अवयवरोपणाचा अपूर्व टप्पा

Human body
Human body

पुढील महिन्यात मानवावर प्रथमच होत असलेल्या एका अद्‌भुत शस्त्रक्रियेविषयी वैद्यकीय जगतात मोठी उत्सुकता आहे. नैतिकतेसह अनेक प्रश्‍न निर्माण करणारी, विचित्र व क्‍लिष्ट असलेली ही शस्त्रक्रिया यशस्वी होईल काय? 

पुढील महिन्यात एक अभूतपूर्व घटना होऊ घातली आहे. मानवी इतिहासात या घटनेचे स्थान व महत्त्व अनन्यसाधारण असेल. रशियात व्हॅलेरी स्पिरीडोनॉव्ह नावाचा 32 वर्षांचा संगणक अभियंता अतिशय कष्टप्रद जीवन कंठीत आहे. तो "व्हेर्डिंग हॉफमन' (मसल वेस्टिंग डिसिज) या आजाराने त्रस्त आहे. या आजारात स्नायू निकामी होतात. जन्मापासून तो असा लोळागोळा अवस्थेत आयुष्य काढत आहे. दिवसेंदिवस त्याची अवस्था खालावत आहे. वैद्यकीय विज्ञान अतिशय पुढे गेले असले तरी या रोगावर उपाय नाही.

स्पिरीडोनॉव्हचे शरीर काम करू शकत नाही; परंतु मेंदू मात्र काम करतो. त्याच्यावर एकच उपाय (?) आहे आणि तो म्हणजे त्याच्या डोक्‍याचे दुसऱ्या व्यक्तीच्या धडावर रोपण करावयाचे! ही शस्त्रक्रिया डिसेंबरमध्ये होणार आहे. इटलीतील ट्युरिन ऍडव्हान्स्ड न्यूरोमोड्युलेशन ग्रुपचे संचालक डॉ. सर्जेओ कॅनॅव्हेरो ही शस्त्रक्रिया करणार आहेत. या अभूतपूर्व शस्त्रक्रियेसाठी 36 तास, दीडशे डॉक्‍टर व अन्य सेवक लागतील. ही शस्त्रक्रिया डॉ. कॅनॅव्हेरो अमेरिकेत करणार होते; परंतु आता ती चीनमध्ये होणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे एक कोटी डॉलर खर्च येणार आहे. "अमेरिकन ऍकॅडमी ऑफ न्यूरॉलॉजिकल अँड ऑर्थोपेडिक सर्जन्स'मधील सदस्यांसमोर कॅनॅव्हेरो यांनी या शस्त्रक्रियेविषयी सादरीकरणही केले आहे. त्यांच्या या प्रकल्पास (हेड ऍनॉटॉमीसीस व्हेन्चर - Head Anatomy Venture) या शब्दप्रयोगावरून "हेवन' असे नाव दिले आहे. ते म्हणतात, की "स्वत्व' (सेल्फ) असे काही नसते; आणि जीवनाचा कालावधी वाढविणे एवढाच माझ्या प्रकल्पाचा अंतिम उद्देश आहे. 

मानवावरील अशा पहिल्यावहिल्या शस्त्रक्रियेत प्रथम ज्या डोक्‍याचे रोपण करावयाचे आहे व ज्या धडावर रोपण करावयाचे आहे, ती शरीरे थंड करून ठेवावी लागतील. त्यामुळे शरीरातील पेशी विनाऑक्‍सिजन अधिक काळ राहू शकतील. दोन्ही डोकी त्या त्या शरीरापासून अतिशय कमी जाडीच्या पात्याच्या साह्याने वेगळी करण्यात येतील. या पात्यावर सिलिकॉन नायट्रॉईड या रसायनाचा एक नॅनोमीटर (मीटरचा अब्जावा भाग) जाडीचा थर दिला आहे. या पात्याच्या साह्याने पृष्ठमज्जारज्जू (स्पाइन) कापला जाईल. नंतर दोन्ही पृष्ठमज्जारज्जू जोडण्यासाठी पॉलिइथिलीन ग्लायकॉल वापरण्यात येईल. त्यामुळे कॅनॅव्हेरो यांच्या मते दोन्ही पृष्ठमज्जारज्जू जोडले जातील व एकजीव होतील! याला दोन्ही मज्जारज्जूंचे "फ्यूजन' म्हणतात व हे खास तंत्र कॅनॅव्हेरो यांनी विकसित केले आहे (म्हणे). त्यानंतर धडाच्या आणि शिराच्या रक्तवाहिन्या सूक्ष्म नलिकांनी जोडण्यात येतील व स्नायूंची रचना व्यवस्थित केली जाईल व नंतर रक्ताभिसरण सुरू होईल. यासाठी मेंदू मृत (ब्रेन डेड) झालेल्या शरीराची आवश्‍यकता असते. 

शस्त्रक्रियेनंतर "ते' शरीर चार आठवड्यांसाठी कोमात ठेवण्यात येईल. या काळात शरीर हालचाल करू शकणार नाही व त्या जखमा भरून येतील. नंतर कमी क्षमतेचे विजेचे धक्के देऊन जोडलेले शरीर व पृष्ठमज्जारज्जू उत्तेजित व बळकट होईल. डॉ. कॅनॅव्हेरोंच्या मते रुग्ण कोमातून बाहेर येईल तेव्हा तो हालचाल करू शकेल, बोलू शकेल, तेही त्याच्याच आवाजात! या प्रयोगाविषयी कॅनॅव्हेरो यांनी "सर्जिकल न्यूरॉलॉजी इंटरनॅशनल' शोधपत्रिकेत शोधनिबंध लिहिला आहे. 

एखाद्या शरीरात दुसऱ्या शरीराच्या अवयवाचे रोपण केल्यास ते शरीर रोपण केलेला अवयव स्वीकारतेच असे नाही. त्यासाठी विशिष्ट प्रकारची औषधे द्यावी लागतात. त्याप्रमाणे या रुग्णास आवश्‍यक त्या प्रमाणात अशी औषधे (इम्युनो-सप्रेसंटस) दिली जातील. 

या शस्त्रक्रियेविषयी अनेक तज्ज्ञांना शंका आहेत. तिच्या यशाबाबत कोणालाच खात्री नाही. अनेकांनी कॅनॅव्हेरो यांची "फ्रॅंकेन्स्टाइन,' "फ्रॅंकेन्स्टाइन मॉन्स्टर' अशी संभावना केली आहे. "अमेरिकन असोसिएशन फॉर न्यूरॉलॉजिकल सर्जन्स'चे प्रमुख डॉ. हंट बाजेर म्हणतात, ""रक्तवाहिन्या, स्नायू पूर्ववत काम करू शकतीलही, परंतु पृष्ठमज्जारज्जू जुळणार नाही; त्यामुळे रुग्णाला हालचाल, श्‍वसनही शक्‍य होणार नाही.'' काहींच्या मते "ती' व्यक्ती शरीरावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. 

मानवावर प्रथमच होत असलेल्या अशा प्रकारची शस्त्रक्रिया यापूर्वी माकड व उंदरांवर करण्यात आली आहे. 1954 मध्ये व्लादिमीर देमिखॉव्ह या रशियन सर्जनने कुत्र्याच्या पिलाच्या डोक्‍याचे व चार पायांचे मोठ्या कुत्र्यावर रोपण केले होते. त्यानंतरही त्यांनी असे बरेच प्रयोग केले. परंतु, सगळी कुत्री दोन ते सहा दिवसच जगू शकली. 
अमेरिकेतील सर्जन रॉबर्ट व्हाईट यांनी एका माकडाच्या डोक्‍याचे रोपण दुसऱ्या माकडावर केले. परंतु, पृष्ठमज्जारज्जू न जोडल्यामुळे ते माकड हालचाल करू शकत नव्हते. कृत्रिम उपायांनी ते श्‍वसन करू शकत होते. हे माकड नऊ दिवस जगले. 2014 मध्ये चीनमधील हर्बिज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या झाओ-पिंग यांनी उंदरावर असा प्रयोग केला. गेल्या वर्षी चीनमध्ये माकडावर हा प्रयोग केल्याचे वृत्त आहे. या सर्व प्रयोगांतील प्राणी जगू शकले नाहीत. 

अन्य प्राण्यांवरील अशा अपयशी प्रयोगांमुळे अनेक शास्त्रज्ञ व वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ म्हणत आहेत, की प्राण्यांवरील प्रयोगात यश आल्यानंतरच मानवी शरीरावर असे प्रयोग करण्यात यावेत. खरा प्रश्‍न आहे, तो नैतिकतेचा. अशी शस्त्रक्रिया करावी काय? आणि तो संयुक्तिकही आहे. कारण येथे कोण कोणाचे आयुष्य जगणार आहे? असे प्रयोग यशस्वी झाल्यास कोणाला वाटेल माझे शरीर वृद्ध झाले आहे. आता ते तरुणाचे असावे. शरीरात व्याधी आहेत, ते घ्यावे बदलून! आपली लैंगिक ओळख बदलण्यासाठी शस्त्रक्रिया करून घेऊ इच्छिणारे बहुसंख्य लोक कॅनॅव्हेरी यांना ई-मेल करताहेत. 
अशा शस्त्रक्रियेनंतर "निर्माण' होणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याचे शरीर आपले म्हणून स्वीकारावे लागणे हेही तसे विचित्रच! मानवाच्या "स्वत्वा'चे काय? अनेक प्रश्‍न निर्माण करणारी, विचित्र, क्‍लिष्ट व भयानक शस्त्रक्रिया होते किंवा नाही, झाली तर यशस्वी होईल काय? बघूया काळाच्या उदरात..."पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' की... "किनारा तुला पामरा...' यापैकी काय आहे ते! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com