मर्म : एका वादळाची कहाणी!

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

जयललिता यांच्या निधनानंतर ओ. पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा तमिळनाडूवर एक वादळ घोंगावत होते! हे वादळ जसे राजकीय होते, तसेच ते नैसर्गिकही होते आणि आठवडाभरातच "वरदा' नावाच्या या वादळाने थेट चेन्नईवरच आक्रमण केले.

जयललिता यांच्या निधनानंतर ओ. पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा तमिळनाडूवर एक वादळ घोंगावत होते! हे वादळ जसे राजकीय होते, तसेच ते नैसर्गिकही होते आणि आठवडाभरातच "वरदा' नावाच्या या वादळाने थेट चेन्नईवरच आक्रमण केले.

खरे तर तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेणारे पनीरसेल्वम यांच्याकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. त्याचे कारण अर्थातच जयललिता यांची "लार्जर दॅन लाइफ' प्रतिमा हे होते. मात्र, चेन्नईवर घोंगावत आलेल्या या वादळाला त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अत्यंत यशस्वीरीत्या तोंड दिले, असेच गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच चेन्नईत महाभयंकर पुराने झालेली हानी लक्षात घेता, म्हणता येते.
तमिळनाडूवर स्वार करून येणारे वादळ हे काकिनाडा आणि नेल्लोर या दिशेने नव्हे, तर थेट चेन्नईच्या दिशेने येत आहे, हे लक्षात येताच पनीरसेल्वम यांनी सारी प्रशासकीय यंत्रणा कामास लावली. सोशल मीडियाचा वापर करून घेऊन त्यांनी काही अघटित घडण्याच्या आधी 24 तास जनतेला पूर्वसूचना देण्यास सुरवात केली. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, ही त्यापैकी सर्वांत महत्त्वाची सूचना होती. तसेच सखल भागातील जनतेला सुरक्षितस्थळी हलविण्याचे कामही युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले.

"व्हॉट्‌सऍप'वर त्यासाठी नागरिकांचे विभागवार ग्रुप तयार केले गेले. महापालिका, तसेच स्थानिक आमदारांच्या माध्यमातून जनतेला सातत्याने माहिती पुरवण्यात आली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आणि ऊर्जामंत्री "व्हॉट्‌सऍप'वरून हा पुरवठा पुन्हा नेमका कधी सुरू होईल, ते लोकांना कळवत होते.
या पार्श्‍वभूमीवर गतवर्षी चेन्नईला पुराने वेढा घातला, तेव्हा झालेली हानी लक्षात घ्यायला हवी. तेव्हा चेन्नई, पुद्दुचेरी परिसरात किमान 500 लोकांचा बळी गेला होता. त्या पार्श्‍वभूमीवर "वरदा' वादळाला तोंड देण्यासाठी पनीरसेल्वम सरकारने बजावलेली कामगिरी लक्षणीयच म्हणावी लागेल. या वादळाने चेन्नईचे जनजीवन 24 तास कोलमडून पडले होते आणि रस्ते, रेल्वे, व हवाई वाहतूक सेवाही या काळात बंद राहिली, हे खरे. मात्र, या वादळात जीवितहानी खूपच कमी झाली, हे जास्त महत्त्वाचे. पनीरसेल्वम यांना अशीच कामगिरी यापुढे कारभार करतानाही दाखवावी लागेल. तरच जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्षात सुरू झालेल्या अंतर्गत कलहास थेट उत्तर मिळेल.