डोकलाम वाद : भारतीय मनोबलाची कसोटी (शशिकांत पित्रे)

शशिकांत पित्रे
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

डोकलाममधील पेचाबाबत सध्या तीन पर्याय समोर दिसताहेत. चीनने कोणताही पर्याय वापरला तरी या घटनेमुळे भारतीय राज्यकर्त्यांचे आणि सेनादलांचे मनोबल नथुला, चोला किंवा सुमडोरोंग घटनांप्रमाणे वाढणार आहे. 

सोळा जून 2017 च्या कुमुहूर्तावर भारतासाठी चीनबरोबर एका नवीन आघाडीचे सूतोवाच झाले. 1962चे युद्ध लडाख आणि नेफामधील तवांग व वलॉंग आघाड्यांवर घडले. 1967च्या ऑक्‍टोबरमध्ये सिक्कीमच्या प्रसिद्ध नथूला खिंडीत त्याआधी आणि नंतरही कित्येक वर्षे डोळ्यास डोळा भिडवून समोरासमोर मोर्चेबंदीत वावरणाऱ्या भारतीय आणि चिनी पलटणीमध्ये अचानक झटापट झाली. त्याच महिन्यात चोला खिंडीत दोन सैन्यात चकमक झाली. 1987मध्ये अरुणाचल प्रदेशातील सुमडरॉंगचू नदीच्या परिसरात चीनने घुसखोरी केल्याचे लक्षात आल्यावर भारतीय सैन्याच्या ब्रिगेडला तिथे तातडीने विमानमार्गे हलविण्यात आले. भारताचा प्रतिसाद इतका तत्काळ आणि मोठ्या प्रमाणावर असेल, याची चीनने कल्पनाच केली नव्हती.

चीनने धमकावण्या दिल्या; परंतु भारताचे परराष्ट्रमंत्री एन. डी. तिवारी यांच्या एकाच चीन भेटीनंतर वातावरण निवळले. वरील घटनांत दखल घेण्याची गोष्ट म्हणजे 62च्या युद्धातील भारताचा दारुण नि निर्णायक पराभव सोडला, तर बाकीच्या सर्व घटनांदरम्यान मोठ्या प्रमाणावर युद्ध झाले तर नाहीच, उलट प्रत्येक वेळी भारतीय सैन्याचा सैनिकी व नैतिक विजयच झाला.

गेल्या जूनमधील डोकालाम पठारावरील दोन सैन्यातील सुंदोपसुंदीनंतर चीन भारतावर या वेळी हल्ला करून भारत-चीन युद्ध तर घडविणार नाही ना, या शंकेचे उत्तर वरील ऐतिहासिक घटनाक्रमात दडलेले आहे. 

डोकलाम हा चीनच्या मालकीचा प्रदेश नाही, दुसरे म्हणजे भूतानच्या संरक्षणासाठी धावून जाण्याची कारवाई ही भारत आणि भूतानमधील करारानुसार आहे आणि तिसरे म्हणजे 'भारत-भूतान- चीन'मधील सीमेच्या या भागातील त्रिसंगामात तिघांच्या संमतीशिवाय चीन कोणताही बदल करू शकत नाही; या युक्तिवादाच्या आधारावर दोन्ही सैन्यांनी माघार घ्यावी, ही भारत सरकारने घेतलेली भूमिका सयुक्तिक आणि रास्त आहे. गेला दीड महिना तसूभरही कोलाहल न माजवता भारत सरकार धीरोदात्तपणे आणि अविचलतेने आपल्या भूमिकेचा पाठपुरावा करत आहे.

उद्दाम,आक्रमक पवित्र्याला दिलेला हा चिवट प्रतिकार आहे. त्याउलट चीनने मात्र भारताविरुद्ध एक पराकोटीचे 'मानसिक युद्ध' हाती घेतले आहे. सुन्झू या त्यांच्या तत्त्वज्ञ पूर्वजाने दिलेला 'शस्त्रांविना युद्ध जिंकण्याचा' मंत्र राबविण्याचा ते प्रयत्न करताहेत. त्यांची अधिकृत आणि तथाकथित खासगी माध्यमे,कनिष्ठ दर्जाचे मंत्री, परराष्ट्र विभाग, सैन्यदलाचे प्रवक्ते व संरक्षण विश्‍लेषक या सर्वांनी भारताने आपले सैन्य मागे घेतले नाही, तर युद्ध भडकण्याच्या धमक्‍यांचा एकच कल्लोळ उडवून दिला. नेहमीच चालत राहणाऱ्या लष्करी कवायतींच्या जुन्या चित्रफिती दूरचित्रवाणीवर ठळकपणे प्रसारित करण्यात आल्या. राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांनी चिनी सैन्याच्या नव्वदाव्या वर्षाच्या समारंभानिमित्त एका भव्य परेडला सैनिक गणवेषात दिलेल्या भाषणाला अवास्तव प्रसिद्धी देण्यात आली. अशावेळी राष्ट्राच्या सर्व शत्रूंना दिली जाणारी तंबी जणू काही भारतालाच उद्देशून आहे, असे भासविण्याचा प्रयत्न केला गेला. भारताने डोकालाम पठारावरील सैन्याची तुकडी निमूटपणे मागे घ्यावी, हा या मानसिक युद्धामागील हेतू होता. पण परिस्थितीचा सारासार परिपक्व विचार करून भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. त्याच्यात निश्‍चितच जोखीम होती; परंतु ती पत्करण्याचा खंबीरपणा भारताने सातत्याने दाखवला. या मानसिक युद्धाचा फारसा परिणाम न झाल्याने ते आता उतरणीला लागले आहे. 

परिस्थिती पुढे कोणते वळण घेऊ शकते? कोणते पर्याय आहेत यापुढे? पहिला पर्याय अर्थात दोन देशांमधील अनिर्बंध युद्धाचा. याची शक्‍यता अत्यंत कमी. भारतातील चीनचे आर्थिक हितसंबंध, एकमेव महासत्ता बनण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षेपासून विचलित न होण्याचा त्याचा मनोदय, अमेरिका-भारत- जपान यांच्या नौदलातील नुकत्याच झालेल्या 'मलबार17 कवायती'चे परिणाम, प्रशांत महासागरातील अमेरिकाप्रणीत गठबंधन, ब्रिक्‍ससारखे भारताशी समन्वयक प्रकल्प, भारताच्या अण्वस्त्रसज्जतेचे वास्तव आणि कनिष्ठ का असेना, परंतु चीनशी संरक्षणात्मक टक्कर देऊन त्याच्यावर मोठी हानी लादण्याची भारतीय सैन्यदलांची क्षमता ही आणि तत्सम कारणे यामागे आहेत. दुसरा पर्याय आहे मर्यादित युद्ध. म्हणजे चिनी सैन्याचा भारताच्या डोकालाममधील तुकडीवर हल्ला आणि तिची भारतीय प्रदेशात पीछेहाट साधण्याचा चीनचा प्रयत्न. याच धर्तीवर नुकतेच चीनमधील हु झियोंग या संरक्षणतज्ञाने भाष्य केले आहे. चीनपाशी उपलब्ध असलेला हा संभवनीय आणि साध्य पर्याय. परंतु त्यासाठी चीनला भारी किंमत चुकती करावी लागेल.

आधी सांगितल्यानुसार भारताच्या तुकडीने उभारलेले मोर्चे आणि त्यांची जागा हे डावपेची दृष्टीने अत्यंत सज्जड आहेत. भारतीय तुकडीने जर खंबीर टक्कर दिली तर हल्ला करणाऱ्या चीनच्या सैन्याला बरीच हानी सोसावी लागेल. कदाचित भारतीय तुकडी तिथे तटूनही राहील आणि चीनची नाचक्की होईल. शी जीन पिंग या ऑक्‍टोबरमध्ये पाच वर्षांसाठी निवडून येऊ इच्छितात आणि आपल्या सभोवती अनुकूल अशा लोकांचे कोंडाळे निर्माण करू इच्छितात. त्यात बाधा आणू शकेल, अशी थोड्याही पराभवाची जोखीम ते पत्करणार नाहीत. या सर्व कारणांमुळे मर्यादित हल्ल्याचा हा पर्याय शक्‍य असला, तरी त्याचा चीन सहजरीत्या अवलंब करेल असे वाटत नाही. 

तिसरा पर्याय म्हणजे एक तर भारतीय तुकडीची जागा चीनच्या संमतीने भूतान सैन्याच्या तुकडीने घ्यावी, ज्याच्यामुळे दोन्ही बाजूंची अब्रू वाचेल किंवा दोन्ही सैन्यांच्या तुकड्या आपापल्या जागी परत जाऊन भारत आणि चीनदरम्यान हा प्रश्न वाटाघाटींनी सोडवला जावा. अगदी याचीच भारत वाट पाहत आहे. ऑक्‍टोबरच्या अखेरपर्यंत हिमवर्षाव सुरू होईल. त्याआधी हा प्रश्न निकालात काढण्यास चीन उत्सुक आहे; मग चीन दुसरा पर्याय वापरो किंवा तिसरा पर्याय शक्‍य होवो. एक गोष्ट मात्र निश्‍चित, या घटनेमुळे भारतीय राज्यकर्त्यांचे आणि सेनादलांचे मनोबल नथुला, चोला किंवा सुमडोरोंग घटनांप्रमाणे वाढणार आहे आणि चीनच्या उद्दामपणाला सडेतोड उत्तर मिळणार आहे. 

(लेखक मेजर जनरल (निवृत्त) आहेत)