भुयारातल्या चोरवाटा! 

mumbai
mumbai

अलेक्‍झांडर ड्युमा या प्रख्यात फ्रेंच साहित्यिकाची "द काऊंट ऑफ मॉंटो क्रिस्तो' या शीर्षकाची गाजलेली कादंबरी आहे. तुरुंगात खितपत पडलेल्या एका निरपराध व्यक्तीने सुटका करून घेण्यासाठी भुयार खणायला घेतले आणि वाट चुकून ते शेजारच्याच कोठडीत कसे गेले आणि त्यामुळे त्याला कोट्यवधीचा खजिना कसा मिळाला, अशी ही रोमहर्षक कहाणी आहे. मात्र, सलग दोन दिवसांच्या सुट्यांचा फायदा घेऊन गेल्या शनिवार-रविवारच्या रात्री नवी मुंबईतील जुईनगर परिसरात भुयारी वाटेने जो दरोडा पडला, त्याची कहाणी ही ड्युमाच्या कथानकापेक्षाही अधिक चित्तचक्षुचमत्कारी आहे. खरे तर सुमारे 50 फूट लांबीचे आणि दोन-अडीच फूट उंचीचे भुयार सहा महिने रात्री अथक परिश्रम करून आणि मुख्य म्हणजे कोणालाही सुगावा लागू न देता खणणे, ही सोपी बाब नाही. शिवाय, हे भुयार खणणारे दरोडेखोर तेथून निघणारी माती दिवसाढवळ्या समोरील मैदानावर आणून टाकत होते, तरीही ही माती हे लोक कोठून आणत आहेत, एवढा साधा प्रश्‍नही स्थानिक नागरिकांना पडला नाही! त्यामुळेच हे दरोडेखोर थेट बडोदा बॅंकेच्या "लॉकर रूम'पर्यंत निर्वेधपणे जाऊन पोचू शकले आणि तेथील काही लॉकर फोडून, त्यातील सुमारे पाच कोटींचा ऐवज लुटून निवांतपणे पोबारा करू शकले! 

भुयारी मार्गाने दरोडा घालण्याची ही आपल्या देशातील काही पहिलीच घटना नाही आणि मुख्य म्हणजे याच परिसरात अशाच मार्गाने 2010 मध्ये एका जवाहिऱ्याच्या दुकानावर चार मीटर लांबीचे भुयार खणून दरोडा घातला गेला होता. मात्र, 50 फूट लांबीचे भुयार खणण्यात यशस्वी होणे ही सोपी बाब नाही. या बॅंकेच्या इमारतीतील एक दुकान वाणसामानाच्या विक्रीसाठी या चोरट्यांनी भाड्याने घेतले आणि रात्री दुकान बंद झाल्यावर त्यांनी हे "ओव्हरटाइम'चे काम सुरू केले. त्यातून ते थेट "लॉकर रूम' पोचून दरोडा घालू शकले. त्यामुळे या परिसरातील 30 मध्यमवर्गीयांना मोठा फटका बसला आहे. हे चोरटे झारखंडमधले होते आणि "लॉकर रूम'मध्ये सीसीटीव्ही नव्हते, असे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांचा शोध कठीण झाला आहे. आता या मध्यमवर्गाच्या आयुष्यभराच्या पुंजीची भरपाई कशी होणार, हा या चोरट्यांचा शोध कसा घेणार, यापेक्षाही लाखमोलाचा प्रश्‍न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com