सौंदर्याचे नजराणे

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

दाट झाडीची हिरवी माया सगळीकडं निवांत पसरलेली होती. हातांत हात गुंफून पानांनी झाडांच्या माथ्याभोवती फेर धरला होता. वाऱ्याच्या लहरींचं अस्तित्व पानांच्या लवलवणाऱ्या नृत्यविभ्रमांतून आणि सळसळत्या शब्दांतून जाणवत होतं. सरळ, गुळगुळीत रस्त्यांवरून वाहनं धावत जावीत, तसा वारा कधी बेभान होई आणि झाडाच्या गोलाकारांना धक्के देत पुढं निघून जाई. पानांच्या माना उंचावून झाडं वाऱ्याच्या अवखळपणाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करीत; पण खोडकर वारा त्यांच्या हातांतून केव्हाच सुटून गेलेला असे. वाऱ्याच्या या अशा धक्‍क्‍यांचा परिणाम झाडाच्या गोलाकारांना धक्के देत पुढं निघून जाई. पानांच्या माना उंचावून झाडं वाऱ्याच्या अवखळपणाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करीत; पण खोडकर वारा त्यांच्या हातांतून केव्हाच सुटून गेलेला असे. वाऱ्याच्या या अशा धक्‍क्‍यांचा परिणाम झाडाच्या तळाशी टपटपणाऱ्या वयस्क पानांच्या वाढत जाणाऱ्या ढिगांतून दिसत राही. फिकट सोनेरी, पिवळसर, किरमिजी आणि तांबूस अशा रंगांची पानं झाडाभोवती नक्षीदार रांगोळ्या पसरवीत जात. वाऱ्याच्या वेगवान लाटेवर स्वार झालेली पानं काहीशी दूर जात आणि तिथं एकेकटी पडून राहत. काही पानं हलक्‍या वाऱ्याबरोबर नाचत साऱ्या अंगणभर आणि माळरानभर लहरत जात. पानगळीची अशी किती तरी आवर्तनं झाडांच्या विश्वात एकामागून एक सुरू राहत. शुष्क पानांच्या कुजबुजीचे अनेक शब्द झाडाखाली ऐकू येत.
वाळलेल्या पानांच्या गर्दीत जशी एक नक्षी साकारलेली होती, तशीच प्रत्येक पानाच्या तळव्यावरही विविध रेषाकारांची नक्षी चितारलेली होती. उभ्या, आडव्या, तिरकस, वक्राकार अशा रेषांच्या गुंफणीतून तिथं लहान-मोठे कितीएक आकार तयार झाले होते. चौकोनी, आयताकृती, त्रिकोणाकृती असे रेषाकार पानाला जणू वेगळं व्यक्तिमत्त्व देत होते. पानाच्या जीवनरेखेची रूपं त्यांतून स्पष्ट होत होती. पानाचा आकार बांधून ठेवणाऱ्या मध्यमेच्या दोन्ही बाजूंना ठळक पसरलेल्या संतुलित रेषा, त्यांच्या आधारानं एकमेकांत मिसळलेल्या नाजुका असं वेगळं चित्रविश्व पानावर पसरलेलं होतं. मुळांनी जमिनीतून शोषून घेतलेलं पाणी आणि अन्न या पानांपर्यंत पोचविणाऱ्या रेषांचं तिथलं दर्शन अचंबित करणारं होतं. वाळलेलं पान म्हणून एरवी दुर्लक्षित राहणारं पान नीट पाहिलं, तर तिथं अशी अनेक आश्‍चर्यं उतरलेली आहेत, असं एकसारखं जाणवत होतं. प्रत्येक झाड वेगळं, त्याच्या पानांचा आकार वेगळा आणि त्याच्या अंगावरले रेषाकारांचे नक्षीदार दागिनेही वेगळे. आपण चांगलं-वाईट अशी लेबलं लावून चटकन कशाचीही विभागणी करून टाकतो. त्याच्या अंतरंगात कधी डोकावत नाही; आणि असल्या अनेक विस्मयकारी रूपदर्शनाला पारखे होतो.

आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टींची वरवरच्या, अपुऱ्या परिचयानं आपण वर्गवारी करतो. चांगलं आणि वाईट अशा काही कल्पना आपणच मनाशी पक्‍क्‍या करून घेतलेल्या असतात. तशीच दृष्टी कायम ठेवली असती, तर घननीळ रामाचं, सावळ्या विठ्ठलाचं रूप आपल्या मनात ठसलंही नसतं कदाचित. सौंदर्य सगळीकडंच आहे. दगडांत, शुष्क पानांत, डोंगरदऱ्यांत, वळसे घेत धावणाऱ्या रस्त्यांत आणि काजळून जाणाऱ्या संध्याकालातसुद्धा. त्यासाठी थोडा वेळ काढून ते नीट पाहायची ओढ हवी. सौंदर्याचे असे अनेक नजराणे तुमची वाट पाहत आहेत.

Web Title: parimal spiritual