किमया "सुपर हिरो' जिवाणूंची  (विज्ञान क्षितिजे) 

Pradeepkumar writes about science Editorial
Pradeepkumar writes about science Editorial

पृथ्वीवर जीवनास पोषक असे वातावरण निर्माण होण्यापासून ते पालन-पोषण होण्यापर्यंत सर्व गोष्टीतील जिवाणूंच्या भूमिकेचा संशोधक अभ्यास करीत आहेत. यातील एक महत्त्वपूर्ण संशोधन म्हणजे मानवी जीवनातील जिवाणूंची भूमिका. त्यांच्या मदतीशिवाय आपणाला क्षणभरही जीवन जगणे शक्‍य नाही. 

विज्ञान जगतात आज होणारे संशोधन इतके अद्‌भुत आहे, की जणू काय ते विज्ञानकथाच वाटावी. अशा विविध विज्ञानकथांमधील एका विज्ञानकथेचा हा परिचय. जीवशास्त्र विषयाभोवती ही विज्ञानकथा गुंफलेली असून, या कथेचा हिरो आहे सूक्ष्मकाय असा जिवाणू. "वेश असावा बावळा । परंतु अंगी नाना कळा।।' याप्रमाणे तो वागत असल्याने सुरवातीला त्याच्या क्षमतेची कल्पना येत नाही, पण ही कथा वाचताना लक्षात येईल की तो हिरो नव्हे, तर सुपर हिरो आहे. पृथ्वीवर निर्माण झालेल्या सर्व जिवांमध्ये सरस ठरू शकेल, असे गुण त्याच्याकडे आहेत. म्हणून तर लीन मार्गुलीससारखा शास्त्रज्ञ त्यांना "सजीवसृष्टीचे सम्राट' म्हणतो. आपल्या "व्हॉट इज लाइफ' या महत्त्वपूर्ण पुस्तकात तो पृथ्वीला "जिवाणूंचा ग्रह' असे म्हणतो. 
जिवाणूंचे सगळ्यांत पहिले वैशिष्ट्य म्हणजे ते कुठेही राहू शकतात. "जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी' म्हणतो ना अगदी तसे. जेथे कुठलाही जीव राहू शकत नाही, तेथेही ते अगदी सहजपणे राहू शकतात. पृथ्वीपासून 33 किलोमीटर उंच ठिकाणी जेथे अल्ट्राव्हायोलेट किरणांचा सतत मारा होत असतो, तेथे त्यांचे अस्तित्व आढळून आलेय. "पायरोलोबस फ्युमारी' नावाचा जिवाणू, तर ज्या तापमानाला पाण्याची वाफ होते त्या तापमानाला जिवंत राहतो. हा जिवाणू 105 अंश सेल्सिअस तापमानाला प्रजनन करतो. एवढेच नव्हे तर 90 अंश सेल्सिअसला त्याची वाढ थांबते. "पोलॅरोमॅनस व्हक्‍युओल्टा' या जिवाणूचेही असेच आहे. बर्फात राहणारा हा जिवाणू चार अंश सेल्सिअस तापमानाला वाढतो, पण तापमान 12 अंश सेल्सिअस होण्याचा अवकाश की त्याची वाढ थांबते. या तापमानाला त्याला उकडू लागते ! हे तर काहीच नाही, "शेवानेला ओनेडनसिस' हा जिवाणू इलेक्‍ट्रिसिटी खाऊन जगतो. सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठातील केनेथ नेल्सन या संशोधकाने या जिवाणूचा शोध लावला आहे. याच विद्यापीठातील मोह एल नॅगर या संशोधकाने तर सिद्ध केलेय, की हा इलेक्‍ट्रिसिटी खाऊन जगणारा जिवाणू स्वतःच्या शरीरापासून नॅनोवायर निर्माण करून त्याच्या साह्याने तो इलेक्‍ट्रिसिटी आपल्याकडे खेचतो. अशाच पद्धतीने इलेक्‍ट्रिसिटीत श्‍वासोच्छ्वास करणाऱ्या "जीओबॅक्‍टर मेटॅलीरेड्युसेन्स' या आणखी एका जिवाणूचा शोध या संशोधकांनी शोध लावला आहे. अशा पद्धतीच्या जिवाणूंचा इंधनाच्या बॅटऱ्या निर्माण करण्यासाठी कसा वापर करता येईल, यावर जगभरातील संशोधक काम करीत आहेत. सर्वव्यापीत्व हे जिवाणूंचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या अर्थाने पाहायला गेले तर जिवाणू हे