमेकींत मिसळून जाणाऱ्या छटांचा मऊ पडदा तयार व्हावा, तसे भास मनात उगवू लागले आहेत. आधी गडद, नंतर काहीसा फिकट आणि पुढं वाऱ्यावर अलगद पसरत चाललेला गुलाल वेगवेगळे चित्राकार रेखाटू लागला आहे. गुलाबी रंग मिसळलेल्या पाण्यावर तरंग वाहत राहावेत, पाण्यावर त्यांच्या रेषा ठळक दिसत राहाव्यात, तसं काहीसं सकाळच्या वेळी मनात दुथडी भरत चाललं आहे. गुलाबी तरंगांच्या कधी लाटा होताहेत, कधी त्यांचे भोवरे गरगरताहेत; तर कधी त्यांची भरती दृष्टीला व्यापून टाकते आहे. आपण यात गुंगून गेलो असतानाच अचानक उजेडाचं राजद्वार खुलं झालं आहे; आणि वितळलेल्या सोन्याचा रस सगळीकडं धावू लागला आहे. वेलींनी आळस झटकला आहे; पण झाडांच्या जांभया अजून पुरत्या संपलेल्या नाहीत. पानांचे आळोखेपिळोखे त्यांच्या हालचालींतून दिसत आहेत. अवखळ पाखरांच्या चोची घरट्यांबाहेर लुकलुकू लागल्या आहेत. त्यांतील काही पाखरं झुळकीचं बोट पकडून कधीच झेपावली आहेत. त्यांच्या भावंडांची चुळबूळ झाडांच्या पानांआड सुरू झालेली आहे. खोडकर मूल पकडून ठेवलं, तरी मनातून त्यानं केव्हाच धूम ठोकलेली असते, अगदी त्याच ओढीनं झाडावर राहिलेली पाखरं जणू तशीच झेपावलेली आहेत. झाडांच्या फांद्याफांद्यांवर पक्ष्यांची गुबगुबीत फुलं चिवचिवाट करू लागली आहेत. 

पूर्वेचा लालिमा वाढत चालला आहे. आकाशाच्या गाभाऱ्यात तेजाच्या आगमनाची तयारी गजबजू लागली आहे. सूर्यबिंबाचे दूत सगळीकडं आधीच पोचले आहेत. लालबुंद पूर्वेच्या मखमलीवर सुवर्णरेखांची रांगोळी दिसू लागली आहे. रांगोळीचे ठिपके सोन्याच्या तारांनी जोडले जाऊन तिथं शुभचिन्हांचे विविधाकार उमटत आहेत. आता कोणत्याही क्षणी सूर्यबिंब उगवून येईल, असे कवडसे मनात पसरले असले, तरी अजूनही काही क्षणांची प्रतीक्षा उंबरठ्यावर रेंगाळते आहे. डोळ्यांची बिंबं स्थिरावून आपण थांबलेलो आहोत; आणि नजरबंदी व्हावी, तसं काही तरी पुढ्यात साकारत चाललं आहे. कोवळी उन्हं उगवून येत आहेत. सकाळची घाई जाणवू लागली आहे. तो तेजोगोल आता नजरेच्या टप्प्यात साठविता येणार, असं वाटत असतानाच, त्यानं दिलेला चकवा मनाला चुटपुट लावून निसटला आहे. सूर्य उगवून आला आहे. पूर्वेच्या महोत्सवाचा उत्कट क्षण समोर उलगडतो आहे. आपण तो कधी नीट पाहतो का? झेपावणारं पाखरू नजरेनं क्वचितच टिपता येतं. जाणवते ती त्याची हवेच्या पडद्यावरची आवेगी झेपच. उत्कट क्षणांचं हेच वेगळेपण असतं. ते सहजी हाती लागत नाहीत. 

कसबी शिकाऱ्यासारखी एकाग्रता अंगी असेल, तर मात्र कधी ना कधी तुम्ही उगवतीचा क्षण पकडण्याचा सोहळा अनुभवू शकाल. हे दर्शन तुम्हाला अंतर्बाह्य बदलून टाकील. पुढच्या सगळ्याच दृश्‍यांत तुम्हाला नवेपणा जाणवत राहील. उन्हं धमक पिवळी होत चालली आहेत. रस्ते जागे झाले आहेत. पाना-फुलांची लगबग सुरू आहे. पाणवठ्यांच्या वाटा पावलांच्या कुजबुजींनी बोलक्‍या होऊ लागल्या आहेत. वाऱ्यांचे झोत भवताल व्यापून वाहू लागले आहेत. पाखरांच्या भराऱ्यांनी जणू हवेलाही पंख फुटू लागले आहेत. सारा दिवस मग त्या आनंदाचं बोट पकडून आपोआप पुढं जात राहतो. पूर्वेला रोजच हे नवं घडत असतं. आजचं नवं उद्या बदललेलं असतं. मन उमलून यायला, फुलून जायला हेच तर हवं असतं. पूर्वेची हा नवलाई तुम्ही पकडून ठेवाल? ताज्या-प्रसन्न दिवसासाठी... 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com