व्यंग्यचित्रांतून 'बोलणारा' प्रज्ञावंत

मंगेश तेंडुलकर
सोमवार, 26 डिसेंबर 2016

श्रद्धांजली

श्रद्धांजली

अभियांत्रिकी पेशातले असतानाही व्यंग्यचित्रांच्या जगात आपलं अढळपद निर्माण करणारा असामान्य बुद्धिमत्तेचा व्यंग्यचित्रकार म्हणजे वसंत सरवटे. अत्यंत मृदू आणि संवेदनशील गृहस्थ. सरवटे हे खरं तर जात्याच एक श्रोता होते. ते बोलायचे कमी आणि ऐकायचे जास्त. त्यांची व्यंग्यचित्रं मात्र खूपच बोलकी असायची. त्यातही त्यांची निःशब्द व्यंग्यचित्रं ही जणू आपल्या व्यवच्छेदक दृश्‍यभाषेत पाहणाऱ्यांशी चक्क बोलायचीच. खूप काही सांगून जायची. ज्याच्या चित्रांना मुळी भाषेच्या सीमाच नाहीत, असा होता हा व्यंग्यचित्रकार ! त्यांच्या स्वतंत्र अशा नैसर्गिक शैलीमुळे त्यांची कॉपी करणं कधी कुणाला जमू शकलं नाही.

आपल्या कलेप्रती सदैव विशेष दक्ष असणाऱ्या सरवटेंनी प्रसंगी व्यंग्यचित्रकलेचे असंख्य प्रस्थापित संकेत धुडकावूनही लावले. कमीत कमी तपशिलातून अधिकाधिक सांगणं, हा व्यंग्यचित्रांचा सर्वसाधारण संकेत बाजूला सारत त्यांनी तपशीलवार अन्‌ मोठमोठी चित्रंही आवर्जून चितारली. एखाद्या भाषेतला लेख जसा वाचला जातो, तशी त्यांची चित्रं वाचावी लागत असत. त्यातून ती पाहणाऱ्यांना संपूर्ण लेख वाचल्याचा आनंद मिळे. अशा तपशीलवार व्यंग्यचित्रांचा प्रवाह त्यांनीच सुरू केला. सरवटे सोडता मारिओ मिरांडा या अजून एकाच व्यंग्यचित्रकारात ही बाजू आढळून येते.

व्यंग्यचित्रकारांच्या चित्रांना क्वचितच मिळणारं कॉर्पोरेट ऑफिस आणि उच्चभ्रू बंगल्यांच्या दिवाणखान्यांमधलं डेकोरेटिव्ह पीसेस आणि वॉलपेपरच्या रूपातलं दिमाखदार स्थान हे सरवटेंच्या व्यंग्यचित्रांना मात्र अनेकदा हक्कानं मिळालं. हा मान आजही फारशा व्यंग्यचित्रकारांना मिळत नाही. त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःच्या प्रतिभेतून विकसित केलेली काही पात्रं. जयवंत दळवी यांचा वाचकांना शब्दांतून भेटणारा "ठणठणपाळ' हा सरवटेंच्या स्वतंत्र प्रज्ञेतून कागदावर उतरत असे, तेव्हा ते व्यंग्यचित्र त्या साहित्याची अभिरुची अधिकच वाढवत असे. आर. के. लक्ष्मण यांच्या "कॉमन मॅन'सारखाच हा "ठणठणपाळ'ही लोकप्रिय झाला.

बुद्धिजीवी गटाला सतत वैचारिक खाद्य देणारी अशी त्यांची चित्रं असायची. पाहणाऱ्यागणिक प्रत्येकास एक वेगळा अर्थ देणारी ही चित्रं होती. व्यक्तिगत जीवनात कमी बोलण्याची भरपाई म्हणून कदाचित आपल्या चित्रांतूनच भरपूर "बोलणारा' हा प्रज्ञावंत कलाकार आज जेव्हा व्यंग्यचित्रांना अधिकाधिक आव्हानांना सामोरं जायला लागतंय, अशा काळात आपल्यातून निघून जाणं हे अधिकच चटका लावणारं आहे..