सिंह गेला, पण...! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

प्राणिमात्रांविषयी आपण निधन, देहावसान आदी शब्दप्रयोग वापरत नाही. दुर्दैवाने माणसांच्या जगात प्राण्यांना सामाजिक स्थान नसते. प्राण्यांचे होतात ते मृत्यू किंवा खरेतर हत्याच! निधन वगैरे माणसांच्या जगातल्या गोष्टी; पण मौलाना हा विशेष सिंह होता...

हातातले 'महज कागज के टुकडें' बदलून घेण्याच्या खटाटोपात अवघा भारत देश बॅंकांपुढे रांगा लावून उभा असतानाच गुजरातमधून एक क्‍लेशकारक बातमी आली.

आशियाई सिंहांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सासन गीरच्या विस्तृत अभयारण्यात गेली सोळा वर्षे सुखनैव संचार करणारा मौलाना नावाचा खराखुरा 'गुजराथनुं शेर' निधन पावला. 'गीरचे विख्यात वनराज मौलाना यांचे बुधवारी वृद्धापकाळाने राहत्या घरी दु:खद निधन झाले. गेले दहा दिवस ते आजारीच होते. वन्यजीव वैद्यकांच्या उपचारांना प्रतिसाद न देता अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सारी वनसृष्टी हळहळत असून, वन्यजीवप्रेमी व पर्यटकांमध्ये शोककळा पसरली आहे. सुप्रसिद्ध सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'खुशबू गुजरात की' या गुजरातच्या पर्यटनविषयक जाहिरातीत मौलाना झळकले होते. सर्वांत ज्येष्ठ आशियाई सिंह अशी त्यांनी कमावलेली ओळख जागतिक स्तरावर पोचली होती. दिलखेचक आयाळ आणि भारदस्त देह ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या पश्‍चात जवळपास बारा पत्न्या, आणि 39 शावके असा परिवार आहे...' अशा काहीशा शब्दांत मौलानाच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध करता आली असती...

पण प्राणिमात्रांविषयी आपण निधन, देहावसान आदी शब्दप्रयोग वापरत नाही. दुर्दैवाने माणसांच्या जगात प्राण्यांना सामाजिक स्थान नसते. कारण नोटाबंदी, गोरक्षण, आरक्षण असल्या समस्यांशी त्यांना झुंजायचे नसते. प्राण्यांचे होतात ते मृत्यू किंवा खरेतर हत्याच! निधन वगैरे माणसांच्या जगातल्या गोष्टी; पण मौलाना हा विशेष सिंह होता. भारतीय प्राणिसंपदेचे जागतिक प्रतीक म्हणून त्याची आगळी ओळख होती.

गीरची शान म्हणून त्याच्याकडे विस्मयादराने पाहिले जात असे. आशियाई सिंह ही एक धोक्‍यात आलेली प्रजाती आहे. किंबहुना गीरचे जंगल सोडले तर दुसऱ्या कुठेही आशियाई सिंह औषधालाही सापडत नाहीत. आफ्रिकन सिंहाचा हा धाकटा भाऊ म्हणायला हरकत नाही. आफ्रिकन सिंह हा जादा खुंखार, अधिक बलवान आणि आकाराने मोठा असतो, हे खरे. त्याच्या तुलनेत आशियाई सिंह थोडा कमजोर मानला जातो, हेही खरे. पण आशियाई सिंहांनी सोसलेले मानवी अत्याचार आफ्रिकन भावंडांच्या नशिबी क्‍वचितच आले.

आफ्रिकेत सुखा-समाधानाने नांदणारा आफ्रिकन सिंह हा तुलनेने अधिक संरक्षित राहिला, तर आशियातल्या सिंहांना माणसाच्या भयानक भुकेपुढे नांगी टाकावी लागली. माणूस नावाच्या सर्वांत धोकादायक आणि स्वार्थांध प्रजातीशी त्याचा वारंवार संबंध येत गेला. बघता बघता आशियाई सिंहांच्या संख्येला ग्रहण लागले. गीर हे तर जुनागढ संस्थानाच्या नवाबांचे शिकारीसाठी राखीव ठेवलेले जंगल. परिणामी आशियाई सिंहांची तिथली संख्या घटत घटत तेवीसवर आली, तेव्हा त्याच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काही करायला हवे, अशी जाग सरकारला आली. आजमितीस गीरच्या जंगलात पाचशेहून अधिक सिंह संचारत आहेत, हे या सामूहिक संवर्धनाच्या प्रयत्नांचे यश म्हणावे लागेल. 

गीरचा अधिवास हा आशियाई सिंहांना बराच सोयीचा आहे. या जंगलात मालधारी जमातीचे आदिवासीही सिंहांबरोबरच राहतात. त्यांच्या तिथे वस्त्या आहेत. गीरचे सिंह मालधारींच्या गुराढोरांचा अधूनमधून फन्ना उडवतात; पण तरीही एकप्रकारे हे सहजीवनाचे उदाहरणच मानावे लागेल. मालधारींना हे 'केसरी-सहजीवन' अंगवळणी पडले आहे. किंबहुना सिंहांची शिरगणती आणि त्यांच्या संवर्धनात तिथल्या स्थानिक महिलांचा पुढकार विशेषत्वाने आहे. जवळपास चाळीसहून अधिक महिला वनरक्षकांचे या सिंहांवर लक्ष असते. मौलाना हा या संवर्धनाचा ज्येष्ठ साक्षीदार आणि लाभार्थी होता. त्याच्या प्रथमदर्शनाने मोहीत झालेल्या बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा मौलानाचा उल्लेख केला होता. हेच बच्चनजी आता महाराष्ट्राचे व्याघ्रदूत आहेत, आणि महाराष्ट्रातील वाघांची अवस्था नेमकी काय आहे, याची साधी चर्चासुद्धा होताना दिसत नाही. सर्वांत मोठा वाघ म्हणून लौकिकप्राप्त ठरलेल्या, उमरेडच्या जंगलातून गायब झालेल्या 'जय' वाघाचा शोधही केव्हाच थंडावला आहे. यात सारे काही आले. 'मौलाना', 'जय' ही खरे तर निव्वळ वन्यप्रतीके आहेत. वनसंपदेचे महत्त्व समाजमनावर ठसविण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. वनसंवर्धनाच्या जागृतीबद्दलच जिथे अनास्था असेल, तिथे मौलानाच्या मृत्यूची बातमी निव्वळ उपचार ठरतो. आशियाई सिंह किंवा आशियाई पट्टेदार वाघांचे महत्त्व माणसाला फक्‍त तेवढ्यासाठीच असते. एरवी त्यांच्यात आणि नुकत्याच निधन पावलेल्या पाचशे-हजाराच्या नोटांत कवडीचाही फरक नाही.