असं रोजच थोडा वेळ येऊन बोलत बसाल का? 

social
social

थिरुवअनंतपुरमच्या रेल्वे स्थानक परिसरात मळकट वेशातली एक वृद्धा भुकेची आग शमवण्यासाठी कुठल्यातरी झाडाची बारीकशी फळं तोडून तोंडात टाकत असते. पण, तसं करताना झाडाचं एकही पान विनाकारण तुटणार नाही, याची काळजी घेते. जवळून जाणाऱ्या राज्य सरकारच्या "गरिबीनिर्मूलन अभियाना'च्या संगणक कक्षातील कर्मचारी एम. आर. विद्या यांना वरवर वेडी भिकारी भासणाऱ्या त्या म्हातारीबद्दल कुतूहल वाटतं. जवळ जाऊन तिला "काही खायला पाहिजे का', म्हणून विद्या विचारतात. भूक असूनही ती स्वाभिमानी स्त्री नकार देते. तरीही बाजूच्या हॉटेलमधून इडली-वडा आणून विद्या तिला देतात.

खाता खाता तिची विचारपूस करतात अन्‌ स्पष्ट होतं, ही ज्येष्ठा प्रत्यक्षात निवृत्त शिक्षिका आहे, तीही एका पब्लिक स्कूलची. त्या भेटीचा वृत्तांत विद्या फेसबुक पेजवर टाकतात. खळबळ माजते. आपली अत्यंत आवडती टीचर अशा हलाखीत असल्याचं पाहून विद्यार्थ्यांना धक्‍का बसतो. मिळेल त्या वाहनानं अनेक विद्यार्थी थिरुवअनंतपुरमकडे निघतात. दरम्यान, ती दुर्दैवी शिक्षिका पुन्हा गायब झालेली असते. प्रशासन, पोलिस, विद्यार्थी, विद्या सारे मिळून तिला शोधून काढतात अन्‌ उलगडतो एका निराधार आयुष्याचा हादरवून टाकणारा प्रवास...! 

अंगावर शहारे आणणारी ही कहाणी आहे, त्रेसष्ट वर्षांच्या वल्सला अम्मल किंवा वल्सा टीचर यांची. केरळमधल्या मलप्पुरमजवळच्या कोट्टाक्‍कल इथल्या इस्लाहिया पब्लिक स्कूलमध्ये त्या गणित शिकवायच्या. त्याआधी सिकंदराबाद व अन्य एका सैनिकी शाळेतही नोकरी केलेली. पतीचं नाव सोमा शर्मा. वैधव्य नशिबात आलं. तत्पूर्वी सासरच्या मंडळींनी छळ केला, संपत्ती लुबाडली. बावीस वर्षांच्या मुलाचं नाव साई सूर्या ऊर्फ विष्णू. आठवीतच शाळा सोडलेला, त्यामुळेही त्याचा आईवर राग असावा. ऑटोरिक्षा चालवतो. डिझेलचोरीच्या प्रकरणात 2014 मध्ये त्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर सुटल्यापासून तसा तो फरारच होता. वेडी म्हणून त्याने आईला रस्त्यावर सोडून दिलं. पालक व ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणविषयक (2007) कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. शहराच्याच दुसऱ्या कोपऱ्यात, पेट्टाह भागात राहणारी वल्सा टीचरची आई राजाम्मल, बहीण थंकम्मा यांनाही खटल्याचा सामना करावा लागेल. 

वल्सा टीचरचा सांभाळ करण्याची तयारी त्यांच्या लाडक्‍या विद्यार्थ्यांनीही दाखवली; पण मुलगा सोडून अन्य पुरुषांकडे राहायला जाण्यास त्यांनी नकार दिलाय. पोलिसांनी त्यांना महापालिकेच्या "साहाय्यम' वृद्धाश्रमात दाखल केलं. आर. दिव्या नावाच्या उपजिल्हाधिकारी त्यांची काळजी घेताहेत. दोघींना एकमेकींचा लळा लागलाय. वल्सा टीचरनी बोलता बोलता दिव्या यांना विचारलेला प्रश्‍न एकूणच ज्येष्ठ नागरिकांची भावनिक गरज अधोरेखित करणारा आहे. फळ तोडताना झाडाचं पान सांभाळणाऱ्या कोमल अंतःकरणाच्या वल्सा मल्याळम भाषेत दिव्या यांना म्हणाल्या, "इन्नम कूट्ट उंडाकुमाल्लो इल्ले?' म्हणजे, ""असं रोजच थोडा वेळ येऊन बोलत बसाल का?'' 

उतरणीला लागलेल्या उन्हाचं आव्हान 
तरुणांचा देश म्हणवला जाणारा भारत नजीकच्या भविष्यात ज्येष्ठ नागरिकांचा देश असेल अन्‌ त्यांची परवड काय असू शकेल, याची झलक जणू वल्सा टीचरच्या कहाणीनं दाखवलीय. 2010 मध्ये भारतात ज्येष्ठांचं प्रमाण होतं 7.5 टक्‍के. 2025 मध्ये ते असेल 11.1 टक्‍के. म्हणजे जेव्हा देशाची लोकसंख्या 140 कोटींच्या घरात असेल, आपण चीनला मागे टाकलेलं असेल, तेव्हा जवळपास सोळा कोटी ज्येष्ठांचा सांभाळ, आयुष्याची उन्हं उतरणीला लागलेल्यांना "सोशल इन्फ्रास्ट्रक्‍चर', आरोग्य सेवा, मानसिक व भावनिक दिलासा देणं हे आपल्यापुढचं खूप मोठं आव्हान असेल. तसं ते आजही आहेच. 2011 च्या जनगणनेवेळी साठी ओलांडलेल्या ज्येष्ठांचं प्रमाण सर्वाधिक 13 टक्‍के केरळमध्ये होतं. मुलं किंवा नातेवाइकांनी वाऱ्यावर सोडल्याची सर्वाधिक दाखल प्रकरणं थिरुवअनंतपुरममध्ये नोंदली गेलीत. तिथली महापालिकाच वृद्धाश्रम चालवते. संतापजनक हे आहे, की गरिबांची मुलं भलेही अर्धीचतकोर भाकर देऊन मातापित्यांचा सांभाळ करतात; पण शिकलेले, चांगली कमाई करणारे मात्र जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडून देतात. कारण, वृद्धाश्रमांमध्ये बहुतेक पुरुष, महिला नोकरीतून निवृत्त झालेल्या, तरुणपणी मुलांना सारंकाही मिळावं म्हणून खस्ता खाल्लेल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com