हौस ऑफ बांबू : मराठी वाचक सांत्त्वनम..!

नअस्कार! फारा दिसांनी आपली पुन्हा गाठ पडत्ये आहे. या ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. अशातशा सुटणाऱ्या नाहीत. हो की नै? गाठीवरुन मला आमचे वाईचे डॉ. शंतनु अभ्यंकर आठवले.
Hous of Bamboo
Hous of BambooSakal
Summary

नअस्कार! फारा दिसांनी आपली पुन्हा गाठ पडत्ये आहे. या ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. अशातशा सुटणाऱ्या नाहीत. हो की नै? गाठीवरुन मला आमचे वाईचे डॉ. शंतनु अभ्यंकर आठवले.

नअस्कार! फारा दिसांनी आपली पुन्हा गाठ पडत्ये आहे. या ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. अशातशा सुटणाऱ्या नाहीत. हो की नै? गाठीवरुन मला आमचे वाईचे डॉ. शंतनु अभ्यंकर आठवले. शंतनुराव अभ्यंकर हे एक कृष्णाकाठचं भारी व्यक्तिमत्त्व आहे. वाईच्या अरुंद गल्लीबोळातून मोटारीतून एखादा देखणा तरुण जाताना दिसला आणि लोकांच्या माना तिथं वळल्या की खुशाल समजावं, डॉ. शंतनुराव या रस्त्यावरुन गुजरताहेत!! इतका देखणा प्रसूतितज्ज्ञ असेल तर…जाऊ दे.

आपल्या महाराष्ट्रातील प्रतिभावंतांमध्ये विसंवादी उद्योग करण्याची चालच आहे. म्हंजे असं की एखाद्या शास्त्रीय गायकाला मोटार-दुरुस्तीचं वेड असतं, तर एखादा डॉक्टर पेशंटांच्या नरड्यात टॉर्च मारुन बघता बघता स्वत:च्या नरड्यातून सुरेल गाणी गुणगुणत असतो. कुणी इंजिनीअर शेतीचे प्रयोग करतो तर कुणी लेखक होमेपाथीच्या गोळ्या वाटत हिंडतो. हे असं चालायचंच. आमचे डॉ. शंतनुराव हे उत्तम डॉ. आहेतच, पण त्याच्या जोडीला बरंच काही आहेत. उत्तम लेखक, उत्तम कवी, उत्तम वक्ता, उत्तम ब्लॉगर…सगळं काही उत्तम! अशा या डॉ. शंतनुरावांनी मधल्या काळात भलता उद्योग करुन ठेवला.

प्राचीन तेलगु कवयित्री मुथुपाळिनी हिने लिहून ठेवलेल्या ‘राधिका सांत्त्वनम’ या काव्यग्रंथाचा अनुवाद रसाळ मराठीत करुन ठेवला आमच्या डॉ.नी!! तुम्ही म्हणाल, यात काय मोठंसं? कोरोनाकाळात हाताला लागलेला वेळ अनेक डॉ.नी सत्कारणी लावला, त्यातलाच हा प्रकार असणार! पण नाही, वाचकहो, तसं नाही! ‘राधिका सांत्त्वनम’ या काव्यग्रंथाबद्दल थोडी माहिती करुन घ्या, आणि मग बोला…

मुथुपाळिनी ही १७६३ च्या सुमारासची देवदासी कवयित्री होती. तंजावुरच्या राजघराण्याशी संबंधित अशी नर्तिका होती, आणि तेवढीच विदुषीही होती. तेलगु आणि संस्कृत भाषेवर जबरदस्त प्रभुत्त्व होतं तिचं. तिनं राधा, कृष्ण आणि नवपरिणिता इला यांच्या त्रिकोणावर आधारित ५८४ कडव्यांची काव्यमालिका लिहिली. तीच ही ‘राधिका सांत्त्वनम’! याच्यासारखा कामोत्कट, शृंगारिक, उत्फुल्ल आणि रसाळ काव्यग्रंथ दहा हजार वर्षात झाला नाही, असं म्हटलं जातं. (बघा, शृंगारिक म्हटल्याबरोब्बर कान टवकार्लेत तुमचे! चहाटळ मेले!!) या ग्रंथाचा मराठी भावानुवाद डॉ. अभ्यंकरांनी (वाईत बसल्या बसल्या) केला आहे, तोही भयंकर रसाळ असणार, हे वेगळं सांगायला नकोच. अनुवाद करुन थांबायचं की नाही? पण छे! डॉ. शंतनुरावांनी त्याचा (भर) पुण्यात अभिवाचनाचा चक्क प्रयोग लावला आहे!! (मी जाणाराय!) येत्या ६ फेब्रुवारीला टिळक रोडवरच्या हिराबागेतल्या ज्योत्स्ना भोळे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. प्रवेश विनामूल्य! (जा, जा! किंवा या, या!!) शृंगारिक काव्याचं अभिवाचन असल्यामुळे या कार्यक्रमाला मध्यांतर नाही, याचीही गरजूंनी नोंद घ्यावी. कानटोपी, स्वेटरादी पोशाख करुन, वेषांतर करुन येणेचे करावे!! एकंदरित लौकरच पुण्यात क्रांती घडणार आहे, यात शंका नाही. पुण्यात नाही तरी गेले काही दिवस कडक थंडी पडत्येय! डॉ.च्या औषधरुपी ‘राधिका सांत्त्वनम’च्या (रसाळ) भावानुवादामुळे पुण्यात उकाडा वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केल्याचं कळतं. पुणेकरांनो, आता कानटोप्या विसरा! असो. खूप वर्षांपूर्वी, कै. आनंद साधले यांनी ‘आनंदध्वजाच्या कथा’ लिहून धमाल उडवली होती. ‘चतुर्भाणि बावनखणी’ हा संस्कृत भाणांचा (नाट्यछटेचाच संस्कृत प्रकार…) अनुवाद करुन (गरीब बिचाऱ्या) मराठी वाचकांची कानशिलं तापवली होती. साधले यांना जे साधले, ते डॉ. अभ्यंकरांना साधेल काय? राधिकेच्या सांत्त्वनाला येणार असाल तर मास्क लावा आणि होऽऽ, सोशल डिस्टन्सिंग अगदी मस्ट बरं का!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com