पुनश्‍च हरि ॐ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

जय महाराष्ट्र!...बरं!! चातुर्मास संपला. दसरा गेला. दिवाळीही गेली. सणासुदीचे दिवस. खिश्‍यात पैका नाही. घरात अडका नाही. अंगावर धडका नाही. नाकाला फडका नाही. आईने हाकलले. बापाने झोडले. जावे कोठे? सबब रयत अस्वस्थ. आम्ही काळजीत. जगदंब, जगदंब. 

जय महाराष्ट्र!...बरं!! चातुर्मास संपला. दसरा गेला. दिवाळीही गेली. सणासुदीचे दिवस. खिश्‍यात पैका नाही. घरात अडका नाही. अंगावर धडका नाही. नाकाला फडका नाही. आईने हाकलले. बापाने झोडले. जावे कोठे? सबब रयत अस्वस्थ. आम्ही काळजीत. जगदंब, जगदंब. 

गेली कैक वर्षे आम्हाला येक स्वप्न पडत होते...पाऊसकाळ चांगला झाला तर शेतशिवारे फुलतील. शेतकरीबांधवांच्या कमरेला जीन प्यांट येईल. अंगात टीशर्ट येईल. बसण्यासाठी बांधाऐवजी ट्य्राक्‍टर येईल. मोटारसायकल येईल. गळ्यात चैन येईल. खिश्‍यात पैका येईल...यंव आणि त्यंव. हे स्वप्न की दृष्टांत? काही कळेना. डॉक्‍टरांकडे गेलो. त्यांस म्हटले. ''डॉक्‍टर, नीट ऐका. शेतकरी बांधवांच्या जीन प्यांटीचे स्वप्न आम्हास वारंवार पडत्ये. त्याचे कारण काय?'' डॉक्‍टर विचारात पडले. त्यांनी डोळे मिटले. नाक ओढले. स्वत:चेच. मग मस्तक हलवले. म्हणाले : ''हे औषध घ्या. बरे व्हाल.'' औषध घेतले. स्वप्न पडणे बंद जाहले. ते जंताचे औषध होते, हे मागाहून कळले. जगदंब जगदंब. 

गेली कैक वर्षे मनाने घेतले होते...मुंबईत लोंढेच लोंढे. इथे लोंढे. तिथे लोंढे. चहुकडे लोंढे. लोंढ्यांमुळे मुंबई लोंढापुरी जाहली. धड रस्ते नाहीत. माणसे तुंबलेली. फेरीवाले तुंबलेले. टॅक्‍सीवाले तुंबलेले. सगळीच तुंबातुंबी. ही मुंबापुरी की तुंबापुरी? आम्ही रस्ते साफ करायला घेतले. पण तेवढ्यात एल्फिन्सटनचा रेल्वे पूल कोसळला. म्हंजे घ्या. रेल्वेही तुंबलेली. भडकलो. जगदंब जगदंब. 

ह्या माझ्या मुंबईत (बरं का) कारंजी नाहीत. बागा नाहीत. फुले नाहीत. फळे नाहीत. फळे फक्‍त केळी!! मराठी माणसाचे हात केळी खायला गेले. शहर बकाल झाले. राजकारणाचा चिखल झाला. कोणी केला? थापाड्यांनी केला. थापाड्यांच्या मित्रांनी केला. थापाड्याच्या मित्रांच्या मित्रांनी केला. थापाड्याच्या मित्राने भावाचा घात केला. आमचे अर्धाडझन सैनिक देवळात चपला चोराव्या तसे घेऊन गेले. परिणाम काय जाहला? भावाला अनवाणी फिरावे लागले. जगदंब जगदंब. 

खोटारड्यांची सत्ता. खोटारड्यांच्या मित्राची सत्ता. मग काय होणार? महाराष्ट्राचे निर्माण जाहले. पण नवनिर्माण राहोन गेले. ते कोणी करावे? नवनिर्माण झाले नाही, तर माझ्या महाराष्ट्राचे काही खरे नाही. सारेच खोटे. सारेच लटके. सारेच बंडल. सारेच बोगस. सारीच थापेबाजी. जगदंब जगदंब. 

अखेर नियतीने कौल दिला. नवनिर्माण आम्ही करावे. पण कसे करावे? फौजफाटा विखुरलेला. उर्वरितांचे चेहरे पडेल! ऐन सुगीच्या दिवसात कणगी रिक्‍त ऐशी स्थिती. 

काय करावे? कॅय क्रावे? क्राय कावे? 

अखेर म्हटले पुनश्‍च हरि ॐ...पुन्हा कामाला लागावे. हा महाराष्ट्राचा मुलुख हेवा वाटेल असा करून टाकावा. जागोजाग बागा. जागोजाग कारंजी. जागोजाग फुलझाडे. जागोजाग फळझाडे. केळी महाराष्ट्रातून बाद करावीत. लेकाचे केळी खातात, केळी! पण हे कार्य सोपे नाही. बेत करावा लागेल. कट शिजवावा लागेल. रात्र रात्र जागरणे करावी लागतील. दिवसाही जागरणे करावी लागतील. पण अखेर जिद्द म्हणजे जिद्द. बेत तडीस न्यायचा. नक्‍की नक्‍की न्यायचा. सुरवात कोठून करावी? चलो कल्याण. चलो डोंबोली. 

दरमजल करीत डोंबोलीत पोहोचलो. स्वागत जाहले. कार्यकर्त्यांचे मुजरे झडले. सैनिकांचे कुर्निसात जाहले. एक सैनिक कानाशी येवोन कुजबुजला. ''साहेब, बेत चांगला शिजलाय. मागल्या बाजूला टोपात रटरटतोय. ष्टार्टिंगला फस्क्‍लास सुरमई आणू का?'' 

...आम्ही आनंदात डोळे मिटले. ह्याला म्हणतात पुनश्‍च हरि ॐ!! 

जगदंब जगदंब.