'जंटलमन्स गेम' ते 'रेड कार्ड'

'जंटलमन्स गेम' ते 'रेड कार्ड'

क्रिकेट खेळण्याचे मूलभत तंत्र आणि मंत्र कायम असले तरी काळानुरूप ते वापरण्याच्या दृष्टिकोनात बदल होणे स्वाभाविक आहे. बॅटमधून निघालेला प्रत्येक फटका ताकदवान असला पाहिजे, यासाठी बॅट जाडजूड झाली. मैदानावर आपलेच प्राबल्य राहिले पाहिजे यासाठी पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्याचे प्रकार सुरू झाले. अशी काही बदलत्या दृष्टिकोनाची उदाहरणे देता येतील.

बॅट आणि चेंडू यांच्यातील संघर्ष समान राखण्यासाठी पालकत्व असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुढाकार घेतला आणि खेळाच्या नियमामध्ये आमूलाग्र बदल केले. त्याची अंमलबजावणी आजपासून होत आहे. 'ट्‌वेन्टी-20' या क्रिकेटच्या वेगवान प्रकारच्या आगमनानंतर खेळाडूंचा दृष्टिकोन बदलत गेला. त्यामुळे एवढ्या घाऊक स्वरूपात बदल करण्याची वेळ आली असावी.

डॉन ब्रॅडमन यांचा काळ तसा फार जुना; पण आक्रमक फलंदाजीचे बादशहा वेस्ट इंडीजचे व्हिव रिचर्डस साध्या बॅटनेही चेंडू प्रेक्षकांत भिरकवायचे. मनगटात ताकद आणि टायमिंग असेल तर फळकुटानेही मारलेला चेंडू दूरवर जाऊ शकतो; पण 'ट्‌वेन्टी-20'च्या जमान्यात चुकलेला फटकाही सीमापार जाऊ लागला, तेव्हा फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील समानता नष्ट झाली. क्रिकेटचे एकूणच नियम पाहिले, तर ते फलंदाजांकडे झुकलेले आहेत. त्यामुळे गोलंदाजांनाही तेवढीच संधी मिळायला हवी, या दृष्टिकोनातून नवे नियम केले असे म्हणायला जागा आहे. 

आधुनिक जगात कोणताही खेळ केवळ मैदानापुरता मर्यादित राहिलेला नाही. खेळ-मार्केटिंग-प्रेक्षक-पैसा-प्रसिद्धी आणि खेळाडू असे एक वर्तुळ तयार झाले आहे. त्यामुळे जागरूक राहावेच लागते. प्रक्षेपण हक्क असो वा मुख्य प्रायोजक असो, जेव्हा कोट्यवधी डॉलरचे करार होतात, तेव्हा सर्वांच्या उंचावलेल्या अपेक्षा पूर्ण करणे हे पालक संघटनेचे कर्तव्य असते.

आयसीसी'ने काळाची पावले ओळखून केलेले बदल हेच स्पष्ट करणारे आहेत. 'जंटलमन गेम' ही क्रिकेटची पहिली ओळख आहे. गेल्या काही काळात झालेले प्रकार पाहता ही ओळख मागे पडली. त्यामुळेच मैदानावर गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूला 'रेड कार्ड' दाखवून बाहेर काढण्याचा फुटबॉलसारखा नियम लागू करण्यात आला आहे. 'जंटलमन गेम' ते 'रेड कार्ड' हा बदल तंत्रातला नसून, बदलत्या दृष्टिकोनाचा आहे. नवे नियम सहा महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले होते. मधल्या काळात त्याच्या अंमलबजावणीवर खल झाला असेल. आता प्रत्यक्ष अंमलबजावणीतून बदललेले चित्र कसे पुढे येते हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com