एनाराय! (ढिंग टांग!)

Dhing Tang
Dhing Tang

बेटा : (हातात प्रचंड मोठी ब्याग घेऊन) हे देअऽऽ... 
मम्मामॅडम : (वर्तमानपत्र वाचण्यात मग्न...स्वत:शीच) कठीण आहे गं बाई ह्या देशाचं... 

बेटा : (गॉगलच्या आत आठ्या...) हे देअऽऽ...हे देअऽऽर...(मोठ्यांदा ओरडत) हे ऍम बॅक मेऍऽऽम...(शेवटी नाइलाजाने कानाशी जाऊन) ढॅणटढॅऽऽऽऽण!! 
मम्मामॅडम : (दचकून वर्तमानपत्र फेकत)...ओह गॉड, तू होय! कित्ती दचकले मी!! 

बेटा : (हिरमुसल्या सुरात) एवढी जोरदार एण्ट्री घेऊनही तुझं लक्ष नाही! ह्याला काय अर्थय? 
मम्मामॅडम : (अपराधी आवाजात) पेपरात गढून गेले होते जरा!... बरं ते जाऊ दे! कसा झाला प्रवास? 

बेटा : (आंगठा दाखवत) टॉप!! 
मम्मामॅडम : (जावळातून पंजा फिरवत)...बाकी अमेरिका गाजवलीस हं!! शाब्बास!! 

बेटा : (विजयी मुद्रेने) वेल, 'गाजवली' इज ए व्हेरी शॉर्ट वर्ड!! 'वाजवली' म्हणा हवं तर! अमेरिकेत यंदा तीन वादळं आली...इरमा, मी आणि तिसरं...(नाव आठवत नसल्याने) थर्ड वन!! पब्लिक बेहद्द खुश होतं माझ्यावर!! 'पुढल्या वेळेला आम्ही तुमच्या मोदीजींचा शो लावणारच नाही, तुमचाच लावणार' म्हणून शब्द दिलाय मला आयोजकांनी!! हल्ली त्यांच्या शोला फार रिस्पॉन्स मिळत नाही म्हंटात! मी म्हटलं, तारीख आधी कळवा म्हंजे झालं! मी काय आज इथं असतो, उद्या तिथे!! तारखा तर जुळल्या पाहिजेत!! हाहाहा!! 
मम्मामॅडम : (कौतुकाने पाहात) कम्मॉलच केलीस हं! वाटलं नव्हतं, एवढा बदल होईल तुझ्यात!! आता तुझा राज्याभिषेक करुन टाकावा असंच वाटायला लागलंय मला!! 

बेटा : (दुर्लक्ष करत)...मी म्हणालो, ''गांधी, नेहरू, डॉ. आंबेडकर सगळे झाडून एनआरआयच होते! एनाराय असलं की देश उभा करणं सोपं जातं! तुम्ही ऑलरेडी एनाराय आहात, तेव्हा तुम्ही हे काम करून टाका!! मीसुद्धा वर्षातून दोन वेळा फॉरेन टूर मारतो, ते केवळ एनाराय स्टेटस मिळवण्यासाठीच! लोकांना वाटतं मी सुट्ट्या मारतो!! अंहं!! मी जेव्हा जेव्हा फॉरेनला जातो, तेव्हा देशासाठीच जात असतो !!''... लोकांनी काय टाळ्या वाजवल्या माहितेय? 
मम्मामॅडम : (हादरुन जाऊन...) थांब, भुकेला असशील!! पटकन आंघोळ करून घे, गरमागरम खा आणि झोप काढ छानपैकी!! दमला असशील ना? (ब्यागेकडे बघत) तुझे पंधरा दिवसांचे कपडेही धुवायचे आहेत की रे!! 

बेटा : (हाताची घडी घालून कवितेच्या ओळी म्हणत)... तू न रुकेगा कभी, तू न थमेगा कभी...कर शपथ, कर शपथ...अग्निपथ, अग्निपथ!! हे कपडे धुवायचे नसून नव्याने वापरायचे आहेत मम्मा! आयम गोइंग बॅक!! 
मम्मामॅडम : (ब्यागेकडे कटाक्ष टाकत) तू आत्ता अमेरिकेहून येतोयस ना? 

बेटा : (मान हलवत) येस!! 
मम्मामॅडम : (बुचकळ्यात पडत) मग आत्ता जातोयस म्हणालास ना? 

बेटा : (गंभीर चेहऱ्यानं) येस, येस! 
मम्मामॅडम : (कमरेवर हात ठेवून निक्षून) एक काय ते ठरव आणि सांग! येतोयस की जातोयस? 

बेटा : (दुप्पट गंभीर चेहऱ्यानं) बोथ! दोन्हीही!! 
मम्मामॅडम : (गोंधळ कमी करण्यासाठी) तू अमेरिकेहून आलास! बरोबर? 

बेटा : (दोन्ही हात मागे बांधू) ट्‍रु!! 
मम्मामॅडम : (ब्यागेकडे बघत) ही बॅग तिथली...प्रवासाची. राईट? 

बेटा : (गूढ स्मित करत) ..रॉंग! मी अमेरिकेच्या टूरवर होतो, आता ही गुजरात टूरची ब्याग आहे!! एक ब्याग ठेवायची, दुसरी उचलायची!! दॅट्‌स लाइफ मम्मा!! 
मम्मामॅडम : (तक्रारीच्या सुरात)...हल्ली जरा पाय टिकत नाही तुझा घरात! ते काही नाही!! आता नाही जायचं गुजरातला!! उगीच कशाला जिवाची तडतड करायची? काहीतरीच तुझं!! तुझा राज्याभिषेक झाला की मी जबाबदारीतून मोकळी!! मग तू आणि तुझा पक्ष...घाला काय गोंधळ घालायचाय तो!! 

बेटा : (सबुरीचा सल्ला देत) ओह मम्मा! जस्ट चिल...आय ऍम रेडी फॉर राज्याभिषेक, पण...पण आधी 'एनाराय स्टेटस' तरी मिळू दे मला!! हाहा!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com