बाविशीतील उमेद 

Pune Edition Article Editorial Article on the hope of 22 years
Pune Edition Article Editorial Article on the hope of 22 years

भारतीयांच्या मनातील अमेरिकेचे आकर्षण नेमके कधीपासून सुरू झाले, हे सांगता येणे कठीण आहे. 1960च्या दशकात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील असंख्य उच्चविद्याविभूषित तरुण नोकऱ्यांसाठी थेट अमेरिकेचा रस्ता धरू लागले, तेव्हा त्यास "ब्रेनड्रेन' असे संबोधिले जात होते. भारतीयांचा हा प्रवाह हा अमेरिकेच्या दिशेने असाच जात राहिला आणि अमेरिकेतच भारतीयांच्या नव्या पिढ्या जन्म घेऊ लागल्या.

अशाच पिढीतील एक तरुण तंत्रज्ञ सुंदर पिचाई हा चक्‍क "गुगल' या विश्‍वविख्यात कंपनीचा "सीईओ' झाला ! मात्र अशी अनेक पदे हस्तगत केली असली, तरी अमेरिकन प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेत मात्र भारतीय वंशाला अगदी अपवादानेच स्थान मिळाले आहे. त्यामुळेच बहुधा कॅलिफोनिर्याच्या "गव्हर्नर'पदासाठी उद्या, मंगळवारी होऊ घातलेल्या निवडणुकीत शुभम गोयल या अवघ्या 22 वर्षांच्या युवकाने उडी घेतली आहे. शुभमचे मूळ घराणे हे उत्तर प्रदेशातील असले, तरी त्याचा जन्म तसेच शिक्षण हे अमेरिकेतच झाले आहे. 

शुभमने कॅलिफोर्निया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी संपादन केली आणि त्यानंतर "फिल्म स्टडीज' मध्येही पदवी मिळवली. मात्र प्रत्यक्षात तो काम करतो ते "व्हर्च्युअल रिऍलिटी' या तरुणांवर मोहिनी घालणाऱ्या क्षेत्रात व्यवस्थापक म्हणून ! गेले काही दिवस तो हातात माईक घेऊन कॅलिफोर्नियाचे रस्ते पालथे घालत आहे आणि त्याचे म्हणणे ऐकून घेण्यास गर्दीही बऱ्यापैकी जमत आहे. प्रशासकीय कारभार अधिकाधिक पारदर्शक व्हावा आणि

त्यासाठी "डिजिटल' तसेच "व्हर्च्युअल' माध्यमांचा अधिकाधिक वापर केला जावा, म्हणून आपण ही निवडणूक लढवत असल्याचे तो विविध व्हिडिओंमधून सांगत आहे. शुभम प्रत्यक्षात प्रचारासाठी रस्त्यावरही उतरला असला, तरी त्याचा खरा भर हा "सोशल मीडिया'तील प्रचारावरच आहे. सध्या कॅलिफोनिर्यातील प्रशासनाला सामोरे जावे लागत असलेल्या समस्यांची सोडवणूक करावयाची असेल, तर "तरुण तजेलदार' असाच प्रशासक असायला हवा, असा शुभमचा दावा आहे. 

तंत्रज्ञानामुळे अनेक प्रश्‍न सहजासहजी सुटू शकले आहेत आणि प्रशासनात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर व्हावा, म्हणूनच आपण ही निवडणूक लढवत आहोत, असेही तो ठामपणे सांगतो. आपल्या एकूण 27 प्रतिस्पर्ध्यांवर मात करून शुभम कॅलिफोनिर्याच्या गव्हर्नरपदी विराजमान होईल का, ते आज सांगता येणे कठीण असले, तरी त्याची ही उमेदवारी टोकाच्या देशीवादाच्या मर्यादाच स्पष्ट करते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com