मॉन्सूनची चाहूल आणि चकवा

Dr. Shrikant Karlekar
शुक्रवार, 17 जून 2016

उष्ण/आयनिक कटिबंध प्रदेशातील हवा व हवामानाशी निगडित घटकात सतत होत असणारे व बऱ्याच अंशी अनिश्‍चित बदल हे मॉन्सूनच्या आगमनाचे अंदाज चुकण्याचे एक कारण आहे. 

उष्ण/आयनिक कटिबंध प्रदेशातील हवा व हवामानाशी निगडित घटकात सतत होत असणारे व बऱ्याच अंशी अनिश्‍चित बदल हे मॉन्सूनच्या आगमनाचे अंदाज चुकण्याचे एक कारण आहे. 

नेक खासगी आणि सरकारी यंत्रणांनी केलेले अंदाज साफ चुकीचे ठरवून मॉन्सूनने त्याचे आगमन भारताच्या अनेक भागांत लांबणीवर टाकले आहे! याचा अर्थ असा नाही की, या यंत्रणांनी केलेला अभ्यास, संशोधन, वापरलेले तंत्र चुकीचे होते. या सर्वच यंत्रणांनी मॉन्सूनचा अंदाज वर्तविण्याच्या त्यांच्या पद्धतीत आज बरीच अचूकता आणली आहे. पण तरीही ते अंदाजच ठरत आहेत आणि त्यातली विश्वासार्हता सर्वसामान्यांच्या दृष्टीने कमी होते आहे. मॉन्सूनच्या आगमनाचे अंदाज चुकण्याचे मुख्य कारण हे भौगोलिक आहे, हे विसरून चालणार नाही. उष्ण/आयनिक कटिबंध प्रदेशातील हवा व हवामानाशी निगडित घटकात सतत होत असणारे व बऱ्याच अंशी अनिश्‍चित बदल हे याचे मुख्य कारण आहे. समशीतोष्ण किंवा उपआयनिक प्रदेशातील घटकांत होणारे बदल त्यामानाने खूपच सुनिश्‍चित असतात. त्यामुळे त्या प्रदेशातील अंदाज अचूक ठरू शकतात. सर्वसामान्य माणसाला त्यामुळे नेहमी असेच वाटत राहते की, इतर देशात हे अंदाज नेहमी अचूक ठरतात व आपल्याकडेच ते नेहमी चुकतात.

उष्ण कटिबंध प्रदेशातील हवामान घटकात आढळणारे अनिश्‍चित व वारंवार बदलते आकृतिबंध हे मॉन्सूनसंबंधी अंदाज चुकण्याचे महत्त्वाचे व सर्वप्रथम कारण असले, तरी अंदाज वर्तविण्याच्या पारंपरिक पद्धती, ज्यावर अंदाज वर्तवायचा असतो त्याची अपूर्ण माहिती, स्थानिक पातळीवर आकडेवारीस माहिती एकत्र करण्यात होणारी दिरंगाई किंवा अनास्था या गोष्टीही तितक्‍याच महत्त्वाच्या आहेत. या बाबतीत सरकारी आणि खासगी संस्था प्रयत्न करीत असल्या, तरी हे प्रयत्न पुरेसे पडत नसावेत, असे दिसते आहे. 

मॉन्सूननिर्मितीची यंत्रणाच इतकी क्‍लिष्ट आहे की, ती व त्यातील अनिश्‍चितपणाचे वेगवेगळे आकृतिबंध नेमकेपणाने समजण्यासाठी अनेक वर्षांच्या उपलब्ध; पण तोकड्या आकडेवारीवर विसंबून राहून फारसा उपयोग होईल, असे वाटत नाही. मॉन्सूनचे भाकीत करणाऱ्या यंत्रणा याबाबत कसे व कोणते प्रयत्न करीत आहेत ते त्यांनी स्पष्ट केले, तरीही अनेकांच्या मनातील संभ्रम दूर होऊ शकेल हे नक्की. 

मॉन्सून ही एक अवाढव्य; पण शिस्तबद्ध यंत्रणा आहे, असे भौगोलिक अभ्यासातून नेहमीच जाणवते. सध्याच्या काळात ही यंत्रणा अनेक कारणांनी बाधित होऊ लागल्याचे संकेत यापूर्वीच मिळू लागले आहेत. असे असले तरी जागतिक तापमानवाढ, उत्तर व दक्षिण ध्रुव प्रदेशातील बर्फाचे वितळणे, हिमनगांचे उत्तरेकडून व दक्षिणेकडून 30 अंश उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्तांच्या दिशेने होत असलेले स्थानबदल व त्यामुळे जागतिक हवामानात होत असलेले बदल आणि उष्ण कटिबंध प्रदेशातील जमीन व पाण्याच्या तापमानात मानवी हस्तक्षेपामुळे होणारे बदल या व अशा अनेक गोष्टींचा मॉन्सून व तत्सम इतर अभिसरण यंत्रणांवर निश्‍चितच परिणाम होऊ लागला आहे, यावर अनेक शास्त्रज्ञांत एकमत दिसते. या पार्श्वभूमीवर मॉन्सूनचे आगमन, त्याची तीव्रता याबद्दलचे अंदाज अचूक राहण्याची शक्‍यताही थोडी कमी होत असावी, असे म्हणता येईल. 

मॉन्सूनचे भाकीत करण्याच्या प्रक्रियेत एल निनो, ला नीना यावर आधारित केलेले अंदाज नेहमीच खरे ठरले आहेत, असेही दिसून येत नाही. इंडियन ओशन डायपोल, ज्याला ‘इंडियन निनो‘ असे म्हटले जाते त्या प्रतिकृतीचा उपयोग किती होतो आहे, ते अजून समजणे बाकी आहे. याचबरोबर सागरी गती-विज्ञानाच्या प्रतिकृतीचे आकलन अधिक योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे. आज या घडीला वापरत असलेल्या सांख्यिकी प्रतिमानातही अधिक अचूकता अपेक्षित आहे. 

मॉन्सूननिर्मितीची यंत्रणा विशद करण्याचा या लेखाचा उद्देश नसून, मॉन्सूनचे अंदाज चुकण्यामागे कोणती भौगोलिक, मानवी व तांत्रिक कारणे असावीत, याचा मागोवा घेणे हा आहे. अनेक संशोधक व शास्त्रज्ञांकडे हे अंदाज चुकण्यामागची नेमकी कारणमीमांसा निश्‍चितच असेल. मात्र त्याचा उपयोग मॉन्सूनचे अंदाज वर्तविण्याच्या प्रक्रियेत होणे गरजेचे आहे, असे वाटते.

- डॉ. श्रीकांत कार्लेकर

Web Title: #Monsoon, Rain, Weather, Editorial, Features, Shrikant Karlekar