फुटबॉल : एक समालोचन! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

...एरव्ही हाच लाथाळ्यांचा खेळ आमदारे बंद दाराआड खेळतात, असे काही चहाटळ म्हणतील. आम्ही तसे म्हणणाऱ्यांचा फुटबॉल करू!! आपल्या लाडक्‍या पुढाऱ्यांना पहिल्यांदाच औटडोअर खेळायची संधी मिळाली, हे का कमी भाग्याचे आहे?

विधिमंडळाच्या आवारात महाराष्ट्रातील आमदारांनी फुटबॉलचा सामना खेळला, ही घटना अभूतपूर्व आणि ऐतिहासिक म्हणावी लागेल. सभापती इलेवन आणि अध्यक्ष इलेवन ह्या दोन संघांत झालेल्या बहारदार लढतीची साग्रसंगीत वर्णने एव्हाना सर्वांना माहीत झालीच आहेत. तेव्हा ते आम्ही हेतुपुरस्सर टाळतो आहो. फक्‍त महत्त्वाच्या क्षणचित्रांचा आढावा घेतला तरी काम भागेल! 

वाचकहो, महाराष्ट्रात फुटबॉलचे वादळ यावे, ह्यासाठी पुढाऱ्यांनी आपले एकेक पाऊल पुढे घातले, हे खचितच अभिनंदनीय आहे. त्यासाठी खास विधिमंडळाच्या पार्किंग लॉटमध्ये प्रथमच फुटबॉलचे मैदान तयार करण्यात आले. ह्या भूमीवर फुटबॉलचा थरार पहिल्यांदाच पाह्यला मिळाला. असे म्हणण्याचे कारण म्हणजे ही भूमीच समुद्रात भराव घालून तयार करण्यात आली असल्याने येथे फुटबॉलचा सामना याआधी होण्याचे काही कारणच नव्हते. असो. 

...एरव्ही हाच लाथाळ्यांचा खेळ आमदारे बंद दाराआड खेळतात, असे काही चहाटळ म्हणतील. आम्ही तसे म्हणणाऱ्यांचा फुटबॉल करू!! आपल्या लाडक्‍या पुढाऱ्यांना पहिल्यांदाच औटडोअर खेळायची संधी मिळाली, हे का कमी भाग्याचे आहे? अनेक आमदारांना खेळायचे होते, परंतु, टीशर्ट नीट न बसल्याने काही लोक ह्या क्रीडानंदास मुकले, असे समजते. काही लोकांच्या गळ्यातूनच टीशर्ट उतरला नाही, तर काही लोकांचा पोटाच्या किंचित अलीकडे अलगद अडकला. एका आमदाराला तर आम्ही स्वत: ह्या शृंगापत्तीतून सोडविले. एका आमदाराने स्मॉलसाइज टीशर्ट मी घालत नसतो, असे बाणेदारपणाने सांगितले. टीशर्टग्रस्त आमदारांची नावे आम्ही घेणार नाही, कारण त्यातील वेदना प्रस्तुत लेखक समजू शकतो. (वाढत्या वयाच्या व देहाच्या वाचकांनीही समजून घ्यावे. थॅंक्‍यू!) पुन्हा असो. 

मुद्दा एवढाच की, अनेक आमदारांना फुटबॉलची मजा लुटण्यापासून वंचित राहावे लागले. उदाहरणार्थ, आमचे परममित्र आणि महाराष्ट्राचे नेमार जे की धनाजीराव मुंडे हे नेमके (शिवसेना खासदारांसारखे) सेण्डल घालून आलेले!! त्यामुळे खेळजोडे घरीच राहिल्याची हळहळ व्यक्‍त करीत त्यांना गुडघे चोळत (तात्पुरत्या) स्टेडियममध्ये बसावे लागले. मा. श्री. धाकले धनी ऊर्फ दादाजींचेही तसेच. त्यांचे पाय शिवशिवत असलेले, आम्ही स्वत: पाहिले आहे!! असो, असो! 

आमदार संग्राम थोपटे ह्यांनी अचूक गोल साधल्याने त्यांच्या श्‍वशुरांनी तिथल्या तिथे त्यांस प्रापर्टी दिल्याचे समालोचक मा. नानासाहेब फडणवीस ह्यांनी जाहीर केले. परंतु, दुसऱ्याच मिनिटाला एक गोल खाल्ल्याने ती प्रापर्टी काढून घेतल्याचेही स्पष्ट करण्यात आले. कमळ पक्षाचे पुढारी मा. शेलारमामा ह्यांना मैदानात धावताना बघून शिवसेनेच्या आमदारांना उकळ्या फुटत होत्या. तेही एक असो. 

सदर लढतीत खासे मा. मुख्यमंत्री फडणवीसनाना उतरणार होते, पण त्यांच्या पायास भोवरी झाल्याने त्यांनी खेळावयास नकार दिला. तथापि, ह्या लढतीची त्यांनी उत्तम कामेंटरी केली. सुप्रसिद्ध 'सैराट' चित्रपटात त्यांनी अधिक सुप्रसिद्ध समालोचक श्रीमान नागराज मंजुळे ह्यांना डबिंग केले होते, हे फारसे कोणास माहीत नाही. (पण आम्ही सांगतो!) सैराटमधील (बिली बाऊडन फेम) कामेंटरी वस्तुत: नानासाहेबांनी केली होती, पण नागराजनानांनी ती स्वत:च्या नावावर खपविली, ही वस्तुस्थिती आहे. सदर सामन्याचे समालोचन आपणच करावे, अशी त्यांना गळ घालताच क्षणी त्यांनी माईकचा ताबा घेतला. त्यांचे प्रारंभीचे उद्‌गारच अत्यंत बोलके होते. ते असे : माझ्या बंधूंनो, आणि बांधवांनो,...(माइकवर टिचकी वाजवत)...ऐकू येते का बे? का नुसतंच बोंडकं बसवलंय?... 
असोच!