अर्थार्थ 'रामायण'

आनंद अंतरकर
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

"मला पैशाची बिलकुल गरज नाही; मी पैशाशिवाय जगू शकतो; मी पैशाला मानत नाही' असं म्हणणारा माणूस एक तर प्रचंड आढ्यतखोर, फाजिल आत्मविश्‍वास बाळगणारा तत्त्वज्ञ असावा, एखादा भोंदूबाबा किंवा तद्दन मूर्ख तरी असावा.

पैशाविषयीची विरक्ती एखाद्यालाच शोभून दिसते. थोर पाश्‍चात्य विचारवंत, तत्त्वज्ञ ऍगॅसिझ याला एका व्याख्यानमालेसाठी भलीमोठी रक्कम देऊ करण्यात आली; पण ती सपशेल नाकारताना ऍगॅसिझ म्हणाला, " i cannot afford to waste my time making money.''

काय म्हणावं ऍगॅसिझच्या या निःस्पृह उत्तराला? पण असतात जगामध्ये असेही काही अवलिये. कुणी काय स्वीकारावं आणि काय नाकारावं हे ठरवणारे आपण कोण? ऍगॅसिझचा बाणा आपण आचरणात आणला, तर जगायलाच नको. पैसा आणि माणूस यांचं नातं दिवसेंदिवस इतकं घट्ट होत चाललंय, की आज माणूस पैशाला सोडत नाही आणि पैसा माणसाला सोडायला तयार नाही. पैसा माझा राम! पैसा माझा नारायण! "भेटीलागी जीवा लागलीसे आस' अशी आळवणी सांप्रतकाळी फक्त पैशासाठीच केली जाऊ शकते. "प्रभाते मनी राम चिंतीत जावा' या रामदासांच्या पंक्तीत आता बदल करून "वित्त चिंतीत जावे' असं रोज उठून माणसाला म्हणावं लागतं.

पैसा गैरमार्गाचा असो, व्यापारातला असो, शेअरबाजारातला असो, कलाक्षेत्रातला असो, वैध-अवैध असो की राजकारणासारख्या सोंगट्या हलवण्याच्या द्यूतक्रीडेतला असो- त्याचं त्याचं म्हणून पावित्र्य, सदार्थ, कुनीतिमत्ता किंवा चालबाजी असं स्वत्व राखून असतो. काही झालं तरी पैसा हा माणसाला प्रयत्नपूर्वक मिळवावाच लागतो. पैशाशिवाय माणूस म्हणजे लोकरीशिवाय मेंढी किंवा अंड्याशिवाय कोंबडी!
आमचा गणाभाऊ हा नगरसेवक आहे. "पैसा चलाख माणसाच्या हृदयात वसत नाही; तो त्याच्या डोक्‍यात ठाण मांडून असतो,' ही अर्थनीती गणाभाऊला पक्की ठाऊक आहे. महापालिकेच्या निवडणुकीत लाख लटपटी खटपटी करूनही त्याला पक्षाचं तिकीट मिळालं नाही. आम्हाला त्याच्या इतकंच वाईट वाटलं. ""मग आता काय करणार?'' मी चिंतावेगानं विचारलं. ""केवढा खर्च केलायस. कर्जाचंही डोक्‍यावर ओझं घेतलंयस.''

""अपक्ष म्हणून उभा राहणार,'' गणाभाऊनं आधीच उत्तराची तयारी केलेली होती. ""एकदा सीट लागू द्या हो. मग बघा- पाच वर्षांत करोडपती होऊन दाखवतो! तिकिटाचा खर्च ही आमची इन्व्हेस्टमेंट असते. नंतर नुसती मालामाल लॉटरी! मी पुरेपुर कमवणार बघा!''

वॉर्डासाठी सुखसुविधा, लोकोपयोगी कामं, ज्येष्ठांचे प्रश्‍न, स्वच्छतेविषयी आस्था, रहदारीचा गुंता आदी जनहिताचे मुद्दे गणाभाऊच्या काळजात शिरकाव करणारे नसावेत. उगाच झेपणार नाही, त्याचा उच्चार कशाला?
महाकवी ग. दि. माडगूळकर यांनी एका राजकीय पाक्षिकासाठी दोन आशावादी ब्रीदपंक्ती लिहिल्या होत्या. त्यातले शब्द असे ः-
"शुचिस्मंत निःस्वार्थ नेतृत्व यावे
उभ्या भारती लोककल्याण व्हावे!!'
बिचारा आमचा गणाभाऊ! माडगुळकरांचे सत्त्वशील शब्द काळजातून डोक्‍यापर्यंत पोचण्यासाठी त्याला आणखी किती निवडणुका लढवाव्या लागणार आहेत, काळच जाणे! सगळ्या जगालाच जिथे आज "अर्था'यटिस नावाच्या रोगानं ग्रासून टाकलंय, तिथे त्याची तरी मात्रा काय चालणार?