सत्यमेव जयते!

प्रकाश अकोलकर
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेले भाषण हे मुळात देशाच्या पंतप्रधानांचे भाषण नव्हतेच. ते होते भाजपच्या बड्या नेत्याने उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका समोर ठेवून केलेले भाषण होते. ही बाब लक्षात घेऊनच त्याकडे बघायला हवे.

नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेले भाषण हे मुळात देशाच्या पंतप्रधानांचे भाषण नव्हतेच. ते होते भाजपच्या बड्या नेत्याने उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका समोर ठेवून केलेले भाषण होते. ही बाब लक्षात घेऊनच त्याकडे बघायला हवे.

नागला फटेला. दिल्लीपासून अवघ्या तीन तासावरचं उत्तर प्रदेशातील, पूर्वीच्या हाथरस आणि आताच्या महामायानगर जिल्ह्यातील एक गाव. स्वातंत्र्यास सात दशकं उलटली तरी अंधाराच्या खाईत रात्रीच्या रात्री काढणारं हे गाव अचानक प्रकाशझोतात आलं, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट लाल किल्ल्यावरून त्या गावाचा गौरवानं उल्लेख केल्यामुळे. केंद्रात सत्तापालट झाला. मोदी पंतप्रधान झाले आणि अनेक नवनव्या योजनांचा लखलखाट सुरू झाला. "दीनदयाळ ग्रामज्योती योजनेमार्फत या गावात वीजपुरवठा सुरू झाला,‘ असं दस्तुरखुद्द पंतप्रधानांनीच सांगितलं. "देश स्वतंत्र झाल्यावर सत्तर वर्षांनी का होईना, या गावात प्रकाशाचा किरण आला तो नव्या सरकारच्या कार्यक्षमतेमुळेच,‘ असं देशभरातले लोक म्हणू लागले. "अच्छे दिन!‘ म्हणजे आणखी वेगळं काय असतं?

पंतप्रधानांच्या भाषणानंतर पुढच्या 24 तासांत ते "नतद्रष्ट‘ पत्रकार या नागला फटेला गावात जाऊन पोचले. तो काय? गावात अंधकाराचेच साम्राज्य होते! गाव अवघं सहाशेच्या आसपास उंबरठ्याचं. पैकी 450 घरांत वीज आलेली नव्हती आणि ज्या 150 घरांत विजेचे मिणमिणते दिवे लुकलुकत होते, तेही त्यांनी बेकायदा आकडा टाकून वीज चोरल्यामुळे. उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी सांगतात की या गावच्या काही घरांत 1985 मध्येच वीजजोडण्या दिल्या गेल्या होत्या. पंतप्रधान सांगतात की, 2015 मध्ये दीनदयाळ ग्रामज्योती योजनेमुळेच या गावात वीज आली. मग तो प्रकाशाचा किरण गावात नक्‍की कधी आला? 1985 मध्ये की 2015 मध्ये?
 

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात बलुचिस्तानचा थेट उल्लेख केला आणि पाकिस्तानला डिवचलं. लगोलग सोशल मीडियावर "मेसेजेस‘ फिरू लागले : बलुचिस्तानचा विषय काढून पाकिस्तानवर थेट प्रहार करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. मात्र, कॉंग्रेस प्रवक्‍ते रणदीप सुरजेवाला यांना ते मान्य नाही. ते म्हणतात की डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील "यूपीए‘ सरकारने बलुचिस्तानात जे काही चाललं आहे, त्याबद्दल पाकिस्तानकडे अनेकवार निषेध नोंदवला आहे. डॉ. मनमोहनसिंग 2004 मध्ये पंतप्रधान झाले आणि लगोलग म्हणजे 27 डिसेंबर 2005 रोजी भारताने आपला निषेधनामा व्यक्‍त केला होता. त्यानंतर दोन मार्च 2006 रोजी स्वत: डॉ. सिंग यांनी संसदेत एका प्रश्‍नाला उत्तर देताना बलुचिस्तानमधील हिंसाचार आणि पाकिस्तान सरकार करत असलेल्या लष्करी बळाचा अतिरेकी वापर यासंबंधात आपली भूमिका स्पष्ट केली होती. शिवाय, त्यांनी पाकिस्तान सरकारचा त्याबद्दल निषेधही केला होता. त्याशिवाय शर्म-अल-शेख येथे 16 जुलै 2009 रोजी काढण्यात आलेल्या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या संयुक्‍त निवेदनातही बलुचिस्तानचा उल्लेख होता.
 

बलुचिस्तानबाबतीत जे झालं, तेच पाकव्याप्त काश्‍मीरसंबंधात मोदी यांनी केलेल्या विधानांबाबतही झालं. पाकव्याप्त काश्‍मीर पुनःश्‍च भारतात आणण्याचा मुद्दा मोदी गेले काही दिवस लावून धरत आहेत. काश्‍मीरसंबंधातील सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी तो विषय काढला होता आणि लाल किल्ल्यावरूनही तशी ललकारी त्यांनी दिली. त्यानंतर लगेचच "अशी भूमिका घेणारे मोदी हेच पहिले पंतप्रधान‘ असे मेसेज सोशल मीडियावरून फिरू लागले. प्रत्यक्षात नरसिंह राव पंतप्रधान असतानाच संसदेने मंजूर केलेल्या एका ठरावात "पाकिस्तानने भारतीय भूमीचा बेकायदा ताबा घेतलेला आहे,‘ असा स्पष्ट उल्लेख होता! आश्‍चर्याची बाब म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्‍ते आणि परराष्ट्र विभाग सेलचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनीच ही माहिती मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणानंतर दिली. आता त्यांनी त्यात काही श्‍लेष काढला आहे, हा भाग निराळा! ते म्हणतात की संसदेने केलेला ठराव आणि मोदी यांनी ठामपणे मांडलेली भूमिका यात फरक आहे. मोदी यांनी पाकिस्तानची ढोंगबाजी अधिक ठळकपणे उघड केली आहे. "यूपीए‘ सरकारनेही तशीच भूमिका घेतल्याचेही चौथाईवाले मान्य करतात. पण "यूपीए‘च्या मर्यादा लक्षात घेता, त्यांनी घेतलेली भूमिका ही बोटचेपी होती, असं त्यांचं म्हणणं आहे. आता यावर सोशल मीडियातील भाजप समर्थक काय म्हणतात, ते बघावं लागेल! अर्थात, त्यांना या अशा तपशिलात जाण्यात काहीच रस नसतो, हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. शिवाय, दस्तुरखुद्द पंतप्रधानच तपशिलाविना बेधडक विधाने करत असल्यानंतर हे "भक्‍त‘ तरी बिचारे काय करणार?
 

आजारी सार्वजनिक उपक्रमांबाबतचे मोदी यांचे याच भाषणातील विधानही चक्रावून टाकणारे आहे. एअर इंडिया आणि शिपिंग कॉर्पोरेशन या दोन सार्वजनिक उपक्रमांची परिस्थिती गेल्या काही दिवसांत चांगलीच सुधारल्याचे मोदी यांनी सांगितले. प्रत्यक्षात त्यांच्या सरकारचा त्याच्याशी दुरान्वयाने तरी संबंध येतो काय? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाचे भाव दणदणीत पडले आणि त्यामुळे झालेल्या आर्थिक लाभाच्या जोरावर या दोन सार्वजनिक उपक्रमांची प्रकृती बऱ्यापैकी सुधारली, हे वास्तव आहे आणि ते सारेच जाणून आहेत. मात्र, मोदी यांना कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरणही आपल्याच सरकारमुळे झाली, असे सूचित करावयाचे असेल तर "सव्वासो करोड‘ जनता तरी काय करणार? त्याशिवाय महागाई, चलनवाढ आणि विकासदर यासंबंधात मोदी यांनी केलेल्या विधानांबद्दलचा तपशीलही तपासून बघायला हवा. तो बघितला की मोदी यांचे संपूर्ण भाषणच कसे चलाखीने ओतप्रोत भरलेले होते, ते लक्षात येते. या चलाखीमागील कारणही अगदी स्पष्ट आहे. मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेले भाषण हे मुळात देशाच्या पंतप्रधानांचे भाषण नव्हतेच. ते होते भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्याने उत्तर प्रदेश आणि पंजाब या दोन राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका ध्यानात घेऊन केलेले भाषण होते. आपणही त्याकडे प्रचारमोहिमेचा नारळ फोडणारे भाषण म्हणूनच बघायला हवे.
 

।। सत्यमेव जयते!।।