मध्यस्थ! (ढिंग टांग!)

Dhing Tang
Dhing Tang

स्थळ : किल्ले मातोश्री, वांद्रे संस्थान. 
वेळ : सणासुदीची. 
प्रसंग : रक्षाबंधनाचा. 
पात्रे : राजाधिराज उधोजीमहाराज आणि त्यांचा कदीम सेवक मिलिंदोजी फर्जंद. 
................................. 
(प्रवेश : अखेरचा, अंक : अखेरचाच!) 
उधोजीराजे : (येरझारा घालून दमगीर होत) कोण आहे रे तिकडे? 
मिलिंदोजी फर्जंद : (लगबगीने येऊन मुजरा करत) मुजरा म्हाराज!! 

उधोजीराजे : (फर्मान सोडत) रक्षाबंधनाची तयारी कुठवर आली? 
मिलिंदोजी : (मान हलवत) गडावर कंप्लीट लायटिंग केलेली आहे! सर्व्यांना नवा ड्रेस घालून येयाला सांगणेत आले आहे!! महालाच्या आवारात भलाथोरला मांडव घातला असून खुर्च्या मांडल्या आहेत!! लाऊड स्पीकर लावला आहे...त्यावर भाई-बहनाची गाणी वाजवली जात आहेत!! सर्व काही आलबेल आहे, म्हाराज!! 

उधोजीराजे : (प्रसन्नपणे) आजचा दिवस रक्षाबंधनाचा!! फार्फार पवित्र दिवस...बरं!! 
मिलिंदोजी : (कोड्यात पडत)...पन गंडा घालायला कोणीही अजून फिरकल्यालं नाही, म्हाराज! हे कसं? 

उधोजीराजे : (कळवळून) गंडा घालायला? काय रे तुझी ही भाषा!! हा गंडा नव्हे, फर्जंदा, हे भावानं बहिणीच्या रक्षणासाठी बांधलेलं बंधन असतं! ती एक जबाबदारी असते!! ती एक...ती एक... 
मिलिंदोजी : (खट्याळपणाने जीभ काढत) ती एक डोकेबाज आयडिया असते!! 

उधोजीराजे : (खवळून) खामोश!! तुझी हातभर लांब जीभ हिसडून तुझ्याच मनगटाला बांधीन!! आमच्या संस्कृतीला नावं ठेवणाऱ्याचा मुलाहिजा आम्ही ठेवत नसतो, हे माहीत नाही काय तुला? 
मिलिंदोजी : (जीभ गपकन आत घेत) चुकलं! गरिबाला माफी करा, म्हाराज! 

उधोजीराजे : (किंचित संकोचत) बरं, बरं...आम्हाला राखी बांधायला आमच्या माता-भगिनींपैकी कोण कोण येणार आहे आज? यादी वाचून दाखव जरा!! 
मिलिंदोजी : (अदबीने) राखी बांधायला कोणी भगिनी आलेल्या नाहीत...येणार बी नाहीत!! 

उधोजीराजे : (ठामपणाने) अशक्‍य!! आजच्या दिवशी आमच्या मणिबंधावर रक्षाबंधन बांधण्यासाठी शेकडो बहिणी वर्षभर वाट पाहात असतात!! एव्हाना रांग लागायला हवी!! 
मिलिंदोजी : (खुलासा करत) बस सर्विस बंद आहे नव्हं!! येणार कश्‍या? 

उधोजीराजे : (बुचकळ्यात पडत) बस सर्विस बंद आहे? आमच्या मुंबापुरीतील बस सर्विस सर्वात बेस्ट आहे, हे विसरलास वाटतं!! आज तर आम्ही माता-भगिनींची तिकिटे फाडू नका, असं फर्मानच काढलं आहे!! इस्ट ऑर वेस्ट, बेस्ट इज बेस्ट!! 
मिलिंदोजी : (खालच्या आवाजात) बेष्टवालेच महालाच्या दाराशी खोळंबलेत, म्हाराज! 

उधोजीराजे : (खेकसून) बस चालवायचे सोडून ते इथं का आलेत? सणासुदीला बेस्ट बस बंद ठेवणं हा सरासर गुन्हा आहे म्हणावं!! त्यांना काय हवं आहे? 
मिलिंदोजी : (चाचरत) प...प...पगार! 

उधोजीराजे : (खवळून) आत्ता पगार? ही काय पगार मागण्याची रीत झाली? त्यांना म्हणावं, आधी बसमध्ये जाऊन गिअर टाका! पुढच्या स्टॉपला पगार मिळेल!! 
मिलिंदोजी : (अजीजीने) ते संपावर गेलेत म्हाराज! 

उधोजीराजे : (संतापाचा कडेलोट होत) संपावर जावोत, अथवा पंपावर!! आधी आमच्या माता-भगिनींची त्यांच्या भावांशी भेट घडवून आणा!! त्यांच्या जाण्यायेण्याची व्यवस्था करा!! मग पगार!! सणासुदीला असे हात पिरगाळणे आम्हाला मंजूर नाही!! ह्याची गंभीर दखल आम्ही घेतली आहे, म्हणावं!! 
मिलिंदोजी : (दुप्पट अजीजीने) मागला पगार होऊन लई टाइम झाला, म्हाराज! दातावर माराया पैका उरला नाही, म्हंत्यात!! पगार टाका, लग्गीच गिअर टाकतो, असं म्हंत्यात ते लोक!! 

उधोजीराजे : (विचार करत) अस्सं होय!...बाऽऽरं!...त्यांना सांगा, दहा तारखेपर्यंत पगार करतो, आत्ता ताबडतोब गिअर टाका!! जा, झटकन जाऊन निरोप दे त्यांना!!...(काही काळ वाट पाहून) जा की!! उभा का राहिलायस इथं शुंभासारखा? पळ..!! 
मिलिंदोजी : (खालमानेनं) माझा बी पगार गेल्या सहा म्हैन्यांत झाला नाही, म्हाराज! तेव्हा... 
(उधोजीराजे तलवार उपसून त्याच्या मागे धावतात. पडदा.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com