चौसष्ट घरांची राजकुमारी (नाममुद्रा)

- प्रसाद इनामदार
सोमवार, 6 मार्च 2017

कोल्हापूर म्हणजे कुस्ती, फुटबॉल, जलतरण, नेमबाजी  हे समीकरण अगदी घट्ट आहे. आता या यादीत बुद्धिबळाचाही समावेश होऊ शकेल. काही वर्षांपूर्वी पल्लवी शहाने बुद्धिबळामध्ये चमक दाखविली होती. त्याच्याही पुढे पाऊल टाकत ऋचा पुजारीने जागतिक बुद्धिबळाच्या पटावर कोल्हापूरचे नाव चमकविताना आपण ‘६४ घरांची राजकुमारी’ असल्याचे दाखवून दिले आहे. 

कोल्हापूर म्हणजे कुस्ती, फुटबॉल, जलतरण, नेमबाजी  हे समीकरण अगदी घट्ट आहे. आता या यादीत बुद्धिबळाचाही समावेश होऊ शकेल. काही वर्षांपूर्वी पल्लवी शहाने बुद्धिबळामध्ये चमक दाखविली होती. त्याच्याही पुढे पाऊल टाकत ऋचा पुजारीने जागतिक बुद्धिबळाच्या पटावर कोल्हापूरचे नाव चमकविताना आपण ‘६४ घरांची राजकुमारी’ असल्याचे दाखवून दिले आहे. 

वुमन इंटरनॅशनल मास्टरसाठीचे मानांकन मिळविताना तिने फिलिपिन्स २०११ व उझबेकिस्तान २०१२ येथील स्पर्धांत दोन निकष पूर्ण केले होते. तिसरा नॉर्म मिळविताना मॉस्कोत नुकत्याच झालेल्या स्पर्धेत तिने नऊपैकी साडेतीन गुणांची कमाई केली आणि वुमेन इंटरनॅशनल मास्टर किताबावर शिक्कामोर्तब केले. आता तिला वुमेन ग्रॅंड मास्टरचे लक्ष गाठायचे आहे आणि त्यासाठी तिचा कसून सराव सुरू आहे. सांगलीमध्ये (कै.) भाऊसाहेब पडसलगीकर यांनी बुद्धिबळाची उत्तम परंपरा निर्माण केली. ऋचाला या वातावरणाचा लाभ झाला. वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षांपासूनच या खेळात प्रावीण्य मिळविण्यासाठी तिची धडपड सुरू झाली. केवळ सहाव्या वर्षी ती राष्ट्रीय स्पर्धा गाजवू लागली; तर नवव्या वर्षी तिने आशियाई युथ चॅम्पियनशिप जिंकली. तेथून तिने मागे वळून पाहिलेच नाही. गेली १६-१७ वर्षे ऋचा वुमेन ग्रॅंडमास्टर होण्याचे ध्येय उराशी बाळगून खेळत आहे. त्यासाठी ती प्रचंड कष्ट घेत आहे. विविध स्पर्धांतून यश मिळवत तिने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. ‘वुमेन इंटरनॅशनल मास्टर’ होण्यापर्यंतची तिची वाटचाल म्हणूनच कौतुकास्पद आहे. आक्रमक चाली रचून प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणे, हाच तिचा स्थायीभाव. त्यामुळे सामना बरोबरीत सोडविण्यापेक्षा जिंकण्याकडे तिचा अधिक कल दिसतो. या तिच्या वृत्तीमुळेच वयाच्या २२ वर्षी ती ‘वुमेन इंटरनॅशनल मास्टर’ बनू शकली. सरावासाठी संगणकाचाही उत्तम उपयोग ती करून घेते. स्पर्धांच्या माध्यमातून तिची जगभर भटकंती सुरू असते. आलेल्या अनुभवांची मैफल ती ब्लॉगच्या माध्यमातून रंगवत असते. शिवाजी विद्यापीठातून इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेताना तिने शिक्षणाचा तोलही नीट सांभाळला. बुद्धिबळातील कोड्यांवर ‘ब्यूटिफुल पझल्स’ हे पुस्तकही तिने लिहिले आहे. ऋचाच्या यशामध्ये तिच्या प्रशिक्षकांचा वाटा मोठा आहे. तसे तिच्या आई-वडिलांचे कष्टही मोठे आहेत. आई सीमा यांनी ऋचाचे करिअर घडवले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वुमेन ग्रॅडमास्टर होण्याचे लक्ष्य बाळगलेल्या ऋचाने कोल्हापूरच्या समृद्ध क्रीडापरंपरेत मानाचा आणखी एक तुरा खोवला आहे.

Web Title: Rucha pujari