हाराकिरीची 'ब्रेकिंग न्यूज'! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

कोकणातल्या सागरकिनाऱ्यावरची वाळूही आपल्या पायाखालून घसरू लागली आहे, हे राणे यांना स्वत:चा, तसेच चिरंजीव नीलेश यांच्या तीन वर्षांपूर्वीच्या पराभवानंतर लक्षात यायला हवे होते. मात्र, स्वत:च्या ताकदीविषयी अफाट कल्पना असलेल्यांचे जे होते, तेच राणे यांचेही झाले आणि पुढे वर्षभरातच वांद्रे या मुंबईच्या पश्‍चिम उपनगरातील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही त्यांना वास्तवाचे भान आले नाही. तरीही कॉंग्रेसने विधान परिषदेची जागा बहाल करून त्यांची बूज राखली होती. त्याचे चीज त्यांनी कॉंग्रेस नेत्यांच्या यथेच्छ बदनामीने केले!

महाराष्ट्राच्या राजकीय नेपथ्याला आपल्या बिनधास्त वर्तणुकीमुळे गेली दोन दशके आगळावेगळा साज चढवणाऱ्या नारायण राणे यांनी अखेर घटस्थापनेच्या मुहूर्तावर स्वत:ला 'ना घर का, ना घाट का!' अशा अवस्थेप्रत नेऊन ठेवले आहे. गेले काही महिने राणे काय करणार, याची चर्चा प्रसारमाध्यमांनी अशा वळणावर नेली होती, की जणू राज्यात मोठा राजकीय भूकंपच होऊ घातला आहे. प्रत्यक्षात राणे यांनी मोठा गाजावाजा करून अखेर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि सोबत आपल्या आमदारकीचा राजीनामाही देऊन टाकला, तेव्हा झाडाचे साधे पानदेखील हलले नाही; भूकंपाची तर बातच सोडा.

गेले काही महिने राणे हे भारतीय जनता पक्षात जाणार, असे वातावरण होते आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी तर 'राणे भाजपमध्ये आल्यास, त्यांच्यासाठी आपण एक खाते सोडू,' असे जाहीर करून टाकले होते. प्रत्यक्षात राणे यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर चंद्रकांतदादांनी राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल कसलीही चर्चा नसल्याचे सांगितले. राणेंच्या बंडाची भाजपने फारशी दखलही घेतली नाही. त्यामुळे राणे यांना भाजपने झुलवत ठेवले आणि त्यातून कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांची बदनामी करण्याचे आपले इंगितही साध्य करून दाखवले. भाजपच्या चाणक्‍यांच्या या खेळीला दाद द्यावी, तेवढी थोडीच आहे. 

राणे यांनी बरोब्बर एका तपापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र!' केला, तेव्हा कॉंग्रेसबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही त्यांच्यासाठी लाल गालिचे अंथरले होते. मात्र, या वेळी ना कोणी त्यांच्या स्वागतासाठी वाजंत्री लावली, ना कुणी गालिचे अंथरले. राणे हे खरे तर गेली 12 वर्षे कॉंग्रेसमध्ये अस्वस्थपणे वावरत होते आणि त्याचे कारण त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेत होते; पण बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या गळ्यात घातलेली मुख्यमंत्रिपदाची माळ ही तत्कालीन राजकीय सोय होती, हे राणे यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःविषयी अवास्तव कल्पना करून घेतल्या. राजकीय यशासाठी संयमाचीही गरज असते, हे तर त्यांच्या गावीही नाही; त्यामुळेच आत्ताचा हा निर्णय ही 'राजकीय हाराकिरीकडेच जाण्याची शक्‍यता' आहे. 

राणे यांच्या राजकीय प्रवासात शिवसेनेचा मोठा वाटा आहे; पण कोकणातून मुंबईत आल्यावरही आपला तेथील सुभा भक्‍कम राखणाऱ्या राणे यांना आपल्या खऱ्या ताकदीचा अंदाज कधीच आला नाही. त्यास अर्थातच शिवसेनेने त्यांना बहाल केलेली मुंबई महापालिकेतील अनेक पदेच कारणीभूत होती. त्या जोरावरच राणे प्रथम मंत्री आणि पुढे मुख्यमंत्री झाले. हे खरे, की आपल्या खात्यांवर त्यांची चांगली पकड होती. विधिमंडळातील त्यांची अर्थसंकल्पावरील भाषणेही अभ्यासपूर्ण असत. मात्र, या मार्गाने जात आणि स्वतःचा जनाधार वाढवीत राजकीय उद्दिष्टे साध्य करण्याऐवजी विशिष्ट पदासाठीची महत्त्वाकांक्षा हाच त्यांचा जणू एकमेव अजेंडा बनल्याचे चित्र निर्माण झाले.

शिवसेनेशी पंगा घेताना, त्यांच्या सोबत किमान सात-आठ आमदार होते. त्यापैकी श्‍याम सावंत यांचा अपवाद वगळता बाकी सर्वांना त्यांनी पुन्हा विधानसभेवर निवडूनही आणले होते. मात्र, गुरुवारी त्यांनी कॉंग्रेस व शिवसेना यांची निंदानालस्ती करताना आदळआपट केली, तेव्हा त्यांच्यासमवेत लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले त्यांचे चिरंजीव नीलेश यांच्याशिवाय कोणीच नव्हते. आता राज्याचा दौरा करून दसऱ्यापूर्वी पुढील वाटचालीबाबतचा आपला निर्णय ते जाहीर करणार आहेत! अर्थात, आपण टप्प्याटप्प्याने 'ब्रेकिंग न्यूज' देणार आहोत, असे त्यांनीच चार दिवसांपूर्वी सांगून टाकले होते. त्यामुळे प्रसारमाध्यमांना बातम्या जरूर मिळतील; पण त्याचा काडीमात्रही परिणाम त्यांचे स्वत:चे वा राज्याचे भवितव्य यावर होण्याची शक्‍यता नाही. 

कोकणातल्या सागरकिनाऱ्यावरची वाळूही आपल्या पायाखालून घसरू लागली आहे, हे राणे यांना स्वत:चा, तसेच चिरंजीव नीलेश यांच्या तीन वर्षांपूर्वीच्या पराभवानंतर लक्षात यायला हवे होते. मात्र, स्वत:च्या ताकदीविषयी अफाट कल्पना असलेल्यांचे जे होते, तेच राणे यांचेही झाले आणि पुढे वर्षभरातच वांद्रे या मुंबईच्या पश्‍चिम उपनगरातील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही त्यांना वास्तवाचे भान आले नाही. तरीही कॉंग्रेसने विधान परिषदेची जागा बहाल करून त्यांची बूज राखली होती. त्याचे चीज त्यांनी कॉंग्रेस नेत्यांच्या यथेच्छ बदनामीने केले! त्यामुळे आता राजकीय ताकदीचे झालेले खच्चीकरण आणि गमावलेली विश्‍वासार्हता या पार्श्‍वभूमीवर राणे यांनी विजयादशमीला काहीही निर्णय घेतला, तरी राज्यातील जनतेला त्याचे काय सोयरसुतक असणार?

Web Title: marathi news marathi websites Mumbai News Narayan Rane Congress BJP