पृथ्वीवरचे सर्वांत मोठे "इंजिनिअर' आहेत. हवा, पाणी, जमीन या तिन्ही ठिकाणी त्यांच्यामुळेच जीवनास आवश्‍यक अशा रासायनिक प्रक्रिया होत राहतात. पृथ्वीवर जीवनास पोषक असे वातावरण निर्माण होण्यापासून ते पालन-पोषण होण्यापर्यंत सर्व गोष्टीत त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरतेय, यावर संशोधक अभ्यास करीत आहेत. या संशोधनातले एक महत्त्वपूर्ण संशोधन म्हणजे मानवी जीवनातील जिवाणूंची भूमिका. आता असे वाटेल, की जिवाणूची मानवाच्या जीवनात काय भूमिका असणार? एक उपद्रवकारक जीव की ज्यामुळे मानवाला कितीतरी रोग होतात. पण असे नाही. मानवी शरीरात अन्‌ शरीरावर राहणाऱ्या एकूण 35 हजार जिवाणूंपैकी शंभरच जिवाणू मानवाला उपद्रवकारक आहेत. राहिलेले 34,900 जिवाणू "मित्र जिवाणू' आहेत. या मित्र जिवाणूंमुळेच मानवी अस्तित्व टिकून आहे. हे जिवाणू वेगवेगळ्या अवयवांत राहून मानवाला जीवनावश्‍यक गोष्टी पार पाडण्यासाठी मदत करतात. आपल्या शरीरातील विविध भागांत असणारी ही संख्या पाहा, घशात 4154, नाकात 2264, जिभेवर 7947 अन्‌ मोठ्या आतड्यात 33,627 ! हे जिवाणू आपल्या शरीरात राहून जीवनावश्‍यक गोष्टी पार पाडण्यासाठी अहोरात्र मदत करतात, त्यांच्या मदतीशिवाय आपणाला क्षणभरही जीवन जगणे शक्‍य नाही. जीवनसत्त्व तयार करायचे असो वा शरीरातील हार्मोन, आतड्यातले अन्न पचवायचे असो वा आपला मूड बनविणे यासारख्या कितीतरी गोष्टीत त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. आता जिवाणूंचा आपला मूड बनविण्यात काय संबंध असा प्रश्‍न पडेल. आपल्या शरीरातील जिवाणूंची केमिस्ट्री बिघडते, तेव्हा त्याचा आपल्या मेंदूवरही परिणाम होतो. कॅनडामधील मॅकमास्टर विद्यापीठातील जेन फॉस्टर आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॉर्कमधील जॉन क्रायन या संशोधकांनी जिवाणूंचा मानसिकतेशी असणारा संबंध सिद्ध करून दाखविला आहे. जिवाणू-मानव संबंधाचे हे संशोधन खूपच महत्त्वपूर्ण आहे. या संशोधनामुळे लक्षात येते, की मनुष्य जे काही खातो त्याचा संबंध फक्त शरीराशीच नव्हे, तर मनाशीही आहे, वागण्याशी आहे. मानवी आरोग्यात जिवाणूंची भूमिका किती महत्त्वपूर्ण असते याविषयी अजून एक महत्त्वपूर्ण असे संशोधन लक्षणीय आहे. या संशोधनात आढळून आले, की बाळाचा जन्म नैसर्गिकरीत्या होतो, की सिझेरियन पद्धतीने याचा त्याच्या आरोग्याशी जवळचा संबंध आहे. बाळ नैसर्गिकरीत्या आईच्या योनिमार्गातून बाहेर पडते, तेव्हा त्या मार्गातील ठराविक जिवाणू बाळ बाहेर पडताना त्याच्या शरीरावर आणि तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे हे जिवाणू त्याच्या पुढच्या जीवनप्रवासासाठी महत्त्वपूर्ण असतात. बाळाचा जन्म सिझेरिअन पद्धतीने झाला, तर ते बाळ या जिवाणूंना मुकते आणि याचा परिणाम त्याच्या आरोग्याशी आहे. मानवाचे जीवन उत्क्रांत होताना ते फक्त त्या एकट्याचेच म्हणून झालेले नाही, तर त्याची उत्क्रांती ही मानव-जिवाणू सहजीवन अशी उत्क्रांती आहे. 

(विज्ञान व तत्त्वज्ञान अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com