...बाँड इज द नेम!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

"ऑक्‍टोपसी'चे बरेचसे चित्रीकरण तर राजस्थानात झालेले. त्या निमित्ताने त्यांना भारतातले दारिद्य्र आणि लहान मुलांची परवड दिसली. ऑड्रे हेपबर्न या आपल्या सख्ख्या मैत्रिणीच्या पाठबळाच्या जोरावर मूर यांनी अविकसित देशांतल्या मुलांसाठी समाजकार्य सुरू केले.

सत्तरीच्या दशकात हिंदी रुपेरी पडद्यावर खांदे किंचित तिरके करत घायाळ करणारे कटाक्ष टाकणारा राजेश खन्ना अवतरला, त्याच सुमारास तश्‍शाच अंगयष्टीचा एक गोरा साहेब नवा जेम्स बॉंड बनून हॉलिवूडच्या पटांगणात उतरला. रॉजर मूर हे त्याचं नाव. बॉंडपटांच्या मालिकेतले सर्वाधिक चित्रपट हे रॉजर मूर यांनीच केले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर बॉंडचा शिक्‍का बसला तो शेवटपर्यंत. दिलखेचक अदा, चटकदार संवाद आणि कल्पक हाणामाऱ्यांनी दोन-अडीच दशके जेम्स बॉंड या काल्पनिक गुप्तहेराला आपले व्यक्‍तित्त्व बहाल करणाऱ्या रॉजर मूर यांनी मंगळवारी अखेरचा श्‍वास घेतला.

वास्तविक एका प्रामाणिक, शिस्तप्रिय पोलिस हवालदाराचा हा मुलगा. दक्षिण लंडनमधल्या स्टॉकवेलमध्ये त्यांचे बालपण गेले. एका चित्रपट निर्मात्याकडे झालेल्या घरफोडीचा तपास मूर यांच्या वडिलांकडे येतो काय आणि तिथून त्यांच्या मुलासाठी अभिनयाचे दालन उघडते काय, मूरसाहेबांचे सारे आयुष्यच लोकविलक्षण घटितांनी भरलेले होते. त्या निर्मात्याने त्यांना अभिनय शिकायला लंडनच्या ऍकॅडमीत पाठवले. तिथून एक सिलसिला सुरू झाला. छोट्या-मोठ्या कामांनंतर ते थेट हॉलिवूडलाच नशीब आजमावण्यासाठी गेले. जेम्स बॉंडची भूमिका त्यांच्या वाट्याला येण्याआधी जॉर्ज लॅझेनबी व शॉन कॉनरी यांच्यासारखे रांगडे नट आधीच प्रस्थापित होऊन बसले होते.

लॅझेनबीच्या वाट्याला एखादाच बॉंडपट (ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिस) आला, पण कॉनरी यांनी बॉंड म्हणून रुपेरी पडद्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. पण एका क्षणी कॉनरी यांना बॉंडगिरीचा कंटाळा आला आणि ही भूमिका मूर यांच्याकडे आली. विशेष म्हणजे मूर यांना या बॉंडगिरीचा मुळात तिटकाराच होता, पण कमाईचा स्रोत म्हणून ते त्याकडे पाहत आले. लिव्ह अँड लेट डाय, स्पाय हू लव्हड मी, ऑक्‍टोपसी...अशा अर्धा डझन बॉंडपटांमध्ये रॉजर मूर होते. "ऑक्‍टोपसी'चे बरेचसे चित्रीकरण तर राजस्थानात झालेले. त्या निमित्ताने त्यांना भारतातले दारिद्य्र आणि लहान मुलांची परवड दिसली. ऑड्रे हेपबर्न या आपल्या सख्ख्या मैत्रिणीच्या पाठबळाच्या जोरावर मूर यांनी अविकसित देशांतल्या मुलांसाठी समाजकार्य सुरू केले. ते इतके वाढले की पुढे ते "युनिसेफ'चे राजदूतच झाले. 2003मध्ये त्यांना या कार्यासाठी ब्रिटिश राजघराण्याने "सर'की देऊ केली. ""बॉंडगिरी करणे फार अवघड नाही. पुढ्यातील फर्निचरला न अडखळता संवाद म्हणता आले की खूप झालं!'' या त्यांच्या मजेशीर वाक्‍यातच हा माणूस बॉंडपटांच्या किती पलीकडला होता, हे कळून येते